अरे रडता रडता डोळे भरले भरले
आसू सरले सरले आता हुंदके उरले
आसू सरले सरले माझा मलेच इसावा
असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा

सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली
 झाड़ गेलं निंधीसनी माघं सावली उराली
देव गेले देवा घरी आठी ठेयीसनी ठेवा
डोळ्या पुढे दोन लाल रडू नको माझ्या जीवा

रडू नको माझ्या जीवा तुले रड्याचीरे सवं
आसू हसावं रे जरा त्यात संसाराची चव
कुकू पुसलं पुसलं आता उरलं गोंधन
तेच देइल देइल नशिबले आवतन

जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतूत
तुटे मंगयसुतर उरे गयाची शपत
नका नका आया बाया नका करू माझी कीव
झालं माझं समाधान आता माझा मले जिव


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.