ईशोपनिषद्
शुक्लयजुर्वेदाच्या कण्वशाखेच्या संहितेचा चाळिसावा अध्याय म्हणजे ईशोपनिषद किंवा ईशावास्योपनिषद होय. ह्या उपनिषदाचा मंत्र भागात समावेश होतो म्हणून ह्या उपनिषदाला जास्त महत्त्व आहे. सर्व उपनिषदात ह्याला पहिले स्थान दिले जाते. या उपनिषदाचा पहिला मंत्र "ईशावास्यमिदं" असा सुरू होतो म्हणून ह्याचे नाव ईशावास्योपनिषद् असे रूढ झाले.
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
वेद | |
---|---|
ऋग्वेद · यजुर्वेद | |
सामवेद · अथर्ववेद | |
वेद-विभाग | |
संहिता · ब्राह्मणे | |
आरण्यके · उपनिषदे | |
उपनिषदे | |
ऐतरेय · बृहदारण्यक | |
ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
केन · मुंडक | |
मांडुक्य ·प्रश्न | |
श्वेतश्वतार ·नारायण | |
वेदांग | |
शिक्षा · चंड | |
व्याकरण · निरुक्त | |
ज्योतिष · कल्प | |
इतिहास | |
रामायण · महाभारत | |
इतर ग्रंथ | |
स्मृती · पुराणे | |
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
पंचतंत्र · तंत्र | |
स्तोत्रे | |
मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
शिक्षापत्री · वचनामृत |
॥ शान्तिपाठ ॥
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शान्तिः । शान्तिः । शान्तिः ॥
सच्चिदानंदस्वरूप परब्रह्म सर्व प्रकारे पूर्ण आहे आणि हे दृश्य जगत् सुद्धा पूर्णच आहे. जरी पूर्ण परब्रह्मातून हे पूर्ण जगत् व्यक्त स्थितीस आलेले असले तरीही ह्या पूर्ण ब्रह्माच्या पूर्ण स्थितीला बाधा येत नाही. ते आहे तसेच पूर्ण राहते.
ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद् धनम् ॥१॥
अर्थ - ह्या जगात जे काही उत्पन्न होणारे व विलयास जाणारे आहे ते सर्व ईशतत्त्वाचा निवास असलेले आहे. त्या ईशतत्त्वाच्या साक्षीने त्यागबुद्धी ठेवून भोग्य वस्तूंचा उपभोग घे. ही सर्व प्रकारची सृष्टीतील संपदा खरोखर कोणाच्या मालकीची आहे? कोणाचीही एकट्याची नाही, म्हणून गिधाडासारखे काहीही हव्यासाने घेऊ नकोस. ॥१॥
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत समाः । एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥२॥
अर्थ - ह्या जगात शास्त्रविहित कर्मे करता करताच शंभर वर्षे जगण्याची इच्छा केली पाहिजे. ह्या प्रकारे कर्म केल्यास तुला (मनुष्याला) कर्म बंधनकारक होत नाही. ह्याहून दुसरा कर्मबंधनातून मुक्त होण्याचा मार्ग नाही. ॥२॥
असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः । ताँस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः ॥ ३॥
अर्थ - जे अंधाराने, तमाने भरलेले लोक (स्थाने) आहेत त्यांचे नाव ’असुर्या’ लोक असे आहे. जे आत्मघात (आत्मा म्हणजेच देहादी उपाधी असे मानणे हाच आत्मघात) करतात ते मरणानंतर ह्याच ’असुर्या’ लोकाप्रत जातात. ॥३॥
अनैजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्रुवन् पूर्वमर्षत् | तद्भावतोऽन्यानत्येति तिष्ठत् । तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति ॥४॥
अर्थ - ईश्वर सर्वांच्या आधीचा आहे. त्याचे ज्ञान इतर कोणाही देवांना नाही पण तो मात्र सर्व देवांना जाणतो. तो स्वतः स्थिर असून सर्वांना चालना देतो. सर्वांपेक्षा (मनापेक्षाही) तो वेगवान आहे. त्याच्याच सत्तेच्या आधीन होऊन सर्व पंचमहाभूते काम करतात. उदा. वारा वाहतो तो ईश्वराच्या सत्तेने, स्वतःच्या सत्तेने नव्हे.
