अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापकीय तणाव आणि त्यावरील उपाय
तणाव म्हणजे काय?
काम आणि जबाबदारी या धक्क्यांविरुध्द शरीराने व्यक्त केलेली प्रतिक्रिया म्हणजे तणाव असं म्हणता येईल.कामाचं ओझं जितकं जास्त तितकी ही प्रतिक्रिया अधिक
तीव्र असते. मात्र, ही सर्व व्यक्तींमध्ये सारख्या प्रमाणात निर्माण होत नाही. समान
कामाचा दोन भिन्न व्यक्तींच्या शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो.
गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास पाहता असं दिसतं की, मानवाच्या कामांमध्ये ज्या झपाट्याने फरक पडत गेला, त्या वेगानं त्याच्या शरीराची रचना व क्षमता बदलत गेलेली नाही. म्हणजेच आपलं आजचं शरीर हे आजच्या कामांच्या तुलनेत कालबाह्य
आहे.शरीर दोन हजार वर्षांपूर्वीच पण कामं मात्र आजची,अशी स्थिती आहे. वाहतुकीच्या रस्त्याच्या उदाहरणावरून हा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.
रस्त्यावरील वाहतूक सुरळीत चालेल की नाही, हे वाहनांची संख्या आणि रस्त्यांची रुंदी व मजबूतपणा यावर अवलंबून आहे. दरवर्षी वाहनांची संख्या वाढत जाते, पण रस्त्यांची रुंदी वाढविता येत नाही. ती-कधी तरी २५-३० वर्षांनी एकदाच वाढविली जाते. साहजिकच वाहनांच्या वाढत्या संख्येचा ताण रस्त्यावर पडतो. मग, ट्रॅफिक जाम,
अपघात, प्रदूषण इत्यादी समस्या रोजच्याच होऊन बसतात.वाहनं आणि रस्ता यांचा जो
संबंध आहे,तोच शरीर आणि त्याला करावी लागणारं कामं यांचा आहे.
कामाचा ताण वाढला की, सर्वात आधी समस्या जाणवू लागते ती रक्तदाबाची.
असं का होतं याचंही मजेशीर कारण आहे. हजारो वर्षांपूर्वी मानव आजच्यासारखा शहरात नव्हे तर जंगलात राहत होता. एखादा हिंस्त्र प्राणी समोर आला की, त्याच्यासमोर
दोनच पर्याय असत. एक लढणे किंवा पळणे.दोन्ही कामांसाठी शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग वाढण्याची आवश्यकता असे. त्यामुळे मेंदूकडून रक्तात अधिक प्रमाणात अँड्रिनेलिन हे द्रव्य मिसळले जाई. त्यामुळे रक्तदाब वाढत असे व लढणे किंवा पाळणे शक्य होई. म्हणजेच रक्तदाबाचा फायदा होत असे.धोका टळला की रक्तदाब नाहीसा होऊन शरीर मूळपदावर येत असे.
शरीराची ही सवय आजही टिकून आहे. काम समोर आलं की रक्तदाब वाढतो. पण आधुनिक जगातील कामाचं स्वरूप वेगळं आहे.आपण कामाशी 'लढू'ही शकत नाही. किंवा त्यापासून पळून `जाऊ' शकत नाही. एक उदाहरण पाहू या.समजा, आपली कामं सुरू होण्याची वेळ सकाळी ९ वाजता आहे, पण आपण १० वाजता कामावर गेलो. आपला बॉस त्या अगोदर तिथं आलेला आहे. आपण जागेवर नसल्याचं पाहून त्याने ‘ताबडतोब येऊन भेटावे' असा निरोप ठेवला आहे.
तो निरोप जेव्हा आपल्याला कळतो, तेव्हा आपला रक्तदाब वाढतो, पण आपण बॉसशी भांडू शकत नाही, कारण चूक आपली असते व बॉसला भेटणं टाळू शकत नाही.
संस्थेतील विविध घटकांशी ठेवावे लागणारे संबंध हे तणावांचं आणखी एक
महत्त्वाचं कारण आहे. विशेषत: मधल्या पातळीवरील व्यवस्थापकांना हा तणाव अधिक जाणवतो. त्याचं काम मुख्यत: कंपनीच्या मालकांकडून धनसाहाय्य मिळविणं, कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणं आणि हे धन आणि काम यांचा संयोग घडवून
कंपनीचं उद्दिष्ट पूर्ण करणं हे असतं. हे काम पूर्ण झालं की कंपनीला त्यापासून
झालेल्या फायद्याचा काही भाग कर्मचाऱ्यांना देऊन उरलेला फायदा कंपनीच्या विस्तारासाठी
वापरण्याचं कामही त्याचं असतं.
वरवर पाहता हे काम सोपं वाटतं. पण प्रत्यक्षात तसं नसतं. व्यवस्थापक मालकाकडं पैसे मागायला जातो, तेव्हा प्रथम त्याला नकारच मिळतो. दुसऱ्यांना `या वर्षी नको, पुढे पाहू'असं उत्तर मिळतं. सहजपणानं पैसे मिळत नाहीत. आठ दहा वेळा विविध मार्गानी प्रयत्न कल्यावरच ते हाताला लागतात. तेही बऱ्याच वेळा अपुरे असतात.
दुसरी जबाबदारी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याची. तुम्ही १० टक्के जास्त
काम कराल तर महिना १०० रुपये अधिक दिले जातील असं मधाचं बोट लावांवं लागतं. तरी महिना १०० रुपये अधिक देऊनही कर्मचारी अधिक काम करतीलच, अशी शाश्वती नसते. ते कामही त्याला स्वत: उभं राहून करून घ्यावं लागतं.
एवढं करून कंपनीचा फायदा झाला, की आपल्याला अधिक वाटा मिळावा यासाठी मालक आणि कर्मचारी यांच्यात चढाओढ सुरू होते. यात मधल्यामध्ये व्यवस्थापकाची अवस्था 'ना घर का ना घाट का’ अशी होते.
कोणत्याही कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आपण जाऊन पाहा. अधिकाऱ्यांनी १० टक्के लाभांश जाहीर केला की, समभागधारक( म्हणजेच कंपनीचे मालक) १५ टक्के का नाही असा सवाल विचारतात. १५ टक्के दिला तर २० टक्के का नाही असा सूर लावतात. त्यांचं समाधान होतच नाही. इकडे कर्मचारी वाढीव पगाराची मागणी करतात.आपल्या कामामुळं कंपनीचा फायदा झाला आहे.त्यामुळं आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत असा आग्रह धरतात. या ओढाताणीत व्यवस्थापकांवरील ताण असह्य झाला नाही तर नवल.व्यवस्थापकाला रक्तबंबाळ करणाराच हा खेळ असतो. पण व्यवस्थापकानं याबाबत तक्रार करायची नसते. कारण हा त्याच्या कामाचा एक भागच आहे.आपण बेडपॅनला हात लावणार नाही असं एखादी परिचारिका म्हणू शकेल का?
अशा प्रकारे व्यवस्थापकाला चहूबाजूंनी तणाव झेलावा लागतोच. तो त्याने शास्त्रशुध्द पध्दतीनं पेलला, तर त्याचा त्रास होत नाही. तो पेलण्याचे मार्ग कोणते याबाबत पुढील लेखात पाहू.