एका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे ! (नाट्यछटा)

<poem> कान फुटले आहेत का रे तुमचे ? मघांपासून सारख्या मी इकडे हाका मारतों आहे, कुठें होतास रे तूं ? घरांत काय झोपा घेतां सगळें ? जा, आतांच्या आतां गाडी जोडून तयार ठेवायला सांग ! पेन्शन् आणायला जायचें आहे, लवकर मला गेलें पाहिजे ! - हें काय ? आपण कां उठलांत ? अहो, दोघे आपण बरोबरच गाडींत जाऊं. तुम्हांला घरी सोडतों आणि मग मी - आहो कंशाचा राग अन् काय ! चालायचेंच ! भाऊसाहेब, आमचें आपलें हें असें आहे. बोलूनचालून कच्च्या दिलाची माणसें आम्ही ! कितीसा टिकाव लागणार ! झालें, केली बडबड ! पुनर्विवाह करावा, पुनर्विवाह करावा ! अशी हवी तितकी वटवट केली ! मोठ्या दिमाखानें मारे लांबलचक व्याख्यानेंसुद्धा झोडलीं ! पण शेवटीं ? स्वतः वर पाळी आली, तेव्हां घातलें शेपूट ! आणि केलें काय ? तर बारातेरा वर्षाच्या पोरीशीं लग्न ! - नाहीं, तसें नाहीं ! मी आपला स्पष्ट बोलणारा माणूस आहे ! अहो, काय वाटेलतें करा, आमच्यासारखीं ही असायचींच ! आणि खरें आहे ! बोलल्याप्रमाणें सगळेच वागायला लागले, तर उद्यां जगाचा कारभारच आटपेल ! नाहीं का ? ह्यः ह्यः ! - गाडी तयार आहे ? - चला ! - अरे थांब, हा टाइम्सचा अंक, आणि तो स्पेन्सरचा व्हॉल्यूम, हे गाडींत नेऊन ठेव - बाकी भाऊसाहेब, तुम्ही कांही म्हणा, खरें आणि स्पष्ट बोलावयाचें, म्हणजे मीं स्वतः पुनर्विवाह केला नाही म्हणून काय झालें ? काय तेवढें बिघडलें ? अहो, आमच्यापैकी लवकरच कोणी तरी - काय, आलें का लक्ष्यांत ? म्हणजे तुमच्याकरितां सामुग्री तयार करुन ठेवलीच आहे ! अहो तसें नाही असें ! एका दृष्टीनें मी तुमच्या कार्याला साहाय्यच केलें आहे ! हीः हीः हीः - चला ! ....

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.