तदेजति तन्निजति तद्दूरे दद्वन्तिके । तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यतः ॥५॥
अर्थ - ते ब्रह्म (किंवा ईश्वर) चेतन आहे तसेच स्थिरही आहे. एकाच वेळी त्याच्या ठिकाणी परस्परविरोधी भाव, सामर्थ्य, गुण आणि क्रिया असू शकतात. तोच त्याच्या अचिंत्य शक्तीचा महिमा आहे. अवतार कार्य ही जी त्याची लीला आहे ते त्याचे चल रूप आहे. आणि निर्गुणनिराकारपणे राहणे; अविनाशी, अविकारी असणे हे त्याचे स्थिरत्व आहे. ज्याला श्रद्धा व प्रेम नाही त्याला त्याचे दर्शन होत नाही; म्हणूनच तो सर्वात दूर आहे. पण प्रेमाने, आर्ततेने हाक मारताच तो क्षणार्धात भक्ताजवळ येऊन उभा राहतो, म्हणून तो सर्वात जवळ आहे. तसेच जेथे अग्नी, चंद्र वा सूर्य ह्यांचा प्रकाश पोहचत नाही तेथे त्याचे परमधाम आहे; अर्थात तो फार दूर आहे. पण जीवरूपाने सर्वांच्या अंतःरंगात आहे म्हणून सर्वात जवळ आहे. ॥५॥
यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति । सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥६॥
अर्थ - ईश्वराची आराधना / भक्ती करणाऱ्या भक्ताच्या मनाची शांत स्थिती कशी असते आणि कोणत्या प्रचीतीमुळे ती तशी होते ते ह्या मंत्रात सांगितले आहे. जो स्वतःमध्ये सर्व जगाला पाहातो आणि जगातील सर्व वस्तुमात्राच्या ठिकाणी स्वतःला पाहातो; त्याला दुसऱ्या कोणाचाही व कशाचाही तिरस्कार अथवा घृणा वाटत नाही. (कारण तशी घृणा केली तर आपणच आपली घृणा केली असे होईल.) तो सर्वत्र एकच ईशतत्त्व पाहातो. ॥६॥
यस्मिन्सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद् विजानतः । तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः ॥७॥
अर्थ - पहिल्या श्लोकात "तेन त्यक्तेन भुञ्जीथाः" असे सांगितले. त्याग्यात भोग व भोगात कर्तृत्वभावनेचा त्याग आणि कोणाचेही धन (सर्व प्रकारचे सुख) हिरावून घेऊ नये हा संदेश दिला. नंतर तिरस्कार नसावा हे सांगितले. ह्या मंत्रात मोह (सुखामुळे) व शोक (दुःखामुळे) नसावेत असे सांगितले आहे आणि त्याची कारणमीमांसाही केली आहे. जर दुजेपणाच आपल्या जाणीवेत नसेल तर आपली एखादी वस्तू नष्ट झाली, दुसऱ्याने कोणीतरी नेली किंवा हवीशी वाटली पण मिळाली नाही तर मोह वाटणे किंवा शोक वाटणे ह्या गोष्टीच शक्य नाहीत. अशा व्यक्तीची शांती कशानेही ढळत नाही. त्याला सर्वत्र ऐक्याचाच अनुभव येत असतो. परमेश्वर माझ्यात आणि इतरांमध्ये एकत्वाने नांदत आहे अशी त्याची दृढ धारणा असते. त्याची बुद्धी सदैव "सम" च असते.
