अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन शिक्षण:काल,आज व उद्या
सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी जेव्हा भारतात इंग्रजी शिक्षणाची व इंग्रजी शिक्षण पध्दतीची सुरुवात झाली, त्या वेळी शिक्षण घेण्याची इच्छा असणारे बहुतेक जण माध्यमिक शिक्षणानंतर ‘आर्टस्’ शाखा स्वीकारणं पसंत करीत असत. त्यातही अधिक बुध्दिमत्तेच्या विद्यार्थ्यांचा ओढा वकील होण्याकडे असे. त्यामुळे त्या काळात लेखक,कवी व कायदेतज्ज्ञ यांची रेलचेल होती. कारण, त्या शिक्षणाची लाट होती ती सुमारे पन्नास वर्षे टिकली.
नंतर सुमारे पंचाहत्तर वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांतीची पहाट उगवल्यानंतर बुध्दिमान विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी व तांत्रिक शिक्षणाकडे वाढू लागला. कारण समाजाला त्या वेळी या क्षेत्रातील शिक्षितांची गरज निर्माण झाली होती. त्या नंतरच्या काळात वैद्यकीय शिक्षणाकडे समाजाचं लक्ष गेलं. ही लाट अजूनही टिकून आहे.
याबरोबरच सध्या आणखी एक जोरदार लाट आली आहे,ती म्हणजे व्यवस्थापन शिक्षणाची. तांत्रिक शिक्षणाला जोड म्हणून प्रथम या शिक्षण क्षेत्राचा उदय झाला. नंतर ते कमालीचं लोकप्रिय झालं. इतकं की कोणत्याही फलाण्या विद्यापीठाची व्यवस्थापन विषयातील पदवी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागू लागल्या. लग्नाच्या बाजारातही ‘व्यवस्थापन तज्ज्ञाां'चा भाव अन्य शिक्षितांपेक्षा अधिक झाला. पर्यायाने आज व्यवस्थापनशास्त्राचं शिक्षण देणाऱ्या संस्था व महाविद्यालयांचं जणू पेवच फुटलं आहे.
एक व्यवस्थापनतज्ज्ञ म्हणून याचा मला एकीकडे आनंद होतोय तर दुसरीकडे चिंताही
वाटत आहे.
व्यवस्थापन शिक्षण ही आता केवळ काही उच्चभ्रूंंची मक्तेदारी राहिलेली नाही.
अगदी तळागाळापर्यंत या शिक्षणाबाबत आकर्षण वाटत आहे. व्यावसायिक व्यवस्थापनाला
केवळ तांत्रिकच नव्हे तर प्रत्येक क्षेत्राकडून मागणी असल्याने सर्व क्षेत्रांतील व्यवस्थापन
तज्ज्ञ ‘तयार' करणाऱ्या संस्था आज प्रत्येक छोट्या-मोठ्या गावांमधून आपल्याला
पाहावयास मिळतात. त्यामळे व्यवस्थापन शिक्षणाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली
आहे. वाऱ्याची दिशा ओळखून अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण संस्थेने देशातील
जवळ-जवळ ८०० शिक्षण संस्थांना व्यवस्थापन शिक्षण देण्याची अनुमती दिली
असून त्यांंच्या अभ्यासक्रमांना मान्यताही दिली आहे. त्यामुळे हे शिक्षण घेऊ इच्छीणार्या
कुणालाही ते घेता येऊ लागलं आहे. ‘जागा' भरल्यामुळे प्रवेश मिळाला नाही, असा
अनुभव कुणालाही येत नाही याचा मला आनंद आहे.
संस्था व विद्यार्थी यांची संख्या वाढत असतानाच शिक्षणाच्या दर्जाचं काय होणार
ही शंका मला भेडसावते.
मुलाच्या अभ्यासाबाबत अत्यंत दक्ष असणाऱ्या व त्याने अभ्यास करावा
म्हणून सतत त्यावर डाफरणाऱ्या माझ्या एका मित्राला त्याच्या मुलानं विचारलं, ‘बाबा, मला
शिक्षण मिळावं असं तुम्हाला वाटतं की पदवी मिळवी असं वाटतं?” हा प्रश्न ऐकून
माझा मित्र क्षणभर अवाक् झाला.
त्यानं गोंधळून विचारलं, “या दोन्हीत फरक काय?” मुलानं शांतपणे सांगितलं,
"बाबा, नुसती पदवी घ्यायची असेल, तर कॉलेजला जाण्याची किंवा सखोल अभ्यासाची
आवश्यकता नाही. लाईक्ली क्वेश्चन्स' पाठ करून परीक्षेच्या वेळी पेपरमध्ये उतरवले
की, हमखास पदवी मिळते. परीक्षेआधी पेपर फुटले, तर हे काम अधिकच सोपं होतं.
मात्र, शिक्षण घ्यायचं असेल तर गंभीरपणे अभ्यास करण्याला काही पर्याय नाही.
मुलाचे ‘अनुभवी’ बोल ऐकून माझा मित्र गप्प बसला.
आज व्यवस्थापन शिक्षणासंबंधी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कुत्र्याच्या
छत्रीप्रमाणे सर्वत्र उगवलेल्या व्यवस्थापन शिक्षणसंस्थांपैकी फार थोड्या संस्थाकडे
'शिक्षण' देण्यायोग्य मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. बाकीच्या केवळ पदवी 'विकणाऱ्या'
संस्था झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन शिक्षणाचा गंभीरपणे विचार होणं आवश्यक आहे. अन्यथा, एक ना धड भाराभर चिंध्या अशी या क्षेत्राची अवस्था होण्याची शक्यता आहे. व्यवस्थापकीय शिक्षणाची लोकप्रियता वाढविताना त्याच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड
केल्यास ते समाजाच्या दृष्टीने घातक ठरणार आहे‘व्यवस्थापन'या संकल्पनेची प्रत्येक
क्षेत्रातील वाढती गरज पाहता, त्याच्या शिक्षणाचा दर्जा टिकवून धरणंं केवळ गरजेचं
नाही तर अनिवार्य झाले आहे.
