एकनाथी भागवत/अध्याय चौदावा

<poem>

एकनाथी भागवत - आरंभ ॥ श्रीगणेषाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो स्वामी सद्गु रू । तूं निजांगें क्षीर सागरू । तुझा उगवल्या प्रबोधचंद्रू । आल्हादकरू जीवासी ॥१॥ ज्या चंद्राचे चंद्रकरीं । निबिड अज्ञान अंधारीं । त्रिविध ताप दूर करी । हृदयचिदंबरीं उगवोनी ॥२॥ ज्या चंद्राचे चंद्रकिरण । आर्तचकोरांलागीं जाण । स्वानंदचंद्रामृतें स्त्रवोन । स्वभावें पूर्ण करिताती ॥३॥ अविद्याअंधारीं अंधबंधे । संकोचलीं जीवदेहकुमुदें । तीं ज्याचेनि किरणप्रबोधें । अतिस्वानंदें विकासलीं ॥४॥ जो चंद्र देखतांचि दिठीं । सुख होय जीवाच्या पोटीं । अहंसोमकांतखोटी । उठाउठी विरवितू ॥५॥ पूर्णिमा पूर्णत्वें पूर्ण वाढे । देखोनि क्षीराब्धी भरतें चढे । गुरुआज्ञामर्यादा न मोडे । स्वानंद चढे अद्वयें ॥६॥ सद्गुजरु क्षीराब्धी अतिगहन । सादरें करितां निरीक्षण । वेदांतलहरीमाजीं जाण । शब्दचिद्रत्नें भासती ॥७॥ तेथ विश्वासाचा गिरिवर । वैराग्यवासुकी रविदोर । निजधैर्याचे सुरासुर । मंथनतत्पर समसाम्यें ॥८॥ मथनीं प्रथम खळखळाटीं । लयविक्षेप हाळाहळ उठी । तें विवेकनीळकंठें कंठीं । निजात्मदृष्टीं गिळिलें ॥९॥ मग अभ्यास प्रत्यगावृत्ती । क्रियेसी झाली विश्रांती । प्रकटली रमा निजशांती । जीस श्रीपती वश्य झाला ॥१०॥ तेथ ब्रह्मरस आणि भ्रमरस । इंहीं युक्त अमृतकलश । मथनीं निघाला सावकाश । ज्याचा अभिलाष सुरासुरां ॥११॥ ते विभागावयालागुनी । माधवचि झाला मोहिनी । अहंराहूचें शिर छेदूनी । अमृतपानी निवविले ॥१२॥ ते वृत्तिरूप मोहिनी । पालटली तत्क्षणीं । ठेली नारायण हो‍उनी । पहिलेपणीं उठेना ॥१३॥ ते क्षीरसागरीं नारायण । समाधि शेषशयनीं आपण । सुखें सुखावला जाण । अद्यापि शयन केलें असे ॥१४॥ ऐसा सद्गुारु चित्सागरु । ज्याचा वेदांसी न कळे पारू । नारायणादि नानावतारू । ज्याचेन साचारू उपजती ॥१५॥ ज्याचीं चिद्रत्नेंू गोमटीं । हरिहरांचें कंठीं मुकुटीं । बाणलीं शोभती वेदपाठीं । कविवरिष्ठीं वानिलीं ॥१६॥ ऐशिया जी अतिगंभीरा । जनार्दना सुखसागरा । अनंतरूपा अपारा । तुझ्या परपारा कोण जाणे ॥१७॥ विवेकें न देखवे दिठीं । वेदां न बोलवे गोठी । तेथ हे माझी मराठी । कोणे परिपाटी सरेल ॥१८॥ हो कां राजचक्रवर्तीचे माथां । कोणासी न बैसवे सर्वथा । तेथ माशी जाऊनि बैसतां । दुर्गमता तंव नाहीं ॥१९॥ कां राजपत्नीनचे स्तन । देखावया शके कोण । परी निजपुत्र तेथें जाण । बळें स्तनपान करीतसे ॥२०॥ तेवीं माझी हे मराठी । जनार्दनकृपापरिपाटीं । निःशब्दाच्या सांगे गोठी । चिन्मात्रीं मिठी घालूनी ॥२१॥ असो आकाश घटा सबाह्य आंतू । तेवीं शब्दामाजीं निःशब्दवस्तू । रिता बोल रिघावया प्रांतू । उरला प्रस्तुतू दिसेना ॥२२॥ बाळक बोलों नेणे तत्त्वतां । त्यासी बोलिकें बोलवी पिता । तैसीच हेही जाणावी कथा । वाचेचा वक्ता जनार्दन ॥२३॥ त्या जनार्दनाचे कृपादृष्टीं । भागवत सांगों मराठिये गोष्टी । जें कां आलोडितां ग्रंथकोटी । अर्थी दृष्टी पडेना ॥२४॥ तेंचि श्रीमहाभागवत । जनार्दनकृपें येथ । देशभाषा हंसगीत । ज्ञान सुनिश्चित सांगीतलें ॥२५॥ सद्भाषवें करितां माझी भक्ती । तेणें ज्ञानखड्गाची होय प्राप्ती । छेदोनि संसारआसक्ती । सायुज्यमुक्ती मद्भेक्तां ॥२६॥ माझेनि भजनें मोक्ष पावे । ऐसें बोलिलें जें देवें । तें आइकोनियां उद्धवें । विचारू जीवें आदरिला ॥२७॥ देवो सांगे भजनेंचि मुक्ती । आणि ज्ञात्यांची व्युत्पत्ती । आणिकें साधनें मोक्षाप्रती । सांगताती आनआनें ॥२८॥ एवं या दोहीं पक्षीं जाण । मोक्षीं श्रेष्ठ साधन कोण । तेचि आशंकेचा प्रश्न । उद्धवें आपण मांडिला ॥२९॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला श्रीउद्धव उवाच । वदंति कृष्ण श्रेयांसि बहूनि ब्रह्मवादिनः । तेषां विकल्पप्राधान्यमुताहो एकमुख्यता ॥ १ ॥

उद्धव म्हणे गा श्रीपती । मोक्षमार्गीं साधनें किती । वेदवादियांची व्युत्पत्ती । बहुत सांगती साधनें ॥३०॥ तीं अवघींच समान । कीं एक गौण एक प्रधान । देवें सांगीतलें आपण । भक्तीचि कारण मुक्तीसी ॥३१॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

भवतोदाहृतः स्वामिन् भक्तियोगोऽनपेक्षितः । निरस्य सर्वतः सङ्गं येन त्वय्याविशेन्मनः ॥ २ ॥

आणिकां साधनां नापेक्षिती । सर्व संगांतें निरसिती । मोक्षमार्गीं मुख्य भक्ती । जिणें स्वरूपप्राप्ती तत्काळ ॥३२॥ माझ्या स्वरूपीं ठेवूनि मन । फळाशेवीण माझें भजन । हेंचि मोक्षाचें मुख्य साधन । देवें आपण बोलिलें ॥३३॥ स्वामी बोलिले मुख्य भक्ती । इतर जे साधनें सांगती । त्यांसी प्राप्तीची अस्तिनास्ति । देवें मजप्रती सांगावी ॥३४॥ याचि प्रश्नाची प्रश्नस्थिती । विवंचीतसे श्रीपती । त्रिगुण ज्ञात्याची प्रकृती । साधनें मानिती यथारुचि ॥३५॥ ज्याची आसक्ती जिये गुणीं । तो तेंचि साधन सत्य मानी । यापरी ज्ञानाभिमानी । नाना साधनीं जल्पती ॥३६॥ परंपरा बहुकाळें । ज्ञात्याचें ज्ञान झालें मैळें । तें सत्य मानिती तुच्छ फळें । ऐक प्रांजळें उद्धवा ॥३७॥ चौदाव्यामाजीं निरूपणस्थिती । इतुकें सांगेल श्रीपती । साधनांमाजीं मुख्य भक्ती । ध्यानयोगस्थिती समाधियुक्त ॥३८॥ इतर साधनांचें निराकरण । तुच्छफलत्वें तेंही जाण । सात श्लोकीं श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगतू ॥३९॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

श्रीभगवानुवाच । कालेन नष्टा प्रलये वाणीयं वेदसंज्ञिता । मयाऽऽदौ ब्रह्मणे प्रोक्ता धर्मो यस्यां मदात्मकः ॥ ३ ॥

माझी वेदवाणी प्रांजळी । ज्ञानप्रकाशें अतिसोज्ज्वळी । ते नाशिली प्रळयकाळीं । सत्यलोकहोळी जेव्हां झाली ॥४०॥ ब्रह्मयाचा प्रळयो होतां । वेदवाणीचा वक्ता । कोणी नुरेचि तत्त्वतां । यालागीं सर्वथा बुडाली ॥४१॥ तेचि वेदवाणी कल्पादीसी । म्यांचि प्रकाशिली ब्रह्मयासी । जिच्याठायीं मद्भपक्तीसी । यथार्थेंसी बोलिलों ॥४२॥ जे वाचेचें अनुसंधान । माझे स्वरूपीं समाधान । ऐसें माझें निजज्ञान । ब्रह्मयासी म्यां जाण सांगीतलें ॥४३॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

तेन प्रोक्ता च पुत्राय मनवे पूर्वजाय सा । ततो भृग्वादयोऽगृह्णन् सप्त ब्रह्ममहर्षयः ॥ ४ ॥

तो सकळ वेद विवंचूनू । ब्रह्मेनि उपदेशिला मनू । सप्त ब्रह्मर्षी त्यापासूनू । वेद संपूर्णू पावले ॥४४॥ ब्रह्मेनि दक्षादि प्रजापती । उपदेशिले त्याचि स्थिती । यापासून नेणों किती । ज्ञानसंपत्ती पावले ॥४५॥ सप्तऋषींची जे मातू । भृगु मरीचि अत्रि विख्यातू । अंगिरा पुलस्त्य पुलह ऋतू । जाण निश्चितू ऋषिभागू ॥४६॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ व ६ वा

तेभ्यः पितृभ्यस्तत्पुत्रा देवदानवगुह्यकाः । मनुष्याः सिद्धगंधर्वाः सविद्याधरचारणाः ॥ ५ ॥

किन्देवाः किन्नरा नागा रक्षःकिम्पुरुषादयः । बह्व्यस्तेषां प्रकृतयो रजःसत्त्वतमोभुवः ॥ ६ ॥

तिंहीं ऋषीश्वरीं पुत्रपौत्र । उपदेशिले नर किन्नर । देव दानव अपार सिद्ध । विद्याधर चारण ॥४७॥ गुह्यक गंधर्व राक्षस । किंदेव आणि किंपुरुष । नागसर्पादि तामस । परंपरा उपदेश पावले ॥४८॥ मुखाकृती दिसती नर । शरीरें केवळा वनचर । ऐसे जे कां रीस थोर । त्यांसी किन्नर बोलिजे ॥४९॥ मुखाभासें दिसती पुरुष । शरीर पाहतां श्वापदवेष । ऐसे जे वानर रामदास । त्यांसी किंपुरुष बोलिजे ॥५०॥ स्वेददुर्गंधिकल्मषरहित । शरीरें अतिभव्य भासत । मनुष्यदेवांऐसे दिसत । ते बोलिजेत किंदेव ॥५१॥ यापरींच्या बहुधा व्यक्ती । रजतमादि सत्त्वप्रकृती । उपदेशपरंपरा प्राप्ति । ज्ञान बोलती यथारुचि ॥५२॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

याभिर्भूतानि भिद्यन्ते भूतानां मतयस्तथा । यथाप्रकृति सर्वेषां चित्रा वाचः स्रवन्ति हि ॥ ७ ॥

जैशा प्रकृति तैशी भावना । जैसा गुण तशी वासना । जे वासनेस्तव जाणा । भूतीं विषमपणा आणी भेदु ॥५३॥ देवमनुष्यतिर्यगता । हे वासनेची विषमता । येवढा भेद करी भूतां । अनेकता यथारुचि ॥५४॥ ज्यांची जैशी प्रकृती । ते तैसा वेदार्थू मानिती । तेंचि शिष्यांसी सांगती । परंपरास्थिती उपदेशू ॥५५॥ विचित्र वेदार्थ मानणे । विचित्र संगती साधनें । विचित्र उपदेश करणें । प्रकृतिगुणें मतवाद ॥५६॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

एवं प्रकृतिवैचित्र्याद् भिद्यन्ते मतयो नृणाम् । पारम्पर्येण केषाञ्चित् पाषण्डमतयोऽपरे ॥ ८ ॥

यापरी गा निजप्रकृती । वाढली जाण नाना मतीं । तो मतवाद ठसावला चित्तीं । यथानिगुतीं सत्यत्वें ॥५७॥ मिथ्या स्वप्न जेवीं निद्रिता । सत्य मानलेंसे सर्वथा । तेवीं नानामतवादकथा । सत्य तत्त्वतां मानिती ॥५८॥ हे वेदपढियंत्यांची कथा । ज्यांसी वेदीं नाहीं अधिकारता । त्यांसी उपदेशपरंपरता । नानामतता सत्य माने ॥५९॥ एकाची वेदबाह्य व्युत्पत्ती । ते आपुलालिये स्वमतीं । पाषंडाते प्रतिष्ठिती । तेंच उपदेशिती शिष्यातें ॥६०॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

मन्मायामोहितधियः पुरुषाः पुरुषर्षभ । श्रेयो वदन्त्यनेकान्तं यथाकर्म यथारुचि ॥ ९ ॥

नाना वासनागुणानुवृत्ती । नाना परींच्या पुरुषप्रकृती । यांसी माझी माया मूळकर्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥६१॥ माझिया मायें मोहिले वरिष्ठ । जन केले विवेकनष्ट । भुलवूनियां मोक्षाची वाट । विषयनिष्ठ विवेकू ॥६२॥ ऐक उद्धवा पुरुषश्रेष्ठा । यापरी भ्रंशली जनांची निष्ठा । चुकोनि मोक्षाचा दारवंटा । साधनकचाटा जल्पती ॥६३॥ त्या नाना साधनांच्या युक्ती । ज्या मतवादें प्रतिपादिती । त्याही दीड श्लोकीं श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥६४॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

धर्ममेके यशश्चान्ये कामं सत्यं दमं शमम् । अन्ये वदन्ति स्वार्थं वा ऐश्वर्यं त्यागभोजनम् । केचिद् यज्ञतपो दानं व्रतानि नियमान्यमान् ॥ १० ॥