स पर्यगाच्छुक्रमकायमव्रणं अस्नाविरँ शुद्धमपापविद्धम् । कविर्मनीषी परिभूः स्वयंभूर्याथातत्थ्यतोऽर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ॥८॥
अर्थ - ज्याची अशी लोभ, मोह, शोकरहित समाधानी ऐक्यभावना दृढ असते तो महात्मा परमेश्वरस्वरूप होतो. परमेश्वर कसा आहे तर सर्वसाक्षी, स्वयंभू, सर्व वैभवसंपन्न, शरीर अविनाशी असलेला, तेजोमय, सर्वज्ञ, ज्ञानस्वरूप व प्राण्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना योग्य त्याच स्थितीत ठेवणारा असा आहे. ॥८॥
अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते । ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाँ रताः ॥९॥
अर्थ - अज्ञानी लोक तर ईश्वराच्या अप्राप्तीरूपी अंधारात, जेथे काही दिसत नाही त्या अंधकारात पडतात. हे अविद्येने घडते. पण विद्याभास करणारे व त्यातच सर्वस्वी बुडून राहिलेले अर्थात ज्ञानी, विद्यावंतही जाणूनबुजूनही त्या अंधारात शिरतात. ॥९॥
अन्यदेवाहुर्विद्ययाऽन्यदाहुरविद्यया । इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥१०॥
अर्थ - आत्मज्ञानी, धैर्यशील लोकांनी आम्हाला जे नीट शिकविले आहे ते आम्ही ऐकले आहे; ते म्हणजे विद्या व अविद्या ह्यांचा अर्थ अगदीच वेगळा आहे. ॥१०॥
विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह। अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥ ११॥
अर्थ - कर्म व अकर्म ह्यांचे रहस्य मोठमोठे विद्वान पुरुषही जाणत नाहीत. त्यामुळे ज्ञानाचा अभिमानी मनुष्य कर्म हे ब्रह्मप्राप्तीला बाधक समजतो आणि उचित, विहित, अटळ कर्माचाही चुकीने त्याग करतो. पण त्या त्यागामुळे त्याची कर्म बंधनातून सुटका होतच नाही कारण कर्म न करणे हेच त्याचे कर्म होते. मोहाने/रागाने त्याग केला तर तो राजस/तामस त्याग; त्याग ठरत नाही. विहित कर्म अनासक्त राहून करणे हाच त्याग होय आणि अशा कर्मानेच "मृत्युं तीर्त्वा" म्हणजे कर्मबंधनच न लागल्यामुळे जन्ममृत्युच्या साखळीतून सुटका होते. उलट ज्ञानीपणाच्या अभिमानाने स्वैर व अविहित कर्मे घडून मनुष्य प्रमादी होतो आणि पुढे मूढ योनीतही जन्माला येतो. म्हणूनच कर्म हे जरी अविद्येच्या, मायेच्या, द्वैताच्या प्रांतातले असले तरीही त्याचे अनासक्ती व ईश्वरार्पण बुद्धीच्या आश्रयाने आचरण केले तर मनुष्य मृत्युलोकातून तरतो आणि भगवंताचे स्वरूप व कार्य जाणून तो अमृतत्वास पोहोचतो.
अन्धं तमः प्रविशन्ति येऽसंभूतिमुपासते. ततो भूय इव ते तमो य उ संभूत्यां रताः ॥१२॥
अर्थ - जे लोक देव, पितर मानव आदींची उपासना करतात ते तर अज्ञानाच्या अंधारात राहतातच पण जे परमेश्वराच्या अनादिअनंत रूपाची उपासना करतात आणि तीतच मग्न असतात ते ही पुन्हा जास्तच अंधारात प्रवेश करतात. ॥१२॥
अन्यदेवाहुः संभवादन्यदाहुरसंभवात् । इति शुश्रुम धीराणां ये नस्तद् विचचक्षिरे ॥१३॥
अर्थ - परमेश्वराची सर्वात्मभावाने उपासना करणे हाच ’संभव’ (संभूति) खरा अर्थ होय. तसेच परमेश्वराची आज्ञापालन करण्याचा भाग म्हणून देव, ब्राह्मण, गुरु, माता, पिता आदींचा पूज्य भावाने आदर करणे, त्यांची पूजा, सेवा करणे हा ’असंभव’ (असंभूति) चा खरा अर्थ होय. म्हणजेच विनाशशील आराध्य दैवताच्या ठिकाणीही परमेश्वराच्या अविनाशी स्वरूपाचीच आराधना करण्याची भावना ठेवणे, तसेच स्वतःकडे कर्तेपणाचा अभिमान न धरणे होय.
