चतुर्दश मारूती स्तोत्रे

(वृत्त अनुष्टुप्)

भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥
महाबली प्राणदाता सकळां ऊठवी बळें ।
सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका ॥२॥
दिनानाथा हरिरूपा संदरा जगदंतरा ।
पातालदेवता हंता भव्यशेंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका ॥४॥
ध्वजांगेंऊचली बाहो आवेशें लोटला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी देखतां कांपती भयें ॥५॥
ब्रह्मांडें माइली नेणों आवळे दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ तें मुर्डिलें माथां किरीटी कुंडलें वरी ।
सुवर्णकटिं कासोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू ।
चपलांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे ।
मंदाद्रिसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुती नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें गतीसी तुळना नसे ॥१०॥
अणूपासूनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरू मंदार धाकुटे ॥११॥
ब्रह्मांडाभोंवते वेढे स्वपुच्छें घालवूं शके ।
तयासी तुळणा कैची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
आरक्त देखिलें डोळां गिळिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥
भूत प्रेत समंधादी रोगव्याधी समस्तही ।
नासती तूटती चिंता आनंदें भीमदर्शनें ॥१४॥
हे धरा पंधरा श्लोकीं लाभली शोभली भली ।
दृढ देहोनिसंदेहो संख्या चंद्रकळा गुणें ॥१५॥
राम दासीं अग्रगणू कपिकुळासि मंडणू ।
रामरूपीं अंतरात्मा दर्शनें दोष नासती ॥१६॥


(वृत्त अनुष्टुप्)

हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला ।
ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते ॥१॥
कामांतका दानवारी शोकहारी दयानिधे ।
महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्ति पुरातना ॥२॥
वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना ।
पंचभूतां मूळमाया तूंचि कर्ता समस्तही ॥३॥
स्थितरूपें तूंचि विष्णू संहारक पशूपती ।
परात्परा स्वयंज्योति नामरूपा गुणातीता ॥४॥
सांगतां वर्णितां येना वेदशास्त्रा पडे ठका ।
शेष तो शिणला भारी नेति नेति परा श्रुती ॥५॥
धन्यावतार कैसा हा भक्तांलागिं परोपरी ।
रामकाजीं उतावेळा भक्तां रक्षक सारथी ॥६॥
वारितों दुर्घटें मोठीं संकटीं धांवतो त्वरें ।
दयाळ हा पूर्ण दाता नाम घेतांच पावतो ॥७॥
धीर वीर कपी मोठा मागें नव्हेचि सर्वथा ।
उड्डाण अद्भुत ज्याचें लंघिलें सागराजळा ॥८॥
देऊनी लिखिता हातीं नमस्कारी सितावरा ।
वाचितां सौमित्र अंगें राम सूखें सुखावला ॥९॥
गर्जती स्वानंदमेळीं ब्रह्मानंदें सकळही ।
अपार महिमा मोठा ब्रह्मांदीकांसि नाकळे ॥१०॥
अद्भुत पुच्छ तें कैसें भोवंडी नभपोकळी ।
फांकडें तेज तें भारी झांकिलें सूर्यमंडळा ॥११॥
देखतां रूप पैं ज्याचें उड्डाण अद्भुत शोभलें ।
ध्वजांत ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी ॥१२॥
कसिली हेमकासोदी घंटा किंकिणि भोंवत्या ।
मेखळें जडलीं मुक्तें दिव्य रत्नें परोपरी ॥१३॥
माथा मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले ।
कुंडलें दिव्य ती कानीं मुक्तामाला विराजते ॥१४॥
केशर रेखिलें भाळीं मुख सुहास्य चांगलें ।
मुद्रिका शोभती बोटीं कंकणें कर मंडित ॥१५॥
चरणीं वाजती अंदू पदीं तोडर गर्जती ।
कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकू ॥१६॥
स्मरतां पाविजे मुक्ती जन्ममृत्यूसि वारितो ।
कांपती दैत्य तेजासी भुभुकाराचिये बळें ॥१७॥
पाडितो राक्षसू नेटें आपटी महिमंडळा ।
सौमित्रप्राणदाताचि कपिकूळांत मंडणू ॥१८॥
दंडिली पाताळशक्ती अहीमही निर्दाळिले ।
सोडिलें रामचंद्रा कीर्ति ते भुवनतषरयीं ॥१९॥
विख्यात ब्रीद तें कैसें मोक्षदाता चिरंजिवी ।
कल्याण त्याचेनि नामें भूतपिशाच्च कांपती ॥२०॥
सर्पवृश्चिकपश्वादी विषशीतनिवारण ।
आवडी स्मरतां भावें काळ कृतांत धाकतो ॥२१॥
संकटें बंधनें बाधा दुःखदारिद्र्‍यनाशका ।
ब्रह्मग्रहपीडाव्याधी ब्रह्महत्यादि पातकें ॥२२॥
पूरवीं सकळही आशा भक्तकामकल्पतरू ।
त्रिकाळीं पठतां स्तोत्र इच्छिलें पावसी जनीं ॥२३॥
परंतु पाहिजे भक्ती संधे कांहीं धरूं नका ।
रामदासा सहाकारी सांभाळितो पदोंपदीं ॥२४॥