मीमांसकाचे मत येथ । काम्य निषिद्धरहित । कर्मचि साधन मानित । मोक्ष येणें प्राप्त म्हणताती ॥६५॥ काव्य नाटक अळंकार करिती । ते कवित्वचि साधन मानिती । कविताप्रबंधव्युत्पत्ती । मोक्ष मानिती तेणें यशें ॥६६॥ कवीश्वरांचें मत ऐसें । आपुले कवित्वाचेनि यशें । मोक्ष लाहों अनायासें । हें कवितापिसें कवीश्वरां ॥६७॥ वात्स्यायनकोकशास्त्रमत । त्यांचा अभिप्रायो विपरीत । कामसुखें मोक्ष मानित । काम सतत सेवावा ॥६८॥ सांख्य-योगांची वदंती । सत्य-शम-दमादि संपत्ती । हेंचि साधन मोक्षाप्रती । नेम निश्चितीं तिंहीं केला ॥६९॥ नीतिशास्त्रकारांचें मत । सार्वभौम राज्य प्राप्त । त्यातेंचि मोक्ष मानित । सामदानादि तेथ साधन ॥७०॥ एकांचा मतविभाग । शिखासूत्रमात्रत्याग । त्याचें नांव मोक्षमार्ग । परम श्लाघ्य मानिती ॥७१॥ देहात्मवाद्यांचा योग । स्वेच्छा भोगावे यथेष्ट भोग । कैंचा नरक कैंचा स्वर्ग । मेल्या मग कोण जन्मे ॥७२॥ अश्वमेध राजसूययाग । हाचि एकांचा मोक्षमार्ग । एकां मूर्तिउपासना सांग । पूजाविभाग तें साधन ॥७३॥ एकाचें मत साक्षेप । कडकडाटेंसी खटाटोप । शरीरशोषणादि जें तप । तो मार्ग समीप मोक्षाचा ॥७४॥ एक म्हणती श्रेष्ठ साधन । मोक्षमार्गीं केवळ दान । दीक्षित म्हणती व्रतग्रहण । हेंचि साधन मोक्षाचें ॥७५॥ एकांच्या मताचा अनुक्रम । अवश्य करावे व्रत नियम । एवं मतानुसारें उपक्रम । नानासाधनसंभ्रम बोलती ॥७६॥ या साधनांची पाहतां स्थिती । आद्यंतवंत निश्चितीं । तेंचि पैं उद्धवाप्रती । कृष्ण कृपामूर्ती सांगत ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

आद्यन्तवन्त एवैषां लोकाः कर्मविनिर्मिताः । दुःखोदर्कास्तमोनिष्ठाः क्षुद्रानन्दाः शुचार्पिताः ॥ ११ ॥

सांडूनि फळाशा देहाभिमान । मज नार्पिती जे साधन । त्यांचें फळ दुःखरूप जाण । जन्ममरणदायक ॥७८॥ तिंहीं साधनीं साधिले लोक । ते अंतवंत नश्वर देख । ते लोकींचें जें सुख । साखरेंसीं विख रांधिलें ॥७९॥ त्याचे जिव्हाग्रीं गोडपण । परिपाकीं अचूक मरण । तैसा तो क्षुद्रानंद जाण । शोकासी कारण समूळ ॥८०॥ निजकर्में मलिन लोक । त्यांच्या ठायीं कैंचें सुख । उत्तरोत्तर वाढते दुःख । अंधतमदायक परिपाकू ॥८१॥ भोगासक्त जें झालें मन । त्यासी अखंड विषयांचें ध्यान । विषयाध्यासें तमोगुण । अधःपतनदायक ॥८२॥ इंहींच साधनीं माझी भक्ती । जो कोणी करील परमप्रीतीं । ते भक्तीची मुख्यत्वें स्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥८३॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

आद्यन्तवन्त एवैषां लोकाः कर्मविनिर्मिताः । दुःखोदर्कास्तमोनिष्ठाः क्षुद्रानन्दाः शुचार्पिताः ॥ ११ ॥

सांडूनि फळाशा देहाभिमान । मज नार्पिती जे साधन । त्यांचें फळ दुःखरूप जाण । जन्ममरणदायक ॥७८॥ तिंहीं साधनीं साधिले लोक । ते अंतवंत नश्वर देख । ते लोकींचें जें सुख । साखरेंसीं विख रांधिलें ॥७९॥ त्याचे जिव्हाग्रीं गोडपण । परिपाकीं अचूक मरण । तैसा तो क्षुद्रानंद जाण । शोकासी कारण समूळ ॥८०॥ निजकर्में मलिन लोक । त्यांच्या ठायीं कैंचें सुख । उत्तरोत्तर वाढते दुःख । अंधतमदायक परिपाकू ॥८१॥ भोगासक्त जें झालें मन । त्यासी अखंड विषयांचें ध्यान । विषयाध्यासें तमोगुण । अधःपतनदायक ॥८२॥ इंहींच साधनीं माझी भक्ती । जो कोणी करील परमप्रीतीं । ते भक्तीची मुख्यत्वें स्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥८३॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

मय्यर्पितात्मनः सभ्य निरपेक्षस्य सर्वतः । मयाऽऽत्मना सुखं यत्तत् कुतः स्याद् विषयात्मनाम् ॥ १२ ॥

भक्ती निजसुखाची मातू । सांगावया उद्धवासी संबोधितू । भक्तिसुखालागीं भाग्यवंतू । तूंचि निश्चितू उद्धवा ॥८४॥ भक्तिसुखाचें भाग्य यासी । म्हणोनि सभ्य म्हणणें त्यासी । ऐसें पुरस्कारोनि उद्धवासी । भक्तिसुखासी देवो सांगे ॥८५॥ पावावया माझी स्वरूपप्राप्ती । इहलोकींची भोगासक्ती । निःशेष नातळे चित्तवृत्ती । जेवीं निजपती रजस्वला ॥८६॥ साधूनि माझिया अनुसंधाना । परलोक नातळे वासना । धिक्कारी पैं ब्रह्मसदना । इतर गणना कोण पुसे ॥८७॥ ऐशिया गा निरपेक्षता । माझेनि भजनें सप्रेमता । तेथ मी जाण स्वभावतां । प्रकटें तत्त्वतां निजरूपें ॥८८॥ मी प्रकटलों हें ऐसें । बोलणें तें आहाच दिसे । सदा मी हृदयींचि वसें । प्रकटलों दिसें निर्विकल्पें ॥८९॥ आभाळ गेलिया सविता । सहजेंचि दिसे आंतौता । तेवीं गेलिया विषयावस्था । मी स्वभावतां प्रकटचि ॥९०॥ एवं भक्ताचिया भावार्था । भावबळें मज प्रकटतां । तेव्हां भक्ताचिया चित्ता । विषयवार्ता स्फुरेना ॥९१॥ सांडूनि विषयावस्था । मद्‌रूपीं लागल्या चित्ता । भक्तासी होय मद्‌रूपता । स्वभावतां निजबोधें ॥९२॥ लोह एकांगें स्पर्शमणी । लागतां सर्वांग होय सुवर्णी । तेवीं मद्भंक्त माझ्या ध्यानीं । चिद्‌रूपपणीं सर्वांग ॥९३॥ ते काळीं सहजसुख । भक्तांसी जें होय देख । त्यासी तुकावया तुक । कैंचें आणिक कांटाळें ॥९४॥ ज्या निजसुखाकारणें । सदाशिवू सेवी श्मशानें । ब्रह्मा तें सुख काय जाणे । त्याकारणें म्यां उपदेशिलें ॥९५॥ भक्तीं भोगितां माझें सुख । विसरले देहादि जन्मदुःख । विसरले ते तहानभूक । निजात्मसुख कोंदलें ॥९६॥ ऐशिया निजसुखाची गोडी । विषयी काय जाणती बापुडीं । वेंचितां लक्षालक्षकोडीं । त्या सुखाचा कवडी लाभेना ॥९७॥ धन धान्य पुत्र स्वजन । सर्वस्व वेंचितांही जाण । त्या सुखाचा रजःकण । विषयी जन न लभती ॥९८॥ हो कां सत्यलोकनिवासी । तेही न पावती त्या सुखासी । इतरांची कथा कायसी । मुख्य प्रजापतीसी हें सुख कैंचें ॥९९॥ मज निजात्म्याचे सुखप्राप्ती । सकळ इंद्रियें सुखरूप होती । त्या सुखाची सुखस्थिती । लोकांतरप्राप्ती कोट्यंशें न तुके ॥१००॥ निष्काम निर्लोभ निर्दंभ भजन । निर्मत्सर निरभिमान । ऐशिया मद्भरक्तांसी जाण । माझें सुख संपूर्ण मी देतों ॥१॥ जे कां देशतः कालता । अनवच्छिन्न गा वस्तुतां । ऐशिया निजसुखाचे माथां । माझिया निजभक्तां रहिवासू ॥२॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

अकिञ्चनस्य दान्तस्य शान्तस्य समचेतसः । मया सन्तुष्टमनसः सर्वाः सुखमया दिशः ॥ १३ ॥

ऐक अकिंचनाची गोठी । नाहीं मठ मठिका पर्णकुटी । पांचापालवीं मोकळ्या गांठी । त्यांसी ये भेटी निजसुख माझें ॥३॥ जो दमनशीळ जगजेठी । अकरांचीही नळी निमटी । तो निजसुखाचे साम्राज्यपटीं । बैसे उठाउठीं तत्काळ ॥४॥ देखतां नानाभूत विषमता । ज्यासी साचार दिसे समता । तो माझिया निजसुखाचे माथां । क्रीडे सर्वार्थता समसाम्यें ॥५॥ सर्पत्वचा जेवीं पांपरीं । माथां हालविल्या फडा न करी । तेवीं धनदारागृहपुत्रीं । छळितां ज्या भीतरीं क्रोध नुमसे ॥६॥ कामक्रोध मावळले देहीं । साचार शांति ज्याच्याठायीं । माझें निजसुख त्याच्या पायीं । लोळत पाहीं सर्वदा ॥७॥ तो जरी तें सुख नेघे । तरी तें सुख तयापुढेंमागें । जडोनि ठेलें जी सर्वांगें । सांडितां वेगें सांडेना ॥८॥ तो जेउती वास पाहे । तें दिग्मंडळ सुखाचें होये । तो जेथ कां उभा राहे । तेथ मुसावलें राहे महासुख ॥९॥ त्याचें पाऊल जेथे पडे । तेथें निजसुखाची खाणी उघडे । तो प्रसंगें पाहे जयाकडे । तेथें स्वानंदें वाढे परमानंद ॥११०॥ तो ज्यासी भेटे अदृष्टें । त्यास सुखाची पहांट फुटे । त्याचा पावो लागलिया अवचटें । सुखाचें गोमटें निजसुख लाभे ॥११॥ ज्याचे श्वासोच्छ्वासांचा परिचार । कीं निमेषोन्मेषांचे व्यापार । माझेनि निजसुखें साचार । तेथेंचि घर बांधलें ॥१२॥ तो सकळ सुखांचा मंडपू । कीं निजसुखाचा कंदर्पू । तो सर्वांगें सुखस्वरूपू । सबाह्य सुखरूपू समसुखत्वें ॥१३॥ त्याचे सुखाची परिपूर्णता । पुढिले श्लोकें तत्त्वतां । स्वयें देवोचि झाला सांगता । सुखसंपन्नता भक्ताची ॥१४॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

न पारमेष्ठ्यं न महेन्द्रधिष्ण्यं । न सार्वभौमं न रसाधिपत्यम् । न योगसिद्धीरपुनर्भवं वा । मय्यर्पितात्मेच्छति मद् विनान्यत् ॥ १४ ॥

माझे ठायीं अर्पितचित्त । ऐसे माझे निजभक्त । माझेनि सुखें सुखी सतत । ते अनासक्त सर्वार्थीं ॥१५॥ माझ्याठायीं नित्यभक्ती । आणि लोकलोकांतरआसक्ती । ते भक्ति नव्हे कामासक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१६॥ सकळ द्वीपांसमवेत । सार्वभौम वलयांकित । येऊनियां होतां प्राप्त । माझे निजभक्त थुंकिती ॥१७॥ विष्ठेमाजील सगळे चणे । ते सूकरासी गोडपणें । त्यांतें कांटाळती शहाणे । तेवीं मद्भडक्तीं सांडणें सार्वभौमता ॥१८॥ रसातळादि समस्त । पाताळीं भोग अमृतयुक्त । ते प्राप्त होतां माझे भक्त । लाता हाणत अनिच्छा ॥१९॥ खात्या सांडूनि अमृतफळा । शाहाणा न घे पेंडीचा गोळा । तेवीं सांडूनि सुखसोहळा । भक्त रसातळा न वचती ॥१२०॥ सुर नर पन्नग वंदिती । येणें महत्त्वें आलिया अमरावती । जेवीं कां कस्तूरीपुढें माती । तेवीं उपेक्षिती मद्भ क्त ॥२१॥ जें इंद्रादिकां वंद्य स्थान । उत्तमोत्तम ब्रह्मसदन । तें तुच्छ करिती भक्तजन । जे सुखसंपन्न मद्भारवें ॥२२॥ ताक दूध पाहतां दिठीं । सारिखेंपणें होतसे भेटी । सज्ञान दूध लाविती ओंठीं । त्यागिती वाटी ताकाची ॥२३॥ तेवीं सत्यलोक आणि भक्तिसुख । समान मानिती केवळ मूर्ख । मद्भा वें माझे भक्त जे चोख । ते सत्यलोक धिक्कारिती ॥२४॥ इंद्रपद ब्रह्मसदन । पाताळभोग अमृतपान । एके काळें द्यावया जाण । सर्वसिद्धी आपण आलिया ॥२५॥ ज्या साधावया महासिद्धी । योगी शिणताती नाना विधी । त्या प्रकटल्या त्रिशुद्धी । भक्त सद्बुधद्धी नातळती ॥२६॥ त्या अणिमादि सिद्धींच्या माथां । मद्भ क्तीं हाणोनि लाता । लागले माझ्या भक्तिपंथा । जाण तत्त्वतां उद्धवा ॥२७॥ या सिद्धींची कायसी कथा । सलोकता समीपता । माझी देतां स्वरूपता । भक्त सर्वथा न घेती ॥२८॥ जेथ न रिघेचि काळसत्ता । नाहीं जन्ममरणवार्ता । ऐशी देतां माझी सायुज्यता । भक्त सर्वथा न घेती ॥२९॥ आधीं असावें वेगळेपणें । मग सायुज्यें एक होणें । हें मूळचें अबद्ध बोलणें । सायुज्य न घेणें मद्भ।क्तीं ॥१३०॥ भक्तिसुखें सुखावली स्थिती । यालागीं आवडे माझी भक्ती । पायां लागती चारी मुक्ती । भक्त न घेती मजवीण ॥३१॥ एक मजवांचूनि कांहीं । भक्तांसी आणिक प्रिय नाहीं । माझेनि भजनसुखें पाहीं । लोकीं तिहीं न समाती ॥३२॥ आदिकरूनि चारी मुक्ती । मजवेगळी जे सुखप्राप्ती । भक्त सर्वथा न घेती । माझ्या अभेदभक्ती लोधले ॥३३॥ मजवेगळें जें जें सुख । तुच्छ करूनि सांडिती देख । माझ्या भजनाचा परम हरिख । अलोलिक मद्भाक्तां ॥३४॥ म्हणाल भक्त केवळ वेडीं । तुझ्या भजनीं धरिती गोडी । परी तुज तयांची आवडी । नसेल गाढी अतिप्रीती ॥३५॥ जेवीं गोचिडां आवडे म्हशी । परी गोचीड नावडे तिसी । तेवीं भक्तांची प्रीती तुजसरिसी । तुज त्यांची प्रीति नसेल ॥३६॥ भज्य भजन भजता । हे त्रिपुटी आविद्यकता । अविद्यायुक्त भजनपंथा । नसेल सर्वथा तुज प्रीती ॥३७॥ जेवीं कां स्वप्नींचे आंवतणें । जागत्यासी नाहीं जेवूं जाणें । तेवीं अविद्यायुक्त मिथ्याभजनें । त्वां प्रीती करणें हें घडेना ॥३८॥ ऐसा आशंकेचा अभिप्रावो । तेचि अर्थीं सांगताहे देवो । भजनीं भक्तांचा शुद्ध भावो । तेथ मजही पहा हो अतिप्रीती ॥३९॥ जो जैसा मजकारणें । मी तैसाचि त्याकारणें । भक्त अनन्य मजकारणें । मीही त्यांकारणें अनन्य ॥१४०॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शङ्करः । न च सङ्कर्षणो न श्रीर्नैवात्मा च यथा भवान् ॥ १५ ॥