संभूतिं च विनाशं च यस्तद् वेदोभयóè सह । विनाशेन मृत्युं तीर्त्वा सम्भूत्याऽमृतमश्नुते ॥१४॥
अर्थ - अविनाशी परब्रह्म जो जाणतो व विनाशशील देवादिकांनाही जाणतो, तो त्या देवतांच्या उपासनेतूनही मृत्युवर मात करतो आणि परमेश्वराच्या आराधनेने तर तो पूर्ण अमृतत्त्व प्राप्त करतो. विनाशशील देवांकडून मिळणारे फळ क्षणजीवी आहे. जेवढे भोग्य पदार्थ आहेत ते सगळे परिणामी दुःखच देणारे असतात. पण त्या सर्वांत जी मूळ सत्ता आहे, शक्ती आहे ती परमेश्वराचीच आहे आणि देवादिकांसाठी जरी आपण उपासना केली तरी ती परमेश्वराचीच उपासना असते; अशा स्पष्ट धारणेने साधक जरी अन्य देवतांची उपासना करील तरीही तो मृत्युंजय होईल आणि संभूती म्हणजे परमेश्वराचेच व्यापक रूप जो मनी आणून त्याची आराधना करील तो ही जन्म-मरणापलीकडे शाश्वत अमृतरूप असा होईल. ॥१४॥
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । तत्त्वं पूषन्नापावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥१५॥
अर्थ - सत्यावर मायेचे आवरण पडलेले आहे, ते आवरण दूर कर अशी पूषन् नामक सूर्यदेवतेची प्रार्थना ह्या श्लोकात आहे. परमेश्वराचे दर्शन घडण्याच्या बाबतीत "सोन्याचे पात्र" आड येते. परमेश्वराने कृपा करून मूळच्या आपल्या अव्यक्त रूपावर आलेले मायेचे आवरण दूर करावे. त्यानेच आमच्या दृष्टीला सत्य काय ते कळेल. साधक स्वप्रयत्नाने नित्यानित्यविवेक करील. पण सत्यस्वरूपाचा साक्षात्कार परमेश्वरी कृपेनेच होतो. सांसारीक जीवनात सुखोपभोग हे माणसाला मोठे विलोभनीय वाटतात म्हणून सोन्याचे पात्र अशा रूपकाचा उपयोग केला गेला आहे. ॥१५॥
पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह । तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसौ पुरुषः सोऽहमस्मि ॥१६॥
अर्थ - येथे पूषा, ऋषी, यम, सूर्य, प्राजापत्य इ. नावांनी ईश्वराला संबोधित केले आहे आणि अशी प्रार्थना केली आहे की, हे ईश्वरा, तुझे जे उत्तम कल्याणकारक रूप मी पाहिन, ज्या तुझ्या परमरूपाचे मी ध्यान करीन तो मीच आहे असा मला अनुभव येवो. ॥१६॥
वायुरनिलममृतमथेदं भस्मान्तóèशरीरम् । ॐ क्रतो स्मर कृतóèस्मर क्रतो स्मर कृतं स्मर ॥१७॥
अर्थ - प्राणापानादि वायू आणि सृष्टीतील वायू मिळून हे शरीर भस्म होऊन जावो पण आत्मरूपात अमरत्वच राहू दे. ह्या देहाचाही यज्ञ होऊ दे. हे यज्ञमय परमेश्वरा, माझे सर्व कर्म लक्षात घे आणि कर्माचा निवाडा करून मला अमृतमय अर्थात मुक्त कर. ॥१७॥
अग्ने नय सुपथा राये अस्मान् । विश्वानि देव वयुनानि विद्वान् युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां । ते नम उक्तिं विधेम ॥१८॥
अर्थ - हे अग्ने, आम्हाला चांगल्या मार्गाने आणि जगातील सर्वोच्च असे धन किंवा संपदा म्हणजे परमेश्वराची भक्ती ती आम्हाला मिळो. हे देवा, तू ज्ञानी असून सर्व कर्मे जाणतोसच. जी आमच्या मार्गात अडथळा आणणारी पापे आहेत ती तू युद्ध करून नष्ट कर. आम्ही तुला वारंवार नमस्कार करतो. ॥१८॥
॥ शान्तिपाठ ॥
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शान्तिः । शान्तिः । शान्तिः ॥
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |