अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/हितगूज (भाग पहिला)
याबद्दल आपल्याशी हितगूज करण्याचा विचार आहे.
आपल्या ध्येयपूर्तीच्या दिशेने आगेकूच करताना आतापर्यंत झालेल्या प्रवासाचं
सिंहावलोकन करणं हा प्रत्येकाचा छंद असतोच. मीही मागे वळून माझ्या गतायुष्याकडे
नजर टाकतो, तेव्हा अनेक महत्वपूर्ण प्रसंगांची मला आठवण होते. या प्रसंगांमुळेच
मला नवी दृष्टी मिळाली, चिंतन व कार्य यासाठी नवे विषय मिळाले आणि विविध
प्रकारच्या मानवी स्वभावांचा जवळून परिचय झाला. यातून माझी व्यावसायिक कारकीर्द
फुलत गेली.माझ्या आयुष्यातील अनेक काही 'मैलाचे दगड’ वाचकांनाही मार्गदर्शक
ठरू शकतील.
वाचनाची आवड :
वाचनाची आवड निर्माण होणंं हा माझ्या आयुष्यातील पहिला आणि सर्वात
महत्त्वपूर्ण टप्पा होता. माझ्या आईवडिलांचं वाचन जबरदस्त होतं. वाचनासाठी
हॅण्डबिलापासून विश्वकोशापर्यंत कोणताही विषय त्यांना निषिध्द नसे. त्यांच्या रक्तातील
हा गुण आमच्यापर्यंत आपसूकच पोहोचला व आम्हां सहाही भावंडांना वाचनाची गोडी बालपणापासून लागली. महाविद्यालयात जाण्यापूर्वी मी एका वाचनालयात संध्याकाळीकाम करीत असे. तेथील अनेक मराठी पुस्तकांचा फडशा पाडला होता.
महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर माझे इंग्रजी पुस्तकांचे वाचन प्रचंड वाढलं.त्यामुळे त्या भाषेशी निकटचा परिचय झाला.वाचनाच्या आवडीमुळे माझ्या २० वर्षांच्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात मराठी,इंग्रजी व हिंदी साहित्याचे अंतरंग मला जवळून पाहता आले.या तिन्ही भाषांच्या जगतात मला मुक्तपणे संचार करता
आला. या भाषा अवगत झाल्या आणि त्याचा उपयोग पुढे माझे विचार प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी होत गेला. माझी व्याख्यानं आणि लेख वेगळ्या धाटणीचे वाटत ते माझ्या भाषाज्ञानामुळेच! चौफेर वाचनामुळे अनेक थोर साहित्यकृतींमधील अवतरणं मला तोंडपाठ आहेत. त्यांचा समर्पक उपयोग मी व्याख्यानं व लेखांमध्ये करीत असल्याने व्यवस्थापनासारखा क्लिष्ट विषय सोपा करणंं मला शक्य होई. तसेच इतर वक्त्यांपेक्षा माझी व्याख्यानं अधिक परिणामकारक होत असत.
माझा पहिला जॉब :
कोणत्याही ‘पहिलेपणाची’ नवलाई अपूर्व असते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळणारी पहिली नोकरी आपण कधी विसरू शकत नाही. आपण काही करण्यास सक्षम आहोत ही जाणीव झाल्याने आपला आत्मविश्वास दुणावतो.
मी १९५१ मध्ये केमिकल इंजिनिअर झालो. त्यावेळी देश नुकताच स्वतंत्र झाला होताआणि औद्योगिक क्षेत्र अविकसित होते. त्यामुळे इंजिनिअर्सना नोकऱ्या मिळविणं
अवघड होतं. त्यावर्षी संपूर्ण देशातून केवळ १६ जणांना केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळाली व त्यापैकी फक्त सहा जणांना काम मिळालं.
तथापि, माझे शैक्षणिक करिअर चांगलं असल्याने मला पदवीधर झाल्याबरोबर लगेचच एका अभियांत्रिकी सल्लागार संस्थेतून ऑफर आली. ही संस्था ‘इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग'या विषयाशी संबंधित होती.मात्र मी केमिकल इंजिनिअर होतो.त्यामुळे ऑफर कितीही आकर्षक असली तरी ती वेगळ्या क्षेत्रातील असल्याने स्वीकारावी की नाही अशा द्विधा मनःस्थितीत मी होतो.
मी माझे प्राध्यापक डॉ. जी.पी. काणे यांचा सल्ला घेतला. त्यांनी मला ताबडतोब नोकरी स्वीकारण्यास सांगितलं. ‘ही कंपनी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमधील आहे आणि मी केमिकल इंजिनिअर आहे',अशी शंका व्यक्त करताच ते म्हणले, “अरे, तू अजून केमिकल इंजिनिअर आहेसच कुुठे? तू तर केवळ केमिकल इंजिअरिंगचा पदवीधर आहेस.दहा वर्षे या क्षेत्रात काम करशील तेव्हा कुठे स्वतःला केमिकल इंजिनिअर म्हणवून घेण्याच्या योग्यतेचा होशील.तुला मिळालेली ऑफर तुझ्या पुस्तकी ज्ञानापेक्षा भिन्न क्षेत्रातील असली तरी अनुभवाने तू त्यातही प्रावीण्य मिळवशील.कोणत्याही परिस्थितीत तुझी शैक्षणिक पात्रता तुझ्या यशाच्या मार्गातला अडथळा बनता कामा नये.शैक्षणिक पात्रतेचा बाऊ करून तू नवनव्या क्षेत्रातील अनुभव मिळविण्याच्या संधी गमावू नको." मी हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोलाचा सल्ला मानतो. याचा उपयोग पुढच्या संंपूर्ण व्यावसायिक प्रवासात मला झाला आणि आजही होत आहे.