माझ्या भक्तांची मज प्रीती । ते मीचि जाणें श्रीपती । ते उपमेलागीं त्रिजगतीं । नाही निश्चिती कांटाळें ॥४१॥ जो अनन्य झाला माझे भक्ती । तेव्हांचि त्याची अविद्यानिवृत्ती । ऐशिया भक्तांची जे मज प्रीती । ते सांगूं मी किती उद्धवा ॥४२॥ ब्रह्मा माझे पोटींचें बाळ । त्याचे लळे मी पुरवीं सकळ । परी भक्तांच्या ऐसा प्रबळ । प्रीतिकल्लोळ तेथ नाहीं ॥४३॥ म्यां ब्रह्मा लाविला कर्मपंथा । भक्तांसी दिधली निष्कर्मता । यालागीं न वचें मी ब्रह्मा प्रार्थितां । होय भात खाता गोवळ्यांचा ॥४४॥ उणें आणूनि ब्रह्मयासी । मी तों झालों वत्सें वत्सपांसी । एवं निजभक्तांच्या ऐसी । प्रीती ब्रह्मयासी मज नाहीं ॥४५॥ असो ब्रह्मयाची ऐशी कथा । संकर्षण माझा ज्येष्ठ भ्राता । परी भक्तांच्या ऐशी सर्वथा । नसे प्रीती तत्त्वतां तयासी ॥४६॥ कौरवांच्या पक्षपातासी । उणें आणोनि बळिभद्रासी । म्यां वांचविलें निजभक्तांसीं । पांडवांसी निजांगें ॥४७॥ तुजदेखतां भीष्माच्या पणीं । म्यां हारी घेऊनि रणांगणीं । वांचविला कोदंडपाणी । भक्तचूडामणी अर्जुन ॥४८॥ रमा माझ्या पट्टाची राणी । ते म्यां सेवेसी लाविली चरणीं । खांदीं वाहिल्या गौळणी । भक्तशिरोमणी गोपिका ॥४९॥ जे लक्ष्मी निःशेष उपेक्षिती । ते मज पूज्य परम प्रीतीं । जे मज लक्ष्मी मागती । त्यांसी श्री ना श्रीपती ऐसें होय ॥१५०॥ लक्ष्मी उपेक्षूनि निश्चितीं । मज निजभक्त आवडती । मज पढियंता उमापती । त्याहून अतिप्रीती भक्तांची ॥५१॥ ज्या महादेवाचेनि गुणें । म्यांही श्यामवर्ण धरणें । ज्या महादेवाचेनि वचनें । म्यां मोहिनी होणें दुसरेनी ॥५२॥ ते मोहिनीच्या दर्शनीं । म्यां शिव भुलविला तत्क्षणीं । रुक्मांगद मोहिनीपासूनी । अर्धक्षणीं तारिला ॥५३॥ यापरी माझ्या भक्तांहुनी । मज प्रिय नव्हे शूलपाणी । मज पढियंता त्रिभुवनीं । भक्तावांचुनी आन नाहीं ॥५४॥ आगमनिगमीं प्रतिपाद्य । माझी चतुर्भुजमूर्ति शुद्ध । ते निजहृदयीं मी परमानंद । भक्तनिजपद वाहतसें ॥५५॥ मज निजदेहाची नाहीं गोडी । गोवळ झालों अतिआवडीं । गायी राखें अरडीदरडी । कीं थापटीं घोडीं भक्तांचीं ॥५६॥ मी अवाप्तसकळकाम । परी प्रेमळांलागीं सदा सकाम । देखतां प्रेमळांचा भाव परम । मी आत्माराम उडी घालीं ॥५७॥ प्रेमळ देखतांचि दिठीं । मी घे आपुलिये संवसाटीं । नव्हतां वरीव दें सुखकोटी । न ये तरी उठाउठी सेवक होय ॥५८॥ सांडूनि महत्त्वपरवडी । मी निजभक्तांचीं उच्छिष्टें काढीं । भक्तकाजाचे सांकडीं । करीं कुरंवडी देहाची ॥५९॥ उपेक्षूनि निजदेहासी । उद्धवा तुजसारिखिया भक्तांसी । मज आवडती ते अहर्निशीं । जीवें सर्वस्वेंसी पढियंते ॥१६०॥ आवडी करितां माझें भजन । मज पूज्य झाले भक्तजन । त्या भक्तांचें निजलक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥६१॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

निरपेक्षं मुनिं शान्तं निर्वैरं समदर्शनम् । अनुव्रजाम्यहं नित्यं पूयेयेत्यङ्‌घ्रिरेणुभिः ॥ १६ ॥

अनन्य करितां माझें भजन । माझ्या स्वरूपीं झगडलें मन । सकळ वासना गेल्या विरोन । वृत्तिशून्य अवस्था ॥६२॥ आटाटीवीण न प्रार्थितां । अयाचित अर्थ प्राप्त होतां । तोही हातीं घेवों जातां । निरपेक्षता बुडाली ॥६३॥ अर्थ देखोनि जो लविन्नला । तो जाण लोभें वोणवा केला । तोही उपेक्षूनि जो निघाला । तो म्यां वंदिला सर्वस्वें ॥६४॥ मार्गीं अर्थ पडतां । कोणी नाहीं माझा म्हणतां । तोही स्वयें हातीं घेतां । निरपेक्षता बुडाली ॥६५॥ वृत्तिशून्य जे अवस्था । ती नांव जाण निरपेक्षता । ते काळींची जे मननता । ऐक तत्त्वतां सांगेन ॥६६॥ वेदशास्त्रार्थें परम प्रमाण । ते माझें सत्य स्वरूप जाण । ते स्वरूपीं निजनिर्धारण । त्या नांव मनन बोलिजे ॥६७॥ करितां स्वरूपविवेचन । स्वरूपरूप झालें मन । तेथें धारणेवीण मनन । न करितां स्मरण होतसे ॥६८॥ या नांव मननावस्था । सत्य जाण पां सर्वथा । याहीवरी शांतीची जे कथा । ऐक तत्त्वतां सांगेन ॥६९॥ काम क्रोध सलोभता । समूळ मूळेंसी न वचतां । देहीं आली जे निश्चळता । ते न सरे सर्वथा येथ शांती ॥१७०॥ मत्स्य धरूनियां मनीं । बक निश्चळ राहिला ध्यानीं । ते शांति कोण मानी । अंतःकरणीं सकाम ॥७१॥ देहीं स्फुरेना देहअ हंता । विराली कामक्रोधसलोभता । हे शांति बाणे भाग्यवंता । मुख्य शांतता या नांव ॥७२॥ उद्धवा जाण पां निश्चितीं । मजही मानली हेचि शांति । याहीवरी जे समतेची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥७३॥ विचित्र भूतें विचित्र नाम । विचित्राकारें जग विषम । तेथें देखे सर्वीं सर्व सम । परब्रह्म समत्वें ॥७४॥ फाडाफाडीं न शिणतां । तडातोडी न करितां । माझेनि भजनें मद्भंक्तां । सर्वसमता मद्भा वें ॥७५॥ मद्भािवें समता आल्या हाता । खुंटली भूतभेदाची वार्ता । भेदशून्य स्वभावतां । निर्वैरता सहजेंचि ॥७६॥ जंववरी द्वैताचें भान । तंववरी विरोधाचें कारण । अवघा एकचि आपण । तेथ वैरी कोण कोणाचा ॥७७॥ गगन गगनासी कैं भांडे । कीं चंद्रा चंद्रेंसीं झुंझ मांडे । कीं वायूचेनि वायु कोंडे । कीं जिव्हेचीं दुखंडें जिव्हा करी ॥७८॥ जें भेदाचें निराकरण । तेंचि निर्वैरतेचें लक्षण । उद्धवा सत्य जाण । निर्वैरपण या नांव ॥७९॥ निरपेक्षता आणि माझें मनन । शांति आणि समदर्शन । पांचवें तें निर्वैर जाण । पंचलक्षण हें मुख्यत्वें ॥१८०॥ असो पंचलक्षणकथा । एक निरपेक्षता आल्या हाता । पायां लागे सायुज्यता । पूर्णब्रह्मता ठसावे ॥८१॥ निरपेक्षाचें निश्चळ मन । निरपेक्ष तो निर्वैर जाण । निरपेक्ष तो शांत संपूर्ण । निरपेक्षाची जाण सेवा मी करीं ॥८२॥ कडेकपाटीं न रिघतां जाण । न सोशितां अतिसाधन । हें हाता आल्या पंचलक्षण । विश्वउाद्धरण त्याचेनी ॥८३॥ ऐशिया भक्तांचें दर्शन । झाल्या तरतीं हें नवल कोण । त्यांचें करितां नामस्मरण । उद्धरण जडजीवां ॥८४॥ हें पंचलक्षण आल्या हाता । मजहोनि अधिक पवित्रता । जोडली माझ्या निजभक्तां । मीही वंदीं माथां चरणरेणु ॥८५॥ समुद्रोदक मेघीं चढे । त्यासी मधुरता अधिक वाढे । जग निववी वाडेंकोडें । फेडी सांकडें दुकाळाचें ॥८६॥ तेंचि उदक समुद्रीं असतां । उपयोगा न ये गा सर्वथा । तेवीं माझेनि भजनें मद्भयक्तां । झाली पवित्रता मजहुनी ॥८७॥ केळी चाखतां चवी नातुडे । तिचींच केळें अतिगोडें । तेवीं मजहूनि माझ्या भक्तांकडे । पवित्रता वाढे अनिवार ॥८८॥ माझ्या ठायीं जें पवित्रपण । तें भक्तांचेनि मज जाण । यालागीं भक्तांमागें मी आपण । धांवें चरणरेणू वंदावया ॥८९॥ भक्तचरणरेणु वंदितां । मज केवढी आली पवित्रता । माझें पायवणी वाहे माथां । जाण तत्त्वतां सदाशिवू ॥१९०॥ एवं माझ्या भक्तांचें जें सुख । सुखपणें अलोलित । तें सुख नेणती आणिक । तें बोलावया मुख सरेना ॥९१॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

निष्किञ्चना मय्यनुरक्तचेतसः । शान्ता महान्तोऽखिलजीववत्सलाः । कामैरनालब्धधियो जुषन्ति ते यन् । नैरपेक्ष्यं न विदुः सुखं मम ॥ १७ ॥