व्यवस्थापन शिक्षण : काल
चाळीस वर्षांपूवीं प्रथमच भारतात हॉर्वर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोलकाता व
अहमदाबाद येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट' या संस्थांची स्थापना झाली.
विशाखापट्टणम येथील वॉल्टायर विद्यापीठातही व्यवस्थापन शिक्षणाचा 'एमबीए'
अभ्यासक्रम सुरू करण्यात आला, पण त्याला अधिकृत मान्यता नव्हती. ही ‘एमबीए'
कोणती डिग्री आहे बुवा? नाव जरा विचित्र वाटतं नाही? अशी शेरेबाजी त्याकाळी होत
असे.
कोलकाता व अहमदाबाद येथील व्यवस्थापन अभ्यासक्रम पदव्युत्तर होते. त्यामुळे
त्या काळी शिक्षणक्षेत्रात एक गमतीशीर प्रश्न निर्माण झाला. पदव्युत्तर शिक्षण हे
पदवीनंतर घ्यावयाचं असतं. पण व्यवस्थापन शिक्षणाला कोणतीही पदवी त्या काळी
दिली जात नव्हती. मग ज्या अभ्यासक्रमांची मुळात पदवीच नाही, त्याचं पदव्युत्तर
'शिक्षण कसं दिलं जाऊ शकतं? असा गहन प्रश्न त्याकाळी विद्यापीठातील तथाकथित
शिक्षणतज्ज्ञांना पडला होता.
या प्रश्नावर बरंच वैचारिक चर्वितचर्वण झाल्यानंतर एका प्राध्यापक- महाशयांनी
त्यावर अफलातून तोडगा काढला. ‘दोन वर्षे वाया गेल्याने ज्यांचं काहीच नुकसान होऊ
शकणार नाही अशा विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमात प्रवेश द्यावा', अशी सूचना त्यांनी
केली. ती अमलातही आणण्यात आली. एका अपरिचित अशा अभ्यासक्रमासाठी दोन
वर्षे 'वाया' घालविण्याचे धाडस फक्त हुशार विद्यार्थींच दाखवू शकतो. त्यामुळे केवळ
अतिबुध्दिमान अशा विद्यार्थ्यांनीच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. गंमत सांगायची
म्हणजे ही परंपरा आजतागायत सुरू आहे. आयआयएममध्ये प्रवेश मिळालेला विद्यार्थी
अतिबुध्दिवान असलाच पाहिजे हे गणित तेव्हापासून जे ठरले ते कायमचेच.
अशा तऱ्हेने काही मोजक्याच ठिकाणी व्यवस्थापन शिक्षणाची सुरुवात त्याकाळी
झाली. चाळीस वर्षांपूर्वी लावलेला हा छोटासा ‘वेलू' आता 'गगनावरी’ गेला आहे.
आजचे व्यवस्थापन शिक्षण
एमबीए अभ्यासक्रमाचे ठसठशीत यश लवकरच डोळ्यांत भरलं. एमबीए विद्यार्थ्यांच्या सारख्या नोकच्या बदलण्याच्या सवयीवर त्या काळी टीका होत असतानाही, अनेक संस्थांनी अशा विद्यार्थ्यांना नोकरीवर घेण्यास सुरुवात केली. काही वर्षांनंतर त्या विद्यार्थ्यांचा भाव इतका वधारला की, नोकरीसाठी त्यांना अर्ज द्यावा न लागता संस्थाच
त्यांच्याकडे येऊ लागल्या. कॅम्पस इंटरव्ह्यू या संकल्पनेची सुरुवात येथूनच झाली. या
घवघवीत यशामुळे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची लोकप्रियता वाढली. एमबीए
पदवीधरांची वाढती गरज लक्षात घेऊन बंंगळूर, लखनौ आदी शहरांमध्येही त्या संस्था
उभ्या राहिल्या.
अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण संस्थेने विद्यापीठाच्या बाहेर खासगी संस्थांनाही
एमबीएचा अभ्यासक्रम सुरू करण्याची अनुमती देण्याचा सपाटा सुरू केला. त्यामुळे
अशा संस्थांचे रान माजण्यास मदत झाली. पर्यायाने व्यवस्थापन शिक्षणाच्या दर्जात
चिंताजनक घट झाली आहे. भरमसाट शुल्क आकारूनही विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा व
सकस शिक्षण न देणाऱ्या 'प्रॉफिट ओरिएंटेड' संस्थाही असंख्य आहेत. एमबीए असणं
ही सामाजिक प्रतिष्ठेची बाब असल्याने विद्यार्थीही मागचा पुढचा विचार न करता
स्वतःची फसवणूक करून घेत आहेत.
या दर्जाहीनतेला कोणकोणते घटक जबाबदार आहेत व त्यांना दूर सारून दर्जा सुधारण्यासाठी काय करावे लागेल तसंच व्यवस्थापन शिक्षणाचं उद्याचं स्वरूप कसं असणार आहे याबाबत अनेक तज्ज्ञ सांगोपांग विचार करीत आहेत. माझीही यासंबंधी निश्चित अशी मतं आहेत. त्याबद्दल पुढील लेखात.