(वृत्त )

नमन गा तुज भीमराया।
निजमती मज दे तुज गाया ।
तडकितां तडका तडकाया।
भडकितां भडका भडकाया ॥१॥

हरुषला हर हा वरदानी ।
प्रगटला नटला मज मानीं ।
वदवितां वदनीं वदवितो ।
पुरवितो सदनीं पदवी तो ॥२॥

अवचितां चढला गड लंका ।
पळभरी न धरी मन शंका ।
तडकितां तडके तडकीतो ।
भडकितां भडके भडकीतो ॥३॥

खवळले रजनीचरभारें ।
भडकितां तडके भडमारें ।
अवचिता गरजे भुभुकारें ।
रगडिजे गमकें दळ सारें ॥४॥

कितिकां खरडी खुरडीतो ।
कितेकां नरडी मुरडीतो ।
कितेकां चरडी चिरडीतो ।
कितेकां आरडी दरडीतो ॥५॥

महाबळी रजनीचर आले ।
भीम भयानकसेचि मिळाले ।
रपटितां रपटी रपटेना ।
आपटितां आपटी आपटेना ॥६॥

खिजवितां खिजवी खिजवेना ।
झिजवितां झिजवी झिजवेना ।
रिझवितां रिझवी रिझवेना ।
विझवितां विझवी विझवेना ॥७॥

झिडकितां झिडकी झिडकेना ।
तडकितां तडकी तडकेना ।
फडकितां फडकी फडकेना ।
कडकितां कडकी कडकेना ॥८॥

दपटितां दपटी दपटेना ।
झपटितां झपटी झपटेना ।
लपटितां लपटी लपटेना ।
चनटितां चपटी चपटेना ॥९॥

दडवितां दडवी दडवेना ।
घडवितां घडवी घडवेना ।
बडवितां बडवी बडवेना ।
रडवितां रडवी रडवेना ॥१०॥

कवळितां कवळी कवळेना ।
खवळितां खवळी खवळेना ।
जवळितां जवळी जवळेना ।
मवळितां मवळी मवळेना ॥११॥

चढवितां चढवी चढवेना ।
झडवितां झडवी झडवेना ।
तडवितां तडवी तडवेना ।
गडवितां गडवी गडवेना ॥१२॥

तगटितां तगटी तगटेना ।
झगटितां झगटी झगटेना ।
लगटितां लगटी लगटेना ।
झुगटितां झुगटी झुगटेना ॥१३॥

टणकितां टणकी टणकेना ।
ठणकितां ठणकी ठणकेना ।
दणगितां दणगी दणगेना ।
फुणगितां फुणगी फुणगेना ॥१४॥

चळवितां चळवी चळवेना ।
छेळवितां छळवी छळवेना ।
जळवितां जळवी जळवेना ।
टळवितां टळवी टळवेना ॥१५॥

घसरितां घसरी घसरेना ।
विसरितां विसरी विसरेना ।
मरवितां मरवी मरवेना ।
हरवितां हरवी हरवेना ॥१६॥

उलथितां उलथी उलथेना ।
कलथितां कलथी कलथेना ।
उडवितां उडवी उडवेना ।
बुडवितां बुडवी बुडवेना ॥१७॥

बुकलितां बुकली बुकलेना ।
धुमसितां धुमसी धुमसेना ।
धरवितां धरवी धरवेना ।
सरवितां सरवी सरवेना ॥१८॥

झडपितां झडपी झडपेना ।
दडपितां दडपी दडपेना ।
तटवितां तटवी तटवेना ।
फटवितां फटवी फटवेना ॥१९॥

वळवितां वळवी वळवेना ।
पळवितां पळवी पळवेना ।
ढळवितां ढळवी ढळवेना ।
लळवितां लळवी लळवेना ॥२०॥
धुरकितां धुरके धुरकावी ।
थरकितां थरके थरकावी ।
भरकितां भरके भरकावी ।
झरकिरकितां झरके झरकावी ॥२१॥

परम दास हटी हटवादी ।
लिगटला उतटी तटवादी ।
सिकवितां सिकवी सिक लावी ।
दपटितां दपटून दटावी ॥२२॥


(वृत्त अनुष्टुप्)

अंजनीसुत प्रचंड वज्रपुच्छ कालदंड ।
शक्ति पाहतां वितंड दैत्य मारिले उदंड ॥१॥

धगधगी तसी कळा वितंड शक्ति चंचळा।
चळचळीतसे लिळा प्रचंड भीम आगळा ॥२॥

उदंड वाढला असे विराट धाकुटा दिसे ।
त्यजूनि सूर्यमंडळा नभांत भीम आगळा ॥३॥

लुळीत बाळकी लिळा गिळोनि सूर्यमंडळा।
बहूत पोळतांक्षणीं थुंकिलाचि तक्षणीं ॥४॥

धग्धगीत बूबुळा प्रत्यक्ष सूर्यमंडळा ।
कराळ काळमूख तो रिपूकुळासी दुःख तो॥५॥

रुपें कपी अचाट हा सुवर्णकट्टचास तो ।
फिरे उदास दास तो खळाळ काळ भासतो॥६॥

झळक झळक दामिनी वितंड काळकामिनी ।
तयापरी झळाझळी लुळीत रोमजावळी ॥७॥

समस्तप्राणनाथ रे करी जना सनाथ रे ।
अतूळ तूळना नसे अतूळशक्ति वीलसे ॥८॥

रुपें रसाळ बाळकू समस्तचित्तचाळकू ।
कपी परंतु ईश्वरू विशेष लाधला वरू ॥९॥

स्वरुद्र क्षोभल्यावरी तयासि कोण सावरी ।
गुणागळा परोपरी सतेजरूप ईश्वरी ॥१०॥

समर्थदास हा भला कपीकुळात शोभला ।
सुरारि काळ क्षोभला त्रिकूट जिंकिला भला॥११॥


(वृत्त )

कोपला रुद्र जे काळीं ते काळीं पाहवेचि ना।
बोलणें चालणें कैंचें ब्रह्मकल्पांत मांडला ॥१॥

ब्रह्मांडाहून जो मोठा स्थूळ उंच भयानकु ।
पुच्छ तें मुर्डिलें माथां पाऊल शून्यमंडळा॥२॥

त्याहून उंच वज्रांचा सव्य बाहो उभारिला ।
त्यापुढें दुसरा कैंचा अद्भुत तुळना नसे ॥३॥

मार्तंडमंडळाऐसे दोन्ही पिंगाक्ष ताविले ।
कर्करा घर्डिल्या दाढा उभे रोमांच ऊठिले॥४॥

अद्भूत गर्जना केली मेघची वोळले भुमीं ।
फुटले गिरिचे गाभे तुटले सिंधु आटले ॥५॥

अद्भूत वेश आवेशें कोपला रणकर्कशू ।
धर्मसंस्थापनेसाठी दास तो ऊठिला बळें ॥६॥


(वृत्त )

जनीं ते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनू ।
तनू मनू तो पवनू एकचि पाहतां दिसे॥१॥

त्रैलोक्यीं पाहतां बाळें ऐसें तो पाहतां नसे ।
अतूळ तूळना नाहीं मारुती वातनंदनू ॥२॥

चळे तें चंचळें बाळ मोवाळ साजिरे ।
चळताहे चळवळी बाळ लोवाळ गोजिरें ॥३॥

हात कीं पाय कीं सांगों नखें बोटें परोपरी ।
दृष्टीचें देखणें मोठें लांगुळ लळलळीतसे ॥४॥

खडी खारी दडे तैसा पीळ पेंच परोपरी ।
उड्डाण पाहतां मोठें झेंपावे रविमंडळा ॥५॥

बाळानें गिळिला बाळू स्वभावें खेळतां पहा ।
आरक्त पीत वाटोळें देखिलें धरणीवरी ॥६॥

पूर्वेसि देखतां तेथें उडालें पावलें बळें ।
पाहिलें देंखिलें हातीं गिळिलें जाळिलें बहू ॥७॥

थुंकोनि टाकितां तेथें युद्ध जालें परोपरी ।
उपरी ताडिला तेणें एक नामचि पावला ॥८॥

हा गिरी तो गिरी पाहे गुप्त राहे तरूवरी ।
मागुता प्रगटे धांवे झेंपावे गगनोदरी ॥९॥

पळही राहिना कोठें बळेंचि चालितो झडा ।
कडाडां मोडती झाडें वाड वाडें उलंडती ॥१०॥

पवनासारिखा धांवे वावरे विवरें बहू ।
अपूर्व बाळलीला हे रामदास्य करी पुढें ॥११॥


(वृत्त भुजंगप्रयात)

लघूशी परी मूर्ति हे हाटकाची ।
करावी कथा मारुतीनाटकाची ।
असावी सदा ताइतामाजि दंडीं ।
समारंगणीं पाठ दीजे उदंडी ॥१॥

ठसा हेमधातूवरी वायुसुतू ।
तथा ताइताचेपरी रौप्यधातू ।
तयाची पुजा मंदवारीं करावी ।
बरी आवडी आर्त पोटीं धरावी ॥२॥

स्वधामासि जातां प्रभू रामराजा ।
हनूमंत तो ठेविला याच काजा ।
सदा सर्वदा राम दासासि पावे ।
खळीं गांजितां ध्यान सोडून धांवे ॥३॥


(वृत्त )

चपळ ठाण विराजतसे बरें ।
परम सुंदर तें रूप साजिरें ।
धगधगीत बरी उटि सिंदुरें ।
निकट दास कपी विरं हें खरें ॥१॥

कपीवीर जेठी उडे चारि कोटी ।
गिरी द्रोण दाटी तळाथें उपाटी ।
झपेटी लपेटी करी पुच्छवेटी ।
त्रिकुटाचळीं ऊठवी वीर कोटी ॥२॥

रघुविरा समिरात्मज भेटला ।
हरिजनां भजनांकुर फूटला ।
कपिकुळें सकळें मिनलीं बळें ।
रिपुदळें विकळें वडवानळें ॥३॥

कपीवीर तो लीन तल्लीन जाला।
प्रसंगचि पाहोनिं सन्मूख आला।
हनूमंत हें पावला नाम तेथें ।
महीमंडळीं चालिले सर्व येथें ॥४॥

नव्हे सौम्य हा भीम पूर्ण प्रतापी ।
देहो अचळातुल्य हा काळरूपी ।
पुढें देखतां दैत्यकूळें दरारा ।
भुतें कांपती नाम घेतां थरारा ॥५॥