मीवांचूनि ज्यांचे गांठी । नाहीं फुटकी कांचवटी । मजवांचोनि सगळे सृष्टीं । आणिकांतें दृष्टीं न देखती ॥९२॥ ऐसें करितां माझें भजन । जाति कुळ देहाभिमान । सहजें जाय निरसोन । अकिंचन या नांव ॥९३॥ याहीवरी प्रेमयुक्त । माझ्या स्वरूपीं रंगलें चित्त । अतएव निजशांती तेथ । असे नांदत निजरूपें ॥९४॥ ऐशिया गा निजशांती । परिपाकातें पावली भक्ती । तें मीवांचूनि सर्वभूतीं । दुजी स्थिती जाणेना ॥९५॥ जो जो जीवू जेथें देखे । तो तो मद्‌रूपें वोळखे । ते वोळखीचेनि हरिखें । प्रीति यथासुखें अनन्य करी ॥९६॥ ऐशिया मद्‌रूपस्थिती । जीवमात्रीं अनन्य प्रीती । एवं मद्भा‌वें माझी भक्ती । महंतस्थिती या नांव ॥९७॥ ऐसा मद्भा‌वनायुक्त । सर्वीं सर्वत्र माझा भक्त । तेथ कामादिदोष समस्त । अस्तमाना जात ते काळीं ॥९८॥ सविता येतां प्राचीजवळी । मावळे नक्षत्रमंडळी । तेवीं भक्तीच्या प्रबोधकाळीं । झाली होळी कामादिकां ॥९९॥ झालिया कामाची निवृत्ती । सहजेंचि निर्विषयस्थिती । तेथें माझ्या सुखाची सुखप्राप्ती । सुखें सुख भोगिती सुखरूप ॥२००॥ देशें काळें वेदानुवादा । ज्या सुखाची न करवे मर्यादा । त्या सुखाची सुखसंपदा । मद्भयक्त सदा भोगिती ॥१॥ ज्या सुखाचे सुखप्राप्ती । विरोनि जाय चित्तवृत्ती । सुखें सुखरूप सर्वांगें होती । एवढी सुखप्राप्ती मद्भीक्तां ॥२॥ इतर मी सांगों कायी । मोक्षसुखाच्याही ठायीं । या सुखाची गोडी नाहीं । धन्य पाहीं हरिभक्त ॥३॥ ऐशिया सुखाकारणें । साधक शिणती जीवें प्राणें । तपादि शरीरशोषणें । व्रत धरणें विषयांचें ॥४॥ एक करिती योगयाग । एक करिती शास्त्रसंग । एक करिती सर्वस्वत्याग । एकीं सांडिला संग गृहदारा ॥५॥ एक फळाहारी निराहारी । एक ते नग्न ब्रह्मचारी । एक कडेकपाटीं शिखरीं । गिरिकंदरीं रिघाले ॥६॥ एक ते जटाळ गांठ्याळ । एक नखधारी ढिसाळ । एक महाहटी विशाळ । एक पिसाळ मत्तमुद्रा ॥७॥ एक तांबडे बोडके । एक ते केवळ सुडके । एक तीर्थाटणें रोडके । एक ते मुके मौननिष्ठ ॥८॥ एक राख्ये एक शंख्ये । एक ते अत्यंत बोलके । एक पाणीपिशीं झालीं उदकें । कुशमृत्तिके विगुंतलीं ॥९॥ ऐशा नाना परींच्या व्युत्पत्ती । साधक शिणती नेणों किती । माझ्या भजनसुखाची प्राप्ती । नव्हे निश्चितीं कोणासी ॥२१०॥ जें माझ्या भक्तांचें निजसुख । तें कोणासी न पवेचि देख । स्वप्नींही त्या सुखाचें मुख । अनोळख पैं झालें ॥११॥ चंद्रकिरणींचें अमृत । जेवीं वायसां अप्राप्त । तेवीं माझें निजसुख निश्चित । नव्हेचि प्राप्त अभक्तां ॥१२॥ थानीं लागल्या गोचिडा । अशुद्धचि आवडे मूढा । जवळिल्या क्षीरा वरपडा । नव्हेचि रोकडा अभागी ॥१३॥ तेवीं सांडोनि माझी भक्ती । नाना साधनीं व्यर्थ शिणती । त्यांसी माझ्या निजसुखाची सुखप्राप्ती । नव्हे निश्चितीं उद्धवा ॥१४॥ जिंहीं माझ्या भजनपरवडी । केली भक्तीची कुळवाडी । ते माझ्या निजसुखाची गोडी । पावले रोकडी आत्यंतिक ॥१५॥ ज्या निजसुखाच्या ठायीं । शिळेपणाची भाषाचि नाहीं । विटों नेणे कल्पांतींही । इंद्रियांचा कांहीं न पडे पांगू ॥१६॥ जें जें विषयांचें सुख । तें तें इंद्रियांपंगिस्त देख । अपंगिस्त भक्तिसुख चोख । सभाग्य लोक पावती ॥१७॥ जें सुख भोगितां पाहीं । देही तोचि होय विदेही । तें सुख माझ्या भक्तांच्या ठायीं । प्रकटलें कंहीं लोपेना ॥१८॥ हे उत्तमोत्तम भक्त पाहीं । सुख पावले नवल कायी । परी केवळ जे विषयी । भजनें त्यांही सुखप्राप्ती ॥१९॥ भाग्यवशें सत्संगती । आस्तिक्यभावें अनन्यस्थिती । अल्पही माझी घडल्या भक्ती । विषयनिवृत्ती तेणें होय ॥२२०॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

बाध्यमानोऽपि मद्भ-क्तो विषयैरजितेन्द्रियः । प्रायः प्रगल्भया भक्त्या विषयैर्नाभिभूयते ॥ १८ ॥

माझ्या ठायीं अनन्य प्रीती । प्रेमयुक्त भजनस्थिती । ऐशियां भक्तां विषय बाधिती । हे व्याख्यानस्थिती केवीं घडे ॥२१॥ आवडी करितां माझी भक्ती । विषयवासना जळून जाती । तेथ उपजे विषयासक्ती । हे कोणें युक्ती मानावी ॥२२॥ आरिसा उटितां उजळे । तेवीं भक्तीनें विषयो क्षाळे । तेथ विषयासक्ती खवळे । हें निरूपण कोंवळें साधारण ॥२३॥ केवळ जो विषयासक्त । संसारीं प्रपंचयुक्त । तोही प्रसंगे झालिया भक्त । होय विरक्त तें ऐक ॥२४॥ जीवीं भक्ति लागली गोड । नाहीं मावळली विषयचाड । ऐसें उभय अवघड । अतिसांकड जयासी ॥२५॥ तेणें मुख्यत्वें घ्यावी भक्ती । गौण धरावी विषयासक्ती । तिचीही होय विरक्ती । ऐक ते युक्ती सांगेन ॥२६॥ लवणासी मिळतां जळ । विरवूनि सांडी तत्काळ । तेवीं भक्ति वाढविल्या प्रबळ । विषयमंडळ विभांडी ॥२७॥ यापरी भजनपरिपाटीं । विषयांसी पडे तुटी । निजसुखाची लाभे भेटी । पडे मिठी स्वानंदें ॥२८॥ मज पाहिजे विषयनिवृत्ती । या हेतू केली नाहीं भक्ती । म्हणाल विषयांची विरक्ती । कोणे युक्ती घडे त्या ॥२९॥ येचिविषयीं उत्तर । सांगताहे शारङ्गधर । दीपाचा पेटल्या वैश्वानर । तो जाळील घर नगर तैसें हें ॥२३०॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

यथाग्निः सुसमृद्धार्चिः करोत्येधांसि भस्मसात् । तथा मद्विषया भक्तिरुद्धवैनांसि कृत्स्नशः ॥ १९ ॥

दीप लावावयालागुनी । सोज्ज्वळ केला जो वन्ही । तो अवचटें पडला वनीं । तिडिकी उडोनी तृणांकुरीं ॥३१॥ तो अनिच्छितचि एकसरें । कोपटें आणि धवळारें । नगरें पुरें मंदिरें । गिरिकंदरें भस्म करी ॥३२॥ तैशी अल्पही माझी भक्ती । श्रद्धायुक्त प्रवेशल्या चित्तीं । संचित क्रियमाण पापपंक्ती । होय जाळिती निःशेष ॥३३॥ पूर्वपापाचे समूळ मळ । चित्तीं जडले होते प्रबळ । तें चित्त अतिचंचळ । विषयीं व्याकुळ सर्वदा ॥३४॥ त्यासी माझिया भक्तिलेशें । पूर्वपापाचा समूह नासे । जेवीं कां कर्पूर दीपस्पर्शें । निःशेष नासे तत्काळ ॥३५॥ ऐसें निर्मळ झालिया चित्त । ब्रह्म प्रकाशे सदोदित । मग तें नव्हे विषयासक्त । होय विरक्त अनिच्छितां ॥३६॥ भक्तिलेशाची एवढी गरिमा । तो संपूर्ण भक्तीचा महिमा । कोण जाणे भक्तोत्तमा । आगमनिगमां अतर्क्य ॥३७॥ अलक्ष्य लक्षेना माझी भक्ती । अतर्क्य तर्केना शास्त्रयुक्तीं । अगाध नाकळे निश्चितीं । साधनव्युत्पत्ती शिणतांही ॥३८॥ पूर्ण माझे भक्तीचा पार । मजही न कळे साचार । यालागीं मी भक्तांचा आज्ञाधार । नुल्लंघीं उत्तर सर्वथा ॥३९॥ अगाध भक्तांची थोरी । यालागीं मीही सेवा करीं । भक्तपद धरिंले उरीं । वंदी शिरीं अंघ्रिरेणू ॥२४०॥ भक्त म्हणवितां वाटे गोड । भजनमुद्रा अतिअवघड । भक्तीचें अंतर अतिगूढ । न कळे उघड तिशास्त्रां ॥४१॥ ज्ञान सांगतां अतिसुगम । भक्तिरहस्य गुह्य परम । अकृत्रिम उपजे प्रेम । ऐसें हें वर्म लाविल्या न लगे ॥४२॥ कृपण जरी दूरी जाये । तो घरींचें ठेवणें जीवीं वाहे । तैसें माझें प्रेम पाहें । जो हृदयीं वाहे सर्वदा ॥४३॥ कां वंध्या गर्भ संभवल्यापाठीं । उल्हासे, वाढवी गोरटी । तैशी माझ्या प्रेमाची पोटीं । आवडी मोटी जैं होय ॥४४॥ जैसे वंध्यागर्भाचे डोहाळे । तैसे माझ्या प्रेमाचे सोहाळे । पोटांतलेनि कळवळें । उल्हास बळें चढोवढी ॥४५॥ सदैव जांवयी आल्या घरा । जेवीं सर्वस्व वेंची सुंदरा । तेवीं माझा कळवळा पुरा । ज्याच्या जिव्हारा वोसंडे ॥४६॥ बीज अधिकाधिक पेरितां । उल्हास कृषीवळाचे चित्ता । तेवीं सर्वस्व मज अर्पितां । तैशी उल्हासता जैं होये ॥४७॥ सगुण सुरूप समर्थ भर्ता । निघोन गेलिया तत्त्वतां । त्यालागीं तळमळी जैशी कांता । तैशी कळवळता जैं उठी ॥४८॥ त्या नांव गा माझी भक्ती । उद्धवा जाण निश्चितीं । जे भक्तीसी भुलोनि श्रीपती । भक्तांहातीं आतुडलों ॥४९॥ चढत्या आवडीं माझी प्रीती । तेचि जाण पां माझी भक्ती । ऐसा भक्तीचा महिमा श्रीपती । स्वयें उद्धवाप्रती सांगत ॥२५०॥ आवडी धरोनि पोटेंसी । देवो सांगे उद्धवासी । माझी भक्ति ते जाण ऐसी । अखंड जीपाशीं मी असें ॥५१॥ संसारतरणोपायीं । हेचि एक मुख्य पाहीं । मोक्ष लागे इच्या पायीं । इतर साधनें कायी बापुडीं ॥५२॥ मी तंव अजित लोकीं तिहीं । त्या मज भक्तिप्रतापें पाहीं । जिंतोनियां ठायींच्याठायीं । भावबळें पाहीं स्ववश केलों ॥५३॥ यालागीं सर्व विजयांचे माथां । माझी भक्तीचि गा सर्वथा । ऐक पां तेही कथा । तुज मी तत्त्वतां सांगेन ॥५४॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

न साधयति मां योगो न साङ्ख्यं धर्म उद्धव । न स्वाध्यायस्तपस्त्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता ॥ २० ॥

सांख्य जें कां नित्यानित्य । कर्म जें कां नित्यनैमित्य । अष्टांगयोग समस्त । नव्हती समर्थ मत्प्राप्तीं ॥५५॥ स्वाध्याय जें वेदाध्ययन । तप जें वातांबुपर्णाशन । त्याग जो संन्यासग्रहण । माझे भक्तीविण बापुडीं ॥५६॥ जैशी नाकेंवीण बरव । कां शिरेंवीण अवयव । भर्तारेंवीण अहेव । जाण पां तो सर्व विटंबू ॥५७॥ तैसें माझे भक्तीविण । सकळ साधनें बापुडीं जाण । मज पावावया समर्थपण । नाहीं आंगवण समस्तां ॥५८॥ तैशी नव्हे माझी भक्ती । चढती वाढवून माझी प्रीती । तत्काळ करी माझी प्राप्ती । नव्हे पंगिस्ती आणिकाची ॥५९॥ जेव्हां उपजली माझी भक्ती । तेव्हांच झाली माझी प्राप्ती । हें पुनःपुन्हां उद्धवाप्रती । हरिखें श्रीपती सांगत ॥२६०॥ रत्नाासवें जैशी दीप्ती । अरुणासवें जेवीं गभस्ती । तेवीं भक्तीपाशीं मी श्रीपती । असें निश्चितीं उद्धवा ॥६१॥ ते भक्ति लागे ज्याच्या चित्तीं । तैं मी सांपडलों त्याच्या हातीं । आणिकां साधनांचे प्राप्ती । विनाभक्ती मी नातुडें ॥६२॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

भक्त्याहमेकया ग्राह्यः श्रद्धयाऽऽत्मा प्रियः सताम् । भक्तिः पुनाति मन्निष्ठा श्वपाकानपि संभवात् ॥ २१ ॥