अशा तऱ्हेने माझी पहिली नोकरी हा दुसरा महत्वपूर्ण टप्पा म्हणता येईल. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग क्षेत्रात काही काळ काम केल्यानंतर मी आयसीआयमधील
ऑर्गनायझेशन अँण्ड मेथड्स या विभागात काम केले व युनियन कार्बाईडमधील पहिला
भारतीय संगणक व्यवस्थापक बनलो. त्यानंतर मला एका औषध कंपनीचा व्यवस्थापकीय
संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मिनू मसानी त्या कंपनीचे सल्लागार होते. मी त्यांना म्हणाले, "मी पहिला जॉब स्वीकारलाय खरा, पण मला औषधे तयार करण्याचा सोडाच पण घेण्याचाही फारसा अनभव नाही. मला हे काम जमणार याबाबत मीच साशंक आहे. मी हा अनाठाई धोका तर पत्करत नाही ना?" यावर मसानी म्हणाले, "अरे, ज्यांनी तुला हे काम दिले त्यांनी तुझ्यापेक्षाही जास्त धाेेका पत्करला आहे असं तुला वाटत नाही का?”
माझ्यां सर्व शंका क्षणात दूर झाल्या.
यानंतर मी व्हिडिओ कॅसेट निर्मिती क्षेत्रात एक छोटा प्रायोजक या नात्याने प्रवेश
केला. तसंच व्यवस्थापन विकास कार्यक्रमांमध्येही लक्ष घातलं.
अशा प्रकारे मी डॉ. काणे यांच्या सल्ल्यानुसार ठराविक कालावधीनंतर कामे बदलत राहिलो. त्यामुळे माझंं अनुभवविश्व समृध्द होत गेलं.
डॉ. काणे यांचा सल्ला मलाच नव्हे तर व्यवस्थापकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच मोलाचा आहे. व्यवस्थापकाला विविध क्षेत्रांतील अनुभव जितका जास्त तितकी त्याची कामगिरी सरस होते.त्याला कधीही एकांगी विचार करून चालत नाही.त्याची वृत्ती सतत नवीन शिकण्याची असली पाहिजे हेच डॉ. काणे यांच्या सल्लार्च सार आहे.
अमेरिकेत व्यवस्थापकीय शिक्षणाची संधी मिळणे हा माझ्या आयुष्यातील तिसरा महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणता येईल. या अभ्यासासाठी मला ‘फुलब्राईट फेलोशिप' मिळाली. ही फेलोशिप मला कशी मिळाली याची कहाणी दिलचस्प आहे.
मी अर्ज केल्यानंतर मला मुलाखतीसाठी बोलाविण्यात आलं होतं, पण या फेलोशिपसाठी व्यवस्थापनशास्त्रातील पदवी किंवा कोणत्याही क्षेत्रातील पदव्युुत्तर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आवश्यक होते. ती माझ्याजवळ नसल्याने मला मिळालेलं मुलाखतीचे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचंं मागाहून कळविण्यात आले. माझंं शिक्षण त्या वेळी बी.एस्सी. (टेक्नॉलॉजी) म्हणजेच सध्याच्या भाषेत बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग एवढंच होतं. बी.एस्सी. (टेक्नोलॉजी) ही पदवी बी.एस्सी.नंतरचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच मिळते. त्यामुळे मी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे असाच याचा अर्थ होतो असं मी त्यांना कळविलंं. मात्र त्यांनी मला मुंबई विद्यापीठाचं तसं प्रमाणपत्र ताबडतोब सादर करण्यास सांगितले.
त्यावेळी माझंं भाग्य बलवत्तर असावं. कारण मी दुपारी दीड वाजता धावत पळत मुंबई विद्यापीठाच्या कार्यालयात गेलो. ती जेवणाची वेळ असूनही असिस्टंट सबरजिस्ट्रार यांच्या कार्यालयात गेलो होतो. त्यांनी माझंं म्हणणंं ऐकून घेऊन मला आवश्यक ते प्रमाणपत्र एका तासात दिलं मी ते लगेच ‘फुलब्रााईट'च्या अधिकाऱ्यांना सादर केलं व ठरल्या वेळी माझी मुलाखत घेण्याची मागणी केली. मात्र, आपल्याला येण्यास उशीर झाल्याने आपली जागा भरण्यात आली आहे, असं सांगून त्यांनी मुलाखत घेण्यास नकार दिला. आणखी कोणी उमेदवार अनुपस्थित राहिल्यास आपला विचार करण्यात येईल, आपण वाट पाहा असा दिलासा देण्यात आला. मी संध्याकाळी साडेपाचपर्यंत वाट पाहिली, पण कोणीही अनुपस्थित राहिला नाही!