सिमा सांडिली भीमराजें विशाळें।
बळें रेंटिले दैत्य कृत्तांतकाळें ।
गजामस्तकीं केसरीचा चपेटा ।
महारुद्र तैसा विभांडी त्रिकूटा ॥६॥



(वृत्त )

भिम भयानक तो शिक लावी ।
भडकला सकळां भडकावी ।
वरतरू वरता तडकावी ।
बळकटां सकळां धडकावी ॥१॥

सकळ ते रजनीचरभारे ।
सकट बांधत पुच्छ उभारे ।
रडत बोलति वीरच सारे ।
न दिसतांचि बळें भुभुकारे ॥२॥

जळतसे त्रिकूटाचळ लंका ।
धरितसे रजनीचर शंका ।
उमजती उमजे वरघाला ।
अवचितां बुडवी सकळांला ॥३॥

कठिण मार विरांस न साहे ।
रुधिरपूर महीवरि वाहे ।
बहुत भूत भुतावळि आली ।
रणभुमीवरि येउनि घाली ॥४॥

अमर ते म्हणती विर आला ।
नवल हें पुरले सकळांला ।
उदित काळ बरा दिसताहे ।
विधिविधान विधी मग पाहे ॥५॥


(वृत्त )

बळें सर्व संहारिलें रावणाला ।
दिलें अक्षयी राज्य बीभीषणाला ।
रघुनायकें देव ते मुक्त केले ।
अयोध्यापुरीं जावया सिद्ध जालें ॥१॥

पथामाजि कृष्णातिरीं रामराया ।
घडे राहणें स्नानसंध्या कराया ।
सिता राहिली शीरटें गांव जेथें ।
रघूराज तो पश्चिमेचेनि पंथें ॥२॥

जप ध्यान पूजा करी रामराजा ।
तयाचेपरी वीर सौमित्र वोजा ।
स्मरेना देहें चित्त ध्यानस्थ जालें ।
अकस्मात तें तोय अद््भूत आलें ॥३॥

बळें चालिला ओघ नेटें भडाडां ।
नभीं धांवती लोट लाटा धडाडां ।
नदी चालली राम ध्यानस्थ जेथें ।
बळें विक्रमें पावला भीम तेथें ॥४॥

उभा राहिला भीमरूपी स्वभावें ।
बळें तुंब तो तुंबिला दोन गांवें ।
नदी एक विभागली दोन्हि बाहें ।
म्हणोनि तया नांव हें गांव बाहें ॥५॥

सुखें लोटती देखतां रामलिंगा ।
बळें चालिली भोंवती कृष्णगंगा ।
परी पाहतां भीम तेथें दिसेना ।
उदासीन हें चित्त कोठें वसेना ॥६॥

हनूमंत पाहावयालागिं आलों ।
दिसेना सखा थोर विस्मीत जालों ।
तयावीण देवालयें तीं उदासे ।
जळांतून बोभाइला दास दासें ॥७॥

मनांतील जाणोनि केला कुढावा ।
दिले भेटिचा जाहला थोर यावा ।
बळें हांक देतांचि तैसा गडाडी ।
महामेघ गंभीर जैसा घडाडी ॥८॥

रघुराज वैकुंठधामासि गेले ।
तधीं मारुती दास हे नीरवीले ।
रघूनाथ उपासकाला प्रसंगें ।
सख्या मारुती पाव रे लागवेगें ॥९॥

प्रभूचे महावाक्य त्वां साच केलें ।
म्हणें दास हें प्रत्यया सत्य आलें ।
जनामाजि हें सांगतां पूरवेना ।
अवस्था मनीं लागली ते सरेना ॥१०॥


(वृत्त मालिनी)

भुवनदहनकाळीं काळ विक्राळ जैसा ।
सकळ गिळित ऊभा भासला भीम तैसा ।
दुपटत कपि झोंकें झोंकिली मेदिनी हे ।
तळवट धरि धाकें धोकलीं जाउं पाहे ॥१॥

गिरिवरुनि उडाला तो गिरी गुप्त झाला ।
घसरत दश गांवें भूमिकेमाजि आला ।
उडती झडझडाटें वृक्ष हे नेटपाटें ।
पडति कडकडाडें अंग घातें धुधाटें ॥२॥

थरथरित थरारी वज्र लांगूल जेव्हां ।
गरगरीत गरारी सप्तपाताळ तेव्हां ।
फणिवर कमठाचे पृष्ठिशीं आंग घाली ।
तगटित पवनाची झेंप लंकेसि गेली ॥३॥

थरकत धरणी हे हाणतां वज्रपुच्छें ।
रगडित रणरंगीं राक्षसें तृणतुच्छें ।
सहज रिपुदळाचा थोर संव्हार केला ।
अवघड गड लंका शीघ्र जाळून आला ॥४॥

सहज करतळें जो ठेरुमांदार पाडी ।
दशवदन रिपू हे कोण कीती बराडी ।
अगणित गणवेना शक्ति काळासि हारी ।
पवनतनुज पाहो पूर्ण रुद्रावतारी ॥५॥


(वृत्त मालिनी)

फणिवर उठवीला वेग अद्भूत केला ।
त्रिभुवनजनलोकीं कीर्तिचा वोघ गेला ।
रघुपतिउपकारें दाटलें थोर भारें ।
परम धिर उदारें रक्षिलें सौख्यकारें ॥१॥

सबळ दळ मिळालें युद्ध ऊदंड झालें ।
कपिकटक निमालें पाहतां येश गेलें ।
परदळशरणघातें कोटिच्या कोटि प्रेतें ।
अभिनवचरणपातें दुःख बीभीषणातें ॥२॥

कपिसिरसघनदाटी जाहली थोर आटी ।
म्हणउनि जगजेठी धांवणें चारि कोटी ।
मृतिविरहित ठेले मोकळे सिद्ध झाले ।
सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ॥३॥

बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणनाथा ।
उठविं मज अनाथा दूर सारूनि वेथा ।
झडकरि भिमराया तूं करीं दृढ काया ।
रघुविरभजना या लागवेगेंचि जाया ॥४॥

तुजविण मज पाहें पाहतां कोण आहे ।
म्हणउनि मन माझें रे तुझी वाट पाहे ।
मज तुज निरवीलें पाहिजे आठवीलें ।
सकळिक निजदासांलागिं सांभाळवीलें ॥५॥

उचित हित करावें उद्धरावें धरावें ।
अनहित न करावें त्वां जनीं येश घ्यावें ।
अघटित घडवावें सेवकां सोडवावें ।
हरिभजन घडावें दुःख तें वीघडावें ॥६॥

प्रभुवर विरराया जाहली वज्र काया ।
परदळ निवटाया दैत्यकूळें कुटाया ।
गिरिवर उतटाया रम्यवेषें नटाया ।
तुजचि अलगठाया ठेविलें मुख्य ठाया ॥७॥

बहुत सबळ सांठा मागतों अल्प वांटा ।
न करित हित कांटा थोर होईल ताठा ।
कृपणपण नसावें भव्य लोकीं दिसावें ।
अनुदिन करुणेचें चिन्ह पोटीं वसावें ॥८॥

जळधर करुणेचा अंतरामाजि राहे ।
तरि तुज करुणा हे कां नये सांग पां हे ।
कठिण हृदय जालें काय कारुण्य गेलें ।
न पवसि मज कां रे म्यां तुझें काय केलें ॥९॥

वडिलपण करावें सेवकां सांवरावें ।
अनहित न करावें तूर्त हातीं धरावें ।
निपटचि हटवादें प्रार्थिला शब्दभेदें ।
कपि घन करुणेचा वोळला रामवेधें ॥१०॥

बहुतचि करुणा या लोटली देवराया ।
सहजचि कफकेतें जाहली वज्र काया ।
परम सुख विलासे सर्वदासनुदासें ।
पवनतनुज तोषें वंदिला सावकाशें ॥११॥


(वृत्त चामर)