इतर साधनें व्युत्पत्ती । दूरी सांडूनि परतीं । श्रद्धायुक्त माझी भक्ती । धरिल्या हातीं मी लाभें ॥६३॥ निर्विकल्प निःसंदेहो । सर्व भूतीं भगवद्भाीवो । हा भक्तीचा निजनिर्वाहो । भजनभावो या नांव ॥६४॥ होऊनि सर्वार्थी उदासू । माझ्या भजनाचा उल्हासू । न धरी मोक्षाचा अभिलाषू । एवढा विश्वासू मद्भंजनीं ॥६५॥ तेथें तरें कीं न तरें । हा विकल्पू कोठें उरे । माझेनि भजनें निर्धारे । कै पाठिमोरे विधिवाद ॥६६॥ एवढा विश्वासीं ज्याचा भावो । न धरी भक्तीवेगळा उपावो । आम्हां त्याचेनि जीवें जीवो । तो आत्मा पहा हो पैं माझा ॥६७॥ जो मी ज्ञानियांचा आत्मा । भक्तांचा प्रिय परमात्मा । शास्त्रीं प्रतिपादिती पुरुषोत्तमा । तो मी साउमा त्या धांवें ॥६८॥ मज आवडे अनन्य भक्ती । मी त्यांचा अंकित निश्चितीं । त्यांचेनि माझी त्रैलोकीं ख्याती । मज महंती त्यांचेनि ॥६९॥ त्यांचेनि मज खाणें जेवणें । त्यांचेनि मज लेणें नेसणें । त्यांचेनि जीवेंप्राणें । म्यां वर्तणें सर्वत्र ॥२७०॥ माझे गांठीं कांहीं नाहीं । भक्तीं सर्वस्वें वेंचूनि पाहीं । नाना उपचारउ पायीं । महत्त्व तिंहीं मज दिधलें ॥७१॥ मज अचक्षूसी दिधले डोळे । अश्रोत्रा श्रवण दिधले । मज अमुखा तिंहीं मुख केलें । त्यांचेनि बोलें मी बोलका ॥७२॥ मज त्यांचेनि गमनागमन । त्यांचेनि अवयव अळंकरण । त्यांचेनि मज नेमस्त स्थान । मज समर्थपण त्यांचेनि ॥७३॥ मज नामरूप तिंहीं करणें । मज पवित्रता त्यांचेनि गुणें । मज वैकुंठींचें ठाणें । भक्तीं अचळपणें दीधलें ॥७४॥ येथवरी निजभक्तांसी । मी वश्य झालों भक्तीपाशीं । यालागीं अहर्निशीं । मी भक्तांपाशीं तिष्ठतू ॥७५॥ मी अजन्मा त्यांचेनि जन्म धरीं । मी अकर्मा त्यांचेनि कर्म करीं । त्यांचेनि बोलें उद्धरीं । नाममात्रें महापापियां ॥७६॥ नारदवचनासाठीं । वाल्मीकि परम पापी सृष्टीं । म्यां वंद्य केला वैकुंठीं । नामपरिपाटीं पवित्रत्वें ॥७७॥ येथवरी भक्तीची सत्ता । मजवरी चाले तत्त्वतां । भक्तीवेगळा सर्वथा । मीं न यें हाता कोणाचे ॥७८॥ भक्तांच्या उपकारता । मी थोर दाटलों तत्त्वतां । नव्हेचि प्रत्युपकारता । आधीन सर्वथा यालागीं ॥७९॥ त्यालागीं व्हावया उतरायी । माझे गांठीं कांहींच नाहीं । लटकुफटकु दीधलें कांहीं । तें हळूचि पाहीं सांगेन ॥२८०॥ भक्त माझेनि सनाथ । माझेनि झाले ते कृतकृत्य । माझेनि आनंदें तें सदा तृप्त । वोसंडत निजबोधें ॥८१॥ माझेनि बळें जगजेठी । घायेंवीण छेदिती सृष्टी । माझेनि बळें त्यांचे दृष्टी । संमुख नुठी कळिकाळ ॥८२॥ माझेनि न माती लोकीं तिहीं । माझेनि ते देहीं विदेही । माझेनि बळें पाहीं । प्रळयकाळ तिंही प्राशिला ॥८३॥ माझेनि बळें जाण । विभांडिलें जन्ममरण । माझें करोनियां भजन । ब्रह्म सनातन ते झाले ॥८४॥ हेंही नाहीं म्यां दीधलें । भजनबळें तिंहीं नेलें । त्यांसीं माझें कांहीं न चले । सर्वस्व लुटिलें निजभक्तीं ॥८५॥ भक्तीं भजनभावबळें । अजिता मातें तिंहीं जिंकिलें । जिकोनि आपण्या वश्य केलें । माझें निजपद नेलें निजभक्तीं ॥८६॥ एवं माझ्या निजपदाची सत्ता । जरी आली भक्तांच्या हाता । तरी स्वामित्व ठेवूनि माझे माथां । माझे भक्तिपंथा विनटले ॥८७॥ ते माझे भक्तीची पवित्रता । आश्चर्य वाटेल तुज ऐकतां । संदेहो नाहीं मज सांगतां । ऐक तत्त्वतां तो महिमा ॥८८॥ सांडोनि दांभिक लौकिक । माझ्या भजनीं भावार्थें चोख । तो ज्ञाती जरी झाला श्वपाक । तरी आवश्यक मज पूज्य ॥८९॥ केवळ जीं अपवित्रें । रिसें आणि वानरें । म्यां पूजिलीं गौळ्यांची पोरें । ताकपिरें रानटें ॥२९०॥ जो जातीनें नीचत्वा नेला । परी भक्तिभावें उंचावला । तो मद्‌रूपता पावला । पूज्य झाला तिहीं लोकीं ॥९१॥ 'विप्रात् द्विषड्गुणयुता' । ये श्लोकींची हेचि कथा । जळो त्या द्विजाची पवित्रता । जो माझ्या भजनपथा विन्मुख ॥९२॥ त्याहूनि श्वपच गा वरिष्ठ । जो माझ्या भजनीं भजननिष्ठ । त्यातें वंदिती पुराणश्रेष्ठ । कविवरिष्ठ महाकवी ॥९३॥ विदुर दासीपुत्र तत्त्वतां । भावें पढिया भगवंता । भावो प्रमाण परमार्था । जात्यभिमानता सरेना ॥९४॥ मज पावावया साचोकारें । भावो सरे जाती सरे । यालागीं अवघ्यांचे धुरे । म्यां वनचरें उद्धरलीं ॥९५॥ पक्ष्यांमाजीं केवळ निंद्यू । जटायु उद्धरिला म्यां गीधू । अंत्यज उद्धरिला धर्मव्याधू । भाव शुद्धू मदर्थी ॥९६॥ भलता हो भलते जाती । ज्यासी माझी भावार्थें भक्ती । तोचि जाण पां पवित्रमूर्ती । माझी प्राप्ती मद्भ जनें ॥९७॥ सांडोनियां माझी भक्ती । नाना साधनें व्युत्पत्ती । करितां नव्हे माझी प्राप्ती । तेंचि श्रीपती सांगत ॥९८॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

धर्मः सत्यदयोपेतो विद्या वा तपसान्विता । मद्भःक्त्यापेतमात्मानं न सम्यक् प्रपुनाति हि ॥ २२ ॥

माझे भक्तीवीण कर्मधर्म । जाण पां तो केवळ भ्रम । चुकलें मत्प्राप्तीचें वर्म । तो धर्म अधर्म परिणमे ॥९९॥ माझे भक्तीवीण सत्यवादू । तो जाण पां जैसा गर्भांधू । प्रतिपदीं घडे प्रमादू । अधःपतनबाधू देखेना ॥३००॥ भक्तीवीण दयेची थोरी । जेवीं पुरुषेंवीण सुंदरी । ते विधवा सर्व धर्माबाहेरी । तैसी परी दयेची ॥१॥ माझे भक्तीवीण जे विद्या । ते केवळ जाण पां अविद्या । जेवीं वायस नेणती चांदा । तेवीं माझ्या निजबोधा नोळखती ॥२॥ चंदनभार वाहे खर । परी तो नेणे सुवासाचें सार । माझेनि भक्तीवीण विद्याशास्त्र । केवळ भारवाहक ॥३॥ माझे भक्तीवीण जें तप । शरीरशोषणादि अमूप । तें पूर्वादृष्टें भोगी पाप । नव्हे सद्‌रूप तपःक्रिया ॥४॥ माझे भक्तीवीण जें साधन । तें कोशकीटाच्या ऐसें जाण । आपण्या आपण बंधन । भक्तिहीन क्रिया ते ॥५॥ एवं माझे भक्तीवीण । जें केलें तें अप्रमाण । तें भक्तीचें शुद्ध लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥६॥


एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

कथं विना रोमहर्षं द्रवता चेतसा विना । विनानन्दाश्रुकलया शुध्येद् भक्त्या विनाऽऽशयः ॥ २३ ॥

आवडीं हरिकथा ऐकतां । नाना चरित्रें श्रवण करितां । माझी आत्मचर्चा हृदयीं धरितां । पालटू चित्ता तेणें होये ॥७॥ तेणेंचि उपजे माझी भक्ती । माझ्या भजनाच्या अतिप्रीतीं । आवडीं माझीं नामें गाती । रंगीं नाचती सद्भाअवें ॥८॥ पोटांतूनियां उल्हासतां । रंगीं गातां पैं नाचतां । अंतरीं द्रवो झाला चित्ता । ते अवस्था बाह्य दिसे ॥९॥ अंतरीं सुखाची झाली जोडी । बाह्य रोमांची उभिली गुढी । त्या स्वानुभवसुखाची गोडी । नयनीं रोकडी प्रवाहे ॥३१०॥ माझे भक्तीचिया आवडीं । अहं सोहं दोनी कुडीं । तुटली अभिमानाची बेडी । विषयगोडी निमाली ॥११॥ ते काळींचें हेंचि चिन्ह । पुलकांकित देहो जाण । नयनीं आनंदजीवन । हृदयीं परिपूर्ण स्वानंदू ॥१२॥ पुंजाळले दोनी नयन । सदा सर्वदा सुप्रसन्न । स्फुरेना देहाचे भान । भगवंतीं मन रंगलें ॥१३॥ ऐसी नुपजतां माझी भक्ती । कैंची होय विषयविरक्ती । विरक्तीवीण माझी प्राप्ती । नव्हे निश्चितीं उद्धवा ॥१४॥ माझी शुद्धभक्ती तत्त्वतां । साचार आली जयाचे हाता । ऐक त्याच्या चिन्हांची कथा । आणि पवित्रता तयाची ॥१५॥ माझे भक्तीसी जो लागला । तो तत्काळ पवित्र झाला । त्यानें त्रिलोक पुनीत केला । हें गर्जोनि बोलिला श्रीकृष्णू ॥१६॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

वाग् गद्गदा द्रवते यस्य चित्तं । रुदत्यभीक्ष्णं हसति क्वचिच्च । विलज्ज उद्गायति नृत्यते च । मद्भ क्तियुक्तो भुवनं पुनाति ॥ २४ ॥

अंगीं रोमांच रवरवित । स्वेदबिंदू डळमळित । चित्त चैतन्यें द्रवत । तेणें सद्गडदित पैं वाचा ॥१७॥ हर्ष वोसंडतां पोटीं । अर्धोन्मीलित होय दृष्टी । जीवशिवां पडली मिठी । ध्यानत्रिपुटी मावळली ॥१८॥ नयनीं अश्रूंचा पूर लोटी । उभंडू न संटेचि पोटीं । होत जीवभावाची तुटी । पडे सृष्टीं मूर्च्छित ॥१९॥ आक्रंदे थोर आक्रोशें । वारंवार रडतां दिसे । रडण्यामाजीं गदगदां हांसे । जेवीं लागलें पिसें ब्रह्मग्रहो ॥३२०॥ रडणें हांसणें न सांडी । त्याहीमाजीं नवल आवडी । अर्थावबोधें गाणें मांडी । निजात्मगोडीचेनि योगें ॥२१॥ विसरोनि माझें तुझें । सांडोनियां लोकलाजे । हरिखें प्रेमाचेनि भोजें । तेणें नाचिजे निःशंक ॥२२॥ गाणे नाचणें हांसणें । तो रडे कासयाकारणें । ऐक तींही लक्षणें । तुजकारणें सांगेन ॥२३॥ माउलीवेगळें बाळक पडे । जननीं पाहतां कोठें नातुडे । भेटता ओरडूनि रडे । मिठी पडे सप्रेम ॥२४॥ जीव परमात्मा दोनी । चुकामुकी झाली भ्रमपट्टनीं । त्यांसी एकाकीं होतां मिळणी । रडे दीर्घस्वरें स्फुंदत ॥२५॥ बहुकाळें झाली भेटी । ऐक्यभावें पडली मिठी । तेणें उभंडू न संटे पोटीं । रुदन उठी सप्रेम ॥२६॥ देवो लाघवी नानापरी । मायावी नातुडें निर्धारीं । तो सांपडला घरींच्या घरीं । तेणें विस्मय करी टवकारें ॥२७॥ देव सदा जवळीच असे । त्यालागीं जन कैसे पिसे । पाहों जाती देशोदेशें । तें देखोनि हांसे गदगदां ॥२८॥ देव सर्वांसी अजितू । तो म्यां जिंकिला भगवंतू । धरोनि राखिला हृदयांतू । यालागीं नाचतू उल्हासें ॥२९॥ निवटूनि दुजयाची मातू । अंगें जीतिला भगवंतू । जंगीं झाला यशवंतू । यालागीं गातनाचतू उल्हासें ॥३३०॥ पाहतां दुसरें न दिसे मज । यालागीं धरूं विसरला लाज । जगीं झाला तो निर्लज्ज । निर्लज्जतेची वोज हे त्याची ॥३१॥ यापरी भक्तियुक्त । होऊनियां माझे भक्त । निजानंदें गातनाचत । तेणें केलें पुनीत लोकत्रय ॥३२॥ जयाचे देखतां चरण । जडजीवां उद्धरण । ज्याचे लागतां चरणरेण । पशु पाषाण उद्धरती ॥३३॥ कीर्तनाचेनि महाघोकें । नाशिलीं जगाचीं सर्व दुःखें । अवघें विश्वचि हरिखें । भरिलें महासुखें उचंबळत ॥३४॥ दर्शनें स्पर्शनें वचनें । एक तारिले कीर्तनें । एक तारिले नामस्मरणें । यापरी जग उद्धरणें उद्धवा ॥३५॥ अविद्यायुक्त जीव मलिन । त्यासी शुद्ध व्हावया जाण । माझी भक्तीचि प्रमाण । हेंचि श्रीकृष्ण स्वयें सांगे ॥३६॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा यथाग्निना हेम मलं जहाति । ध्मातं पुनः स्वं भजते च रूपम् । आत्मा च कर्मानुशयं विधूय । मद्भंक्तियोगेन भजत्यथो माम् ॥ २५ ॥

डांकमिळणी सुवर्ण । हीनकसें झालें मलिन । उदकें धुतांही जाण । निर्मळपण न ये त्या ॥३७॥ त्याच सुवर्णाचें तगट । अग्निमुखें देतां पुट । मळत्यागें होय चोखट । दिसे प्रकट पूर्वरूपें ॥३८॥ तेवीं अविद्याकामकर्मीं मलिन । त्याचे चित्तशुद्धीलागीं जाण । माझी भक्तीचि परम प्रमाण । मळक्षालन जीवाचें ॥३९॥ जंव जंव भक्तीचें पुट चढे । तंव तंव अविद्याबंध विघडे । मायेचें मूळचि खुडे । जीवू चढे निजपदा ॥३४०॥ तुटोनियां अविद्याबंधू । चिन्मात्रैक अतिविशुद्धू । जीव पावे अगाध बोधू । परमानंदू निजबोधें ॥४१॥ जीवासी अविद्येची प्राप्ती । ते ज्ञानास्तव होय निवृत्ती । तेथ कां पां लागली भक्ती । ऐशी आशंका चित्तीं जरी धरिसी ॥४२॥ तरी माझे भक्तीवीण ज्ञान । सर्वथा नुपजे जाण । तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥४३॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

यथा यथाऽऽत्मा परिमृज्यतेऽसौ । मत्पुण्यगाथाश्रवणाभिधानैः । तथा तथा पश्यति वस्तु सूक्ष्मं । चक्षुर्यथैवाञ्जनसम्प्रयुक्तम् ॥ २६ ॥

माझी प्रतिपाद्य स्वरूपता । नाना चरित्रें पवित्र कथा । तेथें श्रवणमननें चित्ता । प्रक्षाळितां कीर्तनें ॥४४॥ जंव जंव करी माझी भक्ती । तंव तंव अविद्यानिवृत्ती । तेणें माझे स्वरूपाची प्राप्ती । जे श्रुतिवेदांतीं अतर्क्य ॥४५॥ जें कां अतिसूक्ष्म निर्गुण । अलक्ष्य लक्षेना गहन । तेणें स्वरूपें होय संपन्न । जीव समाधान मद्भाजनें ॥४६॥ नयनीं सूदल्या अंजन । देखे पृथ्वीगर्भींचें निधान । तेवीं मद्भ्जनें लाहोनि ज्ञान । चैतन्यघन जीव होय ॥४७॥ उद्धवा ऐक पां निश्चितीं । बहुत न लगे व्युत्पत्ती । जैसा भावो ज्याचे चित्तीं । तैशी प्राप्ती तो पावे ॥४८॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

विषयान् ध्यायतश्चित्तं विषयेषु विषज्जते । मामनुस्मरतश्चित्तं मय्येव प्रविलीयते ॥ २७ ॥

जो करी विषयांचें ध्यान । तो होय विषयीं निमग्न । जो करी सदा माझें चिंतन । तो चैतन्यघन मीचि होय ॥४९॥ स्त्री गेली असतां माहेरीं । ध्यातांचि प्रकटे जिव्हारीं । हावभावकटाक्षेंवरी । सकाम करी पुरुषातें ॥३५०॥ नसते स्त्रियेचें ध्यान करितां । प्रकट दिसे यथार्थता । मी स्वतः सिद्ध हृदयीं असतां । सहजें मद्‌रूपता चिंतितां मज ॥५१॥ आवडीं माझें जें चिंतन । चित्त चिंता चिंतितेपण । विरोनि होय चैतन्यघन । मद्‌रूपपण या नांव ॥५२॥ माझे प्राप्तीलागीं जाण । हेंचि गा मुख्य लक्षण । माझें ध्यान माझें भजन । मद्‌रूपपण तेणें होय ॥५३॥ मजवेगळें जें जें ध्यान । तेंचि जीवासी दृढबंधन । यालागीं सांडूनि विषयांचें ध्यान । माझें चिंतन करावें ॥५४॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

तस्मादसदभिध्यानं यथा स्वप्नमनोरथम् । हित्वा मयि समाधत्स्व मनो मद्भा-वभावितम् ॥ २८ ॥

साचाच्यापरी दिसत । परिणामीं नाशवंत । त्यासीच बोलिजे असत । जें मिथ्याभूत आभासू ॥५५॥ तेवीं इहामुत्र कमनीये । जें अविचारितरमणीये । त्यालागीं प्राणी पाहें । नाना उपायें शिणताती ॥५६॥ कष्टीं सेवूनि साधन । साधिलें स्वर्गभोगस्थान । तेंही नश्वर गा जाण । जेवीं कां स्वप्नमनोरथ ॥५७॥ यालागीं विषयाचें ध्यान । सांडूनि करावें माझें भजन । माझिया भावना मन । सावधान राखावें ॥५८॥ सावधान करितां भजन । एकाग्र धरितां माझें ध्यान । तेथ अत्यंत जें बाधकपण । तें त्यागलक्षण हरि बोले ॥५९॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

स्त्रीणां स्त्रीसङ्‌गिनां सङ्गं त्यक्त्वा दूरत आत्मवान् । क्षेमे विविक्त आसीनश्चिन्तयेन्मामतन्द्रितः ॥ २९ ॥

जो मजलागीं आर्तभूत । तेणें सांडावी स्त्रीसंगाची मात । मी चिंतावा भगवंत । तेणें एकांत सेवावा ॥३६०॥ स्त्रियेच्याही परीस वोखटी । संगति स्त्रैणांची अतिखोटी । त्यांसी न व्हावी भेटीगोठी । न पहावे दिठीं दुरोनी ॥६१॥ साधकें कायवाचाचित्तीं । सांडूनि दोहींची संगती । परतोनि स्फुरेना स्फूर्ती । ऐशी दृढ स्थिती करावी ॥६२॥ केवळ एकांत जें विजन । प्रशस्त आणि पवित्रस्थान । तेथें घालोनियां आसन । माझें चिंतन करावें ॥६३॥ करोनि आळसाची बोळवण । धरूनि निजवृत्ति सावधान । त्यावरी करावें माझें ध्यान । एकाग्र मन राखूनी ॥६४॥ माझें विध्वंसोनि ध्यान । माझे प्राप्तीआड विघ्न । साधकांसी अतिबंधन । स्त्री आणि स्त्रैणसंगती ॥६५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

न तथास्य भवेत् क्लेशो बन्धश्चान्यप्रसङ्गतः । योषित्सङ्गाद् यथा पुंसो यथा तत्सङ्गिसङ्गतः ॥ ३० ॥

अविद्येच्या अनंतकोटी । जाण पां स्त्रीसंगाचे पोटीं । अधर्माचा भडका उठी । योषिता दृष्टीं देखतां ॥६६॥ जें महामोहाचें मेळवण । जें खवळल्या कामाचे इंधन । जें जीवाचें परम मोहन । अधःपतन ते योषिता ॥६७॥ जे मदनाचे तिखट बाण । जें मायेचें चक्र जाण । जें अंधतमाचें पूर्ण । भरितें तें जाण योषिता ॥६८॥ हो कां जीचिये संगतीं । आंधळी होय ज्ञानशक्ती । जे वाढवी नाना आसक्ती । जिचेनि विस्मृती निजस्वार्था ॥६९॥ जिचेनि संसार बहुवस । जिचेनि असोस गर्भवास । जिचेनि विषयविलास । जे वज्रपाश जीवाचा ॥३७०॥ जे अखंड सोशी दुःखशोक । जे सदा सोशी नरकवोक । ते माता अनाप्त करूनि देख । स्त्री आवश्यक आप्त होय ॥७१॥ जे मातृस्नेहातें तोडवी । जे बंधुस्नेहातें बिघडवी । जे सदा गोंवी हावभावीं । अधर्मअधटवीं जे पाडी ॥७२॥ जिचे कटाक्ष अतितिख । जिव्हारीं रुतले देख । जे जीवाची व्यामोहक । जिचें चढलें विख उतरेना ॥७३॥ एवढी बाधा जाण स्त्रीसंगती । जो वांछूं पाहे माझी प्राप्ती । तेणें सांडावी स्त्रियेची आसक्ती । हृदयीं प्रीती न राखावी ॥७४॥ स्त्री आठवतांचि चित्ता । उच्छेदी ज्ञानध्यान अवस्था । एवढी स्त्रीसंगबाधकता । त्याहूनि अधिकता स्त्रैणसंगें ॥७५॥ स्त्रीसंगाच्या मोहमदा । सुटका आहे यदाकदा । परी स्त्रैणसंगतीची बाधा । ते आपदा अनिवार ॥७६॥ चूडाला स्त्रियेचें संगतीं । तरला शिखिध्वज भूपती । नातरी मदालसेचे संगतीं । तरला नृपती कुवलयाश्चु ॥७७॥ हो कां लीलेनें करोनि भक्ती । प्रसन्न केली सरस्वती । तिचा उद्धरिला निजपती । हें बोलिलें ग्रंथीं वसिष्ठें ॥७८॥ यापरी स्त्रीसंगतीं । उद्धरले ऐकिजेती । परी स्त्रैणाचे संगतीं । उद्धारा गती असेना ॥७९॥ जो कां स्त्रियेचा अंकिला । जो स्त्रियेसी जीवें विकिला । जो स्त्रियेचा पोसणा झाला । तिचे बोलामाजीं वर्ते ॥३८०॥ जैशी कुलदेवता खेचरी । तैसें स्त्रियेसी पूज्य करी । मग तिचेचि सेवेवरी । नाना उपचारीं नाचत ॥८१॥ पाळिल्या श्वानाचे परिपाटीं । लाविल्या लागे सुहृदापाठीं । त्या हडकिलिया शेवटीं । कामथाळोरां पुसाटी घालूनि पडे ॥८२॥ धड गोड उत्तम पदार्था । आपण भोगीना सर्वथा । तें देऊन स्त्रियेच्या हाता । आपुली सत्ता निवर्तवी ॥८३॥ इसी जैं विरुद्ध वाटेल । तैं हें ब्रह्मांड पालथेल । इचा उल्लंघितां बोल । क्षीराब्धि सुकेल सुखाचा ॥८४॥ नाहीं देवोकुळदेवां पूजणें । मायबापांतें वंचणें । शेखीं गुरूतेंही ठकणें । परी सर्वस्व देणें स्त्रियेसी ॥८५॥ एवं माकड जैसें गारुड्याचें । तैसा स्त्रियेचेनि छंदें नाचे । ऐशिया स्त्रैणाचे संगतीचें । तेथें सुख कैंचें साधका ॥८६॥ ज्याच्या ऐकतां स्त्रियेच्या गोठी । सज्ञानासही काम उठी । जो लावी योषितापाठीं । उठाउठी सकामत्वें ॥८७॥ ऐशिया स्त्रैणाचे संगतीं । कैंची साधकां सुखप्राप्ती । तो घालील अधोगतीं । अंधतमाप्रती नेईल ॥८८॥ यालागीं स्त्रैणाची कथा । कानीं नायकावी वार्ता । त्याचा वाराही लागतां । तेथूनि सर्वथा पळावें ॥८९॥ त्याची न घ्यावी भेटी । त्यासी न करावी गोठी । तो न पहावा दिठीं । न लागावें पाठीं स्त्रैणाचिये ॥३९०॥ स्त्रैण पुढें वाटे जाय । त्याच्या मार्गीं मागू उरला राहे । तेही आपण चुकवावी भोये । येथवरी पाहें त्यागावा ॥९१॥ स्त्री आणि स्त्रैणाचे संगतीं । जैसी होय दुःख प्राप्ती । तैसे दुःख त्रिजगती । माजीं निश्चितीं असेना ॥९२॥ अत्यंत स्त्रीकामी वशता । ती नांव मुख्य स्त्रैणता । केवळ स्त्रियेची अधीनता । तो बाधू परमार्था अतिनिंद्यत्वें ॥९३॥ आपुले हृदयींची कामासक्ती । तेचि स्त्रीसंगाची दृढ प्राप्ती । तेथ उपजलिया विरक्ती । मग स्त्रियेची प्राप्ती कोण पुसे ॥९४॥ ऐसें हृदयींचे कणवे । उद्धवासी सांगीतले देवें । हें ऐकोनियां उद्धवें । विचारु जीवें आदरिला ॥९५॥ अनिवार उपजे विरक्ती । जेणें बाधीना विषयासक्ती । ऐशी जे ध्यानस्थिती । तेचि देवाप्रती पुसत ॥९६॥ जें लागलिया ध्यान । न दिसे स्त्रीपुरुषभान । जीवीं उपजे चित्समाधान । तैसें विधान पुसत ॥९७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

श्रीउद्धव उवाच । यथा त्वामरविन्दाक्ष यादृशं वा यदात्मकम् । ध्यायेन्मुमुक्षुरेतन्मे ध्यानं त्वं वक्तुमर्हसि ॥ ३१ ॥

उद्धव म्हणे कमळनयना । मुमुक्षु करिती तुझिया ध्याना । त्या ध्यानाची ध्यानलक्षणा । जगज्जीवना मज सांगें ॥९८॥ तें सगुण कीं निर्गुण । कोण रूप कैसा वर्ण । तें अवघेंही संपूर्ण । कृपा करून मज सांगा ॥९९॥ जेथ रिघतां नुबगे मन । ज्याचें अत्यंत गोडपण । जें तुजही आवडतें जाण । तें मज ध्यान सांगावें ॥४००॥ ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । सांगावया उत्तम ध्यान । पूर्वपीठिका आसन । प्राणायामलक्षण सांगत ॥१॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

श्रीभगवानुवाच । सम आसन आसीनः समकायो यथासुखम् । हस्तावुत्सङ्ग आधाय स्वनासाग्रकृतेक्षणः ॥ ३२ ॥

ऐक आसनाचें लक्षण । पाषाणीं व्याधि संभवे जाण । केवळ धरणीचें आसन । तें अति कठिण दुःखरूप ॥२॥ दारुकासनें निर्दय मन । कोरड्या काष्ठाऐसें होय जाण । तृणासनीं विकल्प गहन । जैसें कां तृण विचित्रांकुरें ॥३॥ वृक्षपल्लवांवरी आसन । तेणें चित्त सदा दोलायमान । जारण मारण स्तंभन । तेथ काळें आसन साधकां ॥४॥ ज्ञानोपलब्धि मृगाजिनीं । मोक्षसिद्धि व्याघ्रजिनीं । मोक्षादि सर्व सिद्धींची श्रेणी । श्वेतकंबलासनीं साधकां ॥५॥ भूमिका शुद्ध आणि समान । पाहोनि निरुपद्रव स्थान । तेथ रचावें आसन । सुलक्षण अनुकमें ॥६॥ कुश वस्त्र कंबलाजिन । इंहीं युक्त घालावें आसन । उंच नीच न व्हावें जाण । समसमान समभागें ॥७॥ उंच झालिया आसन डोले । नीचीं भूमिदोष आदळे । यालागीं समत्वें प्रांजळें । रचावें कोवळें मृदु आसन ॥८॥ तेथ शुद्ध मुद्रा वज्रासन । कां अंबुजासनही जाण । अथवा घालावें सहजासन । जे आसनीं मन सुखावे ॥९॥ तेणें मेरुदंड अवक्र शुद्ध । समकाया राखोनि प्रसिद्ध । मूळाधारादि तीनी बंध । अतिसुबद्ध पैं द्यावे ॥४१०॥ ऐसें आसन लागतां । आसनावरी स्वभावतां । करांबुजाची विकासता । उत्संगता शोभती ॥११॥ नाकाचें अग्न सांडूनि दूरी । दृष्टि ठेवावी नासिकाग्रीं । ते ठायी बैसे अग्निचक्रीं । योगगंभीरीं योग्यता ॥१२॥ ते अभ्यासीं निजनिश्चळें । योगाभ्यासे योगबळें । अर्धोन्मीलित होती डोळे । धारणामेळें ते काळीं ॥१३॥ भेदापासाव उठाउठी । उपरमतां अभेदीं दृष्टी । तिची नासाग्रीं दिसे मिठी । इतर दृष्टी न लक्षितां ॥१४॥ आसनजयो त्रिबंधप्राप्ती । दृष्टीची उपरमस्थिती । हे अकस्मात कोणे रीतीं । साधकाहातीं आतुडेल ॥१५॥ ऐसी आशंका धरिसी चित्तीं । त्याही अभ्यासाची स्थिती । उद्धवा मी तुजप्रती । यथानिगुती सांगेन ॥१६॥


एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

प्राणस्य शोधयेन्मार्गं पूरकुम्भकरेचकैः । विपर्ययेणापि शनैरभ्यसेन्निर्जितेन्द्रियः ॥ ३३ ॥

अभ्यासाचें लक्षण । प्रथम प्राणामार्गशोधन । पूरक कुंभक रेचक जाण । प्राणापानशोधक ॥१७॥ जिव्हा उपस्थ उपमर्दवे । ऐसा इंद्रियनेम जैं संभवे । त्यासीच हा प्राणजयो फावे । येरां नव्हे श्रमतांही ॥१८॥ प्राणशोधन तें तूं ऐक । पूरक कुंभक रेचक । सवेंचि रेचक पूरक कुंभक । हा उभय देख अभ्यासू ॥१९॥ इडेनें करावा प्राण पूर्ण । तो कुंभिनीनें राखावा जाण । मग तिनेंचि करावा रेचन । हें एक लक्षण अभ्यासीं ॥४२०॥ कां पिंगलेनें करावा पूर्ण । तो तिनेंचि करावा रेचन । हें एक अपरलक्षण । विचक्षण बोलती ॥२१॥ सर्वसंमत योगलक्षण । इडेनें प्राण करावा पूर्ण । तो कुंभकें राखावा स्तंभून । करावें रेचन पिंगलया ॥२२॥ हो कां पिंगलेनें पुरावा प्राण । तोही कुंभकें राखावा कुंभून । मग इडेनें सांडावा रेचून । हें विपरीत लक्षण अभ्यासीं ॥२३॥ तेथ न करावी फाडाफोडी । न मांडावी ताडातोडी । सांडोनियां लवडसवडी । अभ्यासपरवडी शनैःशनैः ॥२४॥ येथ मांडलिया तांतडी । तैं प्राण पडेल अनाडीं । मग हे थडी ना ते थडी । ऐशी परवडी साधकां ॥२५॥ जेवीं मुंगी वळंघे पर्वता । ते चढे परी पडेना सर्वथा । तेथ जात्यश्व चालों जातां । न चढे तत्त्वतां अतिकष्टी ॥२६॥ तैसें ये योगाभ्यासीं जाण । न चले जाणीव शहाणपण । जाणिवा येथ होय पतन । सर्वथा गमन घडेना ॥२७॥ ते मुंगीच्या परी योगपंथा । जो शनैःशनैः अभ्यासतां । प्रणवाच्या चढे माथां । जाण तत्त्वतां उद्धवा ॥२८॥ दृढ अभ्यास आल्या हाता । जैशी साधकाची मनोगतता । तैसा पवन चाले तत्त्वतां । जेवीं रणाआंतौता महाशूर ॥२९॥ अभ्यासाच्या गडाडीं । प्राण खवळल्या कडाडी । तो प्राणापानाचे भेद मोडी । पदर फोडी चक्राचे ॥४३०॥ येथ द्विविध माझें भजन । एक तें योगयुक्त निर्गुण । एक तें प्रणवाभ्यासें भक्त सगुण । तेंही लक्षण अवधारीं ॥३१॥ ऐक प्राणायामाचे भेद । सगर्भ अगर्भ द्विविध । सगर्म आगमोक्तें शुद्ध । सगुण संबंध ध्यानादि ॥३२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

हृद्यविच्छिन्नमोङ्कारं घण्टानादं बिसोर्णवत् । प्राणेनोदीर्य तत्राथ पुनः संवेशयेत् स्वरम् ॥ ३४ ॥

वाचेसी नव्हतां गोचरू । दीर्घ प्रणवाचा उच्चारू । हृदयीं अनवच्छिन्न ओंकारू । अखंडाकारू उल्हासे ॥३३॥ घंटानादसदृश स्थितू । जैसा कमळमृणालसूक्ष्मतंतू । तैसा मूळादारभ्य ब्रह्मरंध्रांतू । प्राणायामयुक्तू प्रणवू भासे ॥३४॥ तेथ दीर्घ स्वरें उच्चारू । तेणें प्रणवू भासे अतिसपुरू । तो प्राणायामें करावा स्थिरू । अखंडाकारू स्वरयुक्त ॥३५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

एवं प्रणवसंयुक्तं प्राणमेव समभ्यसेत् । दशकृत्वस्त्रिषवणं मासादर्वाग् जितानिलः ॥ ३५ ॥

स्वरवर्णमात्रातीत पर । प्रणव जो कां अगोचर । तो अभ्यासबळें नर । वृत्तिगोचर स्वयें करिती ॥३६॥ नवल उच्चाराचा चमत्कार । ऊर्घ्वमुख अखंडाकार । अभ्यासें प्रणवू करिती स्थिर । झणत्कार स्वरयुक्त ॥३७॥ ऐसा प्राणायामयुक्त प्रणवाभ्यास । त्रिकाळ करितां सांडूनि आळस । काळीं आवर्तनें दशदश । सावकाश करितां पैं ॥३८॥ तरी एक मास न लागतां । हा प्राणजयो आतडे हाता । जेवीं कां सती पतिव्रता । नुल्लंघी सर्वथा पतिवचन ॥३९॥ ये अभ्यासीं अतितत्पर । झालिया गा निरंतर । योगाभ्यासाचें सार । सहजेंचि नर पावती ॥४४०॥ ऐसा प्राणजयो आलिया हाता । दों प्रकारीं भजनावस्था । एकी सगुण आगमोक्ता । दुजी योगाभ्यासता निर्गुणत्वें ॥४१॥ परी दोहींचें समाधान । निर्गुणींच पावे जाण । त्या दोहींचें उपलक्षण । संक्षेपें श्रीकृष्ण सांगत ॥४२॥ अगा ओं हें स्मरों सरे । स्मरतां स्वरेंसीं प्राणू प्रणवीं भरे । मग प्रणवूचि तेव्हां स्फुरे । अखंडाकारें उल्हासतू ॥४३॥ जेथूनि अक्षरें उपजती । शब्द वदोनि जेथ सामावती । मग जे उरे जाण ती स्फूर्ती । प्रणवू निश्चितीं त्या नांव ॥४४॥ त्या प्रणवाचेनि आधारें । जिणोनियां साही चक्रें । तो प्रणवू सूनि धुरे । निजनिर्धारे चालिजे ॥४५॥ तेथ उल्हाट शक्तीचा लोट । वैराग्याचा नेटपाट । जिणोनि काकीमुखाची वाट । सवेगें त्रिकूट घेतलें ॥४६॥ तेव्हां अनुहताच्या घायीं । निशाण लागलें पाहीं । तंव पुढील जे योगभुयी । ते आपैती पाहीं हों सरली ॥४७॥ तेथें हरिखें अतिउद्धट । औटपीठ आणि गोल्हाट । तेही जिणोनियां वाट । घडघडाट चालिला ॥४८॥ मागील ठेली आठवण । झाली विकल्पाची बोळवण । सत्रावी वोळली जाण । स्वानंदजीवन जीवाचें ॥४९॥ ते सहस्त्रदळाचे पाट । वरूनि उतरले घडघडाट । स्वानंदजीवनानिकट । नीट वाट पैं आले ॥४५०॥ तें सेवितां संतोषें पाणी । निवली संतप्त अवनी । इंद्रियांची पुरली धणी । गुणांची त्रिवेणी बुडाली ॥५१॥ तंव भ्रमरगुंफेआंत । जीवशिवांचा एकांत । तेणें जीवपणाचा प्रांत । वृत्तीसी घात हों सरसा ॥५२॥ तेथ शिवशक्तिसंयोग । निजऐवक्यें झाला चांग । परमानंदें कोंदलें अंग । सुखाचा सुखभोग सुखरूप झाला ॥५३॥ तेव्हां हेतु मातु दृष्टांतू । खुंटली वेदवादाची मातू । झाला मीतूंपणाचा प्रांतू । एकला एकांतू एकपणें ॥५४॥ ते एकलेपणाचें एक । म्हणावया म्हणतें नाहीं देख । ऐसे योगबळें जे नेटक । माझें निजसुख पावले ॥५५॥ हे योगमार्गींची वाट । अतिअवघड परम कष्ट । थोर विघ्नाचा कडकडाट । प्राप्ति अवचट एकाद्या ॥५६॥ तैसा नव्हे माझा भक्तिपंथू । तेथ नाहीं विघ्नाची मातू । भक्तांसीही हाचि ठावो प्राप्तू । ऐक तेही मातू मी सांगेन ॥५७॥ मूळीं योग हा नाहीं स्पष्ट । म्हणाल कैंचें काढिलें कचाट । पदबंधाची चुकली वाट । वृथा वटवट न म्हणावी ॥५८॥ येच श्लोकीं देवो बोलिला । मासादर्वाक् प्राणजयो जाहला । यांतू ध्वनितें योग बोलिला । तो म्यां केला प्रकटार्थ ॥५९॥ जेथ प्राणापानजयो झाला । तेथ महायोगू हा भागा आला । हा योगू शास्त्रार्थ बोलिला । विशद केला आकुलागमीं ॥४६०॥ प्राणापानजयो झाला पहा हो । जैसा साधकाचा भावो । सगुणनिर्गुण उपावो । प्राप्ती ठावो सहजेंचि ॥६१॥ प्राणापानजयप्राप्ती । सगुण उपासनास्थिती । तद्द्वारा निर्गुणप्राप्ती । उद्धवाप्रती हरि बोले ॥६२॥ कशासारिखें तुझें ध्यान । ऐसा उद्धवें केला प्रश्न । यालागीं सांगोनियां सगुण । सवेंचि निर्गुण संस्थापी ॥६३॥ मत्स्य साधावया बडिश जाण । चित्त साधावया मूर्ति सगुण । तेचि मूर्तीचें सगुण ध्यान । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥६४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा

हृत्पुण्डरीकमन्तःस्थम् ऊर्ध्वनालमधोमुखम् । ध्यात्वोर्ध्वमुखमुन्निद्रमष्टपत्रं सकर्णिकम् ॥ ३६ ॥

जैसें केळीचें कमळ । तैसें हृदयीं अष्टदळ । अधोमुख ऊर्ध्वनाळ । अतिकोमळ लसलसित ॥६५॥ धरोनि प्राणायामाचें बळ । ऊर्ध्वमुख हृदयकमळ । विकसित करावें अष्टदळ । ध्यानें प्रबळ ध्यातां पैं ॥६६॥ तेथ ऊर्ध्वमुख अधोनाळ । ध्याना आलिया हृदयकमळ । अतिउन्निद्र अष्टदळ । ध्यानीं अचंचळ स्थिरावल्या ॥६७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा

कर्णिकायां न्यसेत् सूर्य सोमाग्नीनुत्तरोत्तरम् । वह्निमध्ये स्मरेद् रूपं ममैतद् ध्यानमङ्गलम् ॥ ३७ ॥ कर्णिकेमाजीं चंद्रमंडळ । ध्यावें सोळा कळीं अविकळ । त्याहीमाजीं सूर्यमंडळ । अतिसोज्जळ बारा कळीं ॥६८॥ त्याहीमाजीं वन्हिमंडळ । दाही कळीं अतिजाज्वल्य । ते अग्निमंडळीं सुमंगल । ध्यावी सोज्ज्वळ मूर्ति माझी ॥६९॥


एकनाथी भागवत - श्लोक ३८ व ३९ वा

समं प्रशान्तं सुमुखं दीर्घचारुचतुर्भुजम् । सुचारुसुन्दरग्रीवं सुकपोलं शुचिस्मितम् ॥ ३८ ॥

समानकर्णविन्यस्त स्फुरन् मकरकुण्डलम् । हेमाम्बरं घनश्यामं श्रीवत्सश्रीनिकेतनम् ॥ ३९ ॥

तेंचि माझें मूर्तीचें ध्यान । उद्धवा ऐक सावधान । आपुले मूर्तीचें आपण । ध्यान श्रीकृष्ण सांगत ॥४७०॥ अतिदीर्घ ना ठेंगणेपण । सम अवयव समान ठाण । सम सपोष अतिसंपूर्ण । मूर्ति सुलक्षण चिंतावी ॥७१॥ मूर्ति चिंतावी संमुख । प्रसन्नवदन अतिसुरेख । जिचें देखतांचि मुख । हृदयीं हरिख कोंदाटे ॥७२॥ जैशीं विशाळ कमळदळें । तैसे आकर्णान्त दोनी डोळे । भंवया रेखिल्या काजळें । तैशी रेखा उजळे धनुष्याकृती ॥७३॥ कपाळ मिरवत सांवळें । त्याहीवरी चंदन पिंवळें । माजीं कस्तूरीचीं दोनी अंगुळें । कुंकुममेळें अक्षता ॥७४॥ दीर्घ नासिक आणि कपाळें । लखलखित गंडस्थळें । मुख सुकुमार कोवळें । अधरप्रवाळें आरक्त ॥७५॥ श्यामचंद्राची सपोष कोर । तैशी चुबुका अतिसुंदर । मुख निमासुरें मनोहर । भक्तचकोरचंद्रमा ॥७६॥ जैसा हिरियाच्या ज्योती । कीं दाळिंबबीजांची दीप्ती । तैशी मुखामाजीं दंतपंक्ती । दशन झळकती बोलतां ॥७७॥ समानकर्ण दोनी सधर । स्फुरत कुंडलें मकराकार । ईषत् हास्य मनोहर । ग्रीवा सुंदर कंबु जैशी ॥७८॥ कंठींची त्रिवळी उभवणी । माजीं मिरवे कौस्तुभमणी । ते प्रकाशली दीप्ती कवण गुणीं । तेजें दिनमणी लोपला ॥७९॥ भुजंगाकार स्वभावो । चतुर्भुज आजानुबाहो । विशाळ वक्षःस्थळनिर्वाहो । श्रीवत्स पहा हो चिन्हित ॥४८०॥ श्रीवत्स श्रीनिकेतन । हृदयीं दोहीं भागीं जाण । त्रिवळीयुक्त उदर गहन । दामोदरचिन्ह त्या आलें ॥८१॥ विजू तळपे तैसा पिंवळा । लखलखित दिसे डोळां । तेवीं कसिला सोनसळा । तेणें घनसांवळा शोभत ॥८२॥ जैसें चांदिणें गगनामाझारीं । शुभ्रता बैसे श्यामतेवरी । तेवीं श्यामांगीं चंदनाची भुरी । तेणें श्रीहरी शोभत ॥८३॥


एकनाथी भागवत - श्लोक ४० व ४१ वा

शङ्खचक्रगदापद्म वनमालाविभूषितम् । नूपुरैर्विलसत्पादं कौस्तुभप्रभया युतम् ॥ ४० ॥

द्युमत्किरीटकटक कटिसूत्राङ्गदायुतम् । सर्वाङ्गसुन्दरं हृद्यं प्रसादसुमुखेक्षणम् । ॥ ४१ ॥

कौस्तुभासीं संलग्न गळा । आपाद रुळे वनमाळा । कटीं बाणली रत्नगमेखळा । किंकिणी जाळमाळासंयुक्त ॥८४॥ करकंकण बाहुअंगदें । शंखचक्रपद्मगदादि आयुधें । जडित मुद्रिका नाना छंदें । कराग्रीं विनोदें बाणल्या ॥८५॥ नाभि सखोल निर्मळ । जेथ ब्रह्मा झाला पोटींचें बाळ । जें लोकपद्माचें समूळ मूळ । तें नाभिकमळ हरीचें ॥८६॥ जैसे सचेतन मर्गजस्तंभ । तैसे घोंटींव साजिरे स्वयंभ । उभ्य चरणांची अभिनवशोभ । हरिअंगीं स्वयंभ शोभती ॥८७॥ ध्वज वज्र अंकुश देखा । यवांकित ऊर्ध्वरेखा । पद्मचक्रादि सामुद्रिका । चरण नेटका हरीचा ॥८८॥ त्रिकोण कांतीव इंद्रनीळीं । तैशीं साजिरीं घोटींव सांवळीं । पाउलें सुकुमारें कोंवळीं । आरक्त तळीं पदप्रभा ॥८९॥ पाउलावरी सांवळी प्रभा । तळवातळीं आरक्त शोभा । जेवीं संध्याराग मीनला नभा । तैशी शोभा हरिचरणीं ॥४९०॥ नभमंडळीं चंद्ररेखा । तैशी पादाग्रीं मांडणी नखा । पोटर्यां सुकुमार नेटका । जंघा सुरेखा जानुद्वय ॥९१॥ अतिशयें माजु साना । होता अभिमान पंचाननां । मध्य देखोनि जगज्जीवना । लाजोनि राना ते गेले ॥९२॥ अद्यापि ते झाले अरण्यवासी । लाजा मुख न दाविती कोणासी । पहावया हरिमध्यासी । लेप मेखलेसी ते झाले ॥९३॥ चरणीं नूपुरांचा गजर । वांकीअंदुवांचा झणत्कार । मस्तकीं कुटिलालकभार । सुमनीं कबर शोभती ॥९४॥ नानारत्नींट अतिगहन । मस्तकीं मुकुट देदीप्यमान । सर्वांगीं सुलक्षण । मूर्ति संपूर्ण हरीची ॥९५॥ जे मूर्तीची धरिल्या सोये । तहान भूक विसरोनि जाये । ध्यानीं आतुडल्या पाहें । सुखाचा होये सुदिन ॥९६॥ सर्वांगसुंदर श्यामवर्ण । ज्येष्ठ वरिष्ठ गंभीर गहन । सुमुख आणि सुप्रसन्न । मूर्तीचें ध्यान करावें ॥९७॥


एकनाथी भागवत - श्लोक ४२ व ४३ वा

सुकुमारमभिध्यायेत् सर्वाङ्गेषु मनो दधत् इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यो मनसाऽऽकृष्य तन्मनः । बुद्ध्या सारथिना धीरः प्रणयेन्मयि सर्वतः ॥ ४२ ॥

तत्सर्वव्यापकं चित्तमाकृष्यैकत्र धारयेत् । नान्यानि चिन्तयेद् भूयः सुस्मितं भावयेन्मुखम् ॥ ४३ ॥

झणीं दृष्टीचा रुपेल न्याहारू । लागतां खुपेल चंद्रकरू । तैशी मूर्ति ध्यावी सुकुमारू । अतिअरुवारू ध्याननिष्ठा ॥९८॥ इंद्रियार्थीं अतिलोलुप । तें वैराग्यें आवरोनि चित्त । माझे ध्यानीं सुनिश्चित । बुद्धिमंत लाविती ॥९९॥ विषयीं आवरोनि मन । अखंड करितां माझें ध्यान । मद्‌रूपचि होय जाण । ऐसें चिंतन करावें ॥५००॥ चिंतनीं बिचकतां मन । सविवेक बुद्धिबळें जाण । निःशंक करितां माझें स्मरण । धारणेवीण ध्यान ठसावे ॥१॥ धारणा जरी तुटोनि जाये । ध्यासठसा न तुटत राहे । मन मूर्तीच्या ठायीं पाहें । जडलें ठाये सर्वांगीं ॥२॥ अंगप्रत्यंगीं ध्यानयुक्त । जडोनि ठेलें जें चित्त । तें आवरूनि समस्त । चिंतावें निश्चित हास्यस्वदन ॥३॥ सर्वही सांडोनियां जाण । सांगोपांग मूर्तिध्यान । चिंतावें गा हास्यवदन । स्वानंदघन हरीचें ॥४॥ अंग प्रत्यंग मूर्तिध्यान । पुढतीं न करावेंचि गा जाण । ध्यातां माझें हास्यवदन । तल्लीन मन करावें ॥५॥ उद्धवें केला होता प्रश्न । कशासारिखें तुझें ध्यान । तें सांगोनियां जाण । यदात्मलक्षण हरि बोले ॥६॥ ध्याना आलें जें हास्यवदन । त्यांतूनही सांडोनि वदन । केवळ हास्याचें करावें ध्यान । हास्यामाजीं मन घालूनी ॥७॥ त्याही हास्याचें सांडूनि ध्यान । हास्यामाजीं जो आनंदघन । तेथ प्रवेशवावें मन । अतिसावधान निजनिष्ठा ॥८॥ ते आनंदीं आनंदयुक्त । जाहलिया आपुलें चित्त । आनंदाची उपलब्धि तेथ । होय सुनिश्चित साधकां ॥९॥


एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा

तत्र लब्धपदं चित्तमाकृष्य व्योम्नि धारयेत् । तच्च त्यक्त्वा मदारोहो न किञ्चिदपि चिन्तयेत् ॥ ४४ ॥

जाहलिया आनंदपद प्राप्त । चिदाकाशचि दिसे समस्त । चिदाकाशीं चित्त । अतिसावचित्त ठेवावें ॥५१०॥ तेव्हां चिदाकाश चित्त चिंतन । हेंही सांडूनि त्रिविध भेदध्यान । जो मी परमानंद परिपूर्ण । भेदशून्य चिदात्मा ॥११॥ तेथें वृत्ति करूनि निमग्न । सांडावें चिदाकाशाचेंही ज्ञान । तेव्हां ज्ञेय ज्ञाता ज्ञान । हेंही स्फुरण स्फुरेना ॥१२॥ एवं समाहितमतिर्मामेवात्मानमात्मनि । विचष्टे मयि सर्वात्मन् ज्योतिर्ज्योतिषि संयुतम् ॥ ४५ ॥ यापरी साधकांची निजवृत्ती । माझ्या स्वरूपीं मीनल्या स्वरूपस्थिती । तेव्हां मीपणाची स्फुरे जे स्फूर्ती । तेही अद्वैतीं विराली ॥१३॥ तेथें मीतूंपणाचा भास । यापरी निमाला निःशेष । माझें परमानंद निजसुख । अद्वैतें देख कोंदलें ॥१४॥ जेवीं ज्योतीसी मीनल्या ज्योती । दोहींची होय एकचि दीप्ति । तेवीं जीवचैतन्याची स्फूर्ती । अद्वैतसुखप्राप्ती समरसें ॥१५॥ कोटि स्नेहसूत्रें मांडिती । तेणें कोटि दीप नामाभिव्यक्ती । ते कोटि दीपीं एक दीप्ती । तेवीं जीव अद्वैतीं चिन्मात्र ॥१६॥ देहेंद्रियउूपाधिवशें । जीवासी भिन्नत्व आभासे । अद्वैतबोध समरसें । जीवू प्रवेशे स्वरूपीं ॥१७॥ तेव्हां एक परमसुख । हेंही म्हणतें नाहीं देख । एकाकी एकलें एक । सुखेंसीं निजसुख कोंदलें ॥१८॥ जेवीं साखरे साखर चाखित । कीं उदकीं उदक स्नान करित । हो कां घृत रिघालें घृताआंत । सुनिश्चित सुवासा ॥१९॥ यापरी माझी ध्यानस्थिती । साधकां जाहली परमप्राप्ती । तेचि उपसंहारें श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥५२०॥


एकनाथी भागवत - श्लोक ४५ वा

ध्यानेनेत्थं सुतीव्रेण युञ्जतो योगिनो मनः । संयास्यत्याशु निर्वाणं द्रव्य ज्ञानक्रियाभ्रमः ॥ ४६ ॥

इति श्रीमद्भा गवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कंधे चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥ यापरी तीव्र ध्यानस्थिती । समाधिपर्यंत माझी प्राप्ती । साधकासी होय शीघ्रगती । यथानिगुती ध्यान करितां ॥२१॥ हें माझें ध्यान उत्तमोत्तम । सर्वदा ठसावलें जैं निःसीम । तैं अधिभूत अधिदैव अध्यात्म । हा त्रिविध भ्रम उरों नेदी ॥२२॥ विषयी विषयो विषयसंभ्रम । ज्ञेय ज्ञाता ज्ञानोपक्रम । कर्म कर्ता क्रियाभ्रम । यांचें रूपनाम उरों नेदी ॥२३॥ तेथ ध्येय ध्याता ध्यान । दृश्य द्रष्टा आणि दर्शन । मन मंता आणि मनन । यांचें समूळ भान उच्छेदी ॥२४॥ देवो देवी देवता । भज्य भजन भजता । लक्ष्य लक्षण लक्षिता । हेही कथा नुरेचि ॥२५॥ तेथ योग्यतेशीं महायोगू । समाधिसुखाचा सुखभोगू । जीवशिवांचा निजसंयोगू । हाही उपयोगू उडाला ॥२६॥ तेथें बोध कैंचा कैंची बोधकता । कैंची बद्धता आणि मुक्तता । ब्रह्मनाम हेही वार्ता । जाण सर्वथा बुडाली ॥२७॥ सत् चित् आणि आनंद । या नांवाचा जो प्रवाद । तो मज मायावी संबंध । ऐक तोही विषद विभाग ॥२८॥ असंताचे व्यावृत्तीं । 'संत' मातें म्हणती श्रुती । करितां जडाची समाप्ती । 'चिन्मात्र' म्हणती मजलागीं ॥२९॥ तोडितां दुःखाचा संबंधू । मातें म्हणती 'परमानंदू' । एवं सच्चिदानंदप्रवादू । हा विपरीत बोधू विद्येचा ॥५३०॥ जेथ असंतचि नाहीं । तेथ संत म्हणणें घडे कायी । समूळ अज्ञानचि जेव्हां नाहीं । तेव्हां चिन्मात्र हेंही म्हणे कोण ॥३१॥ जेव्हां दुःखाचा लेशू नाहीं । तेव्हां सुख म्हणावें कोणे ठायीं । यालागीं नामरूप मज पाहीं । ठेवितां ठायीं तुकेना ॥३२॥ समूळ उडे त्रिपुटीचें भान । या नांव गा तीव्र ध्यान । माझें करूनियां भजन । निजसमाधान पावले ॥३३॥ एवं माझेनि ध्यानप्रकारें । संसार उडे चमत्कारें । माझें केवळ स्वरूपचि उरे । निजनिर्धारें उद्धवा ॥३४॥ ते स्वरूपीं सुख ना दुःख । नाहीं संतासंताचे लेख । ज्ञानाज्ञानाची अटक । ते ठायीं देख असेना ॥३५॥ तेथ नाम रूप गुण । नाहीं मीतूंपणाची खूण । विद्याअविद्याभान । आनंदघन निजरूप ॥३६॥ भक्तिसुखाचे हेलावे । नानाउपायगौरवें । उद्धवालागीं देवें । निजानुभवें दीधले ॥३७॥ ठसावल्या माझी भक्ती । सकळ सिद्धींची होय प्राप्ती । संदेह नाहीं ये अर्थीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥३८॥ भजनपंथें निरंतर । दोहोनि भक्तिसुखक्षीर । त्याचेंही मंथोनिया सार । उद्धवासी श्रीवर देता झाला ॥३९॥ तो हा चौदावा अध्यावो । स्वमुखें बोलिला देवो । भक्तीसी मी वश्य पहा हो । येर उपावो तो गौण ॥५४०॥ सकळ योगांचें योगगव्हर । वेदान्त निजभांडार । सकळ सिद्धींचें परम सार । भक्ति साचार हरीची ॥४१॥ निजभाग्याची परम जोडी । महासुखाची आवडी गाढी । सकळ गोडियांची गोडी । भक्ति रोकडी हरीची ॥४२॥ भावें करितां भगवद्भ।जन । श्वपच जाहले पावन । जेणें भक्तीशीं विकलें मन । त्याआधीन सदा देवो ॥४३॥ उपेक्षूनियां निजमुक्ती । एका जनार्दनीं पढिये भक्ती । त्याचेनि प्रसादें भगवत्प्राप्ती । जाहली अहोराती खेळणें ॥४४॥ तो जरी भगवत्प्राप्ती नेघे । तरी ते दाटूनि घर रिघे । ऐसे गुरुभक्तीचेनि योगें । देवो सर्वांगें भूलला ॥४५॥ भगवत्प्राप्ती पाहिजे ज्यासी । तेणें न विसंबावें मद्भ४क्तीसीं । अखंड स्मरे जो हरिनामासी । देवो त्यापाशीं तिष्ठत ॥४६॥ सकळ भजनाचे शिरीं । रामनाम दों अक्षरीं । सदा गर्जे ज्याची वैखरी । धन्य चराचरीं तो एक ॥४७॥ एका जनार्दना शरण । इतुकें करितां नामस्मरण । पाठिमोरें होय जन्ममरण । महासिद्धी आंगण वोळंगती ॥५४८॥

इति श्रीभागावते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां श्रीकृष्णोद्धवसंवादे भक्तिरहस्यावधारणयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥४६॥ ओव्या ॥५४८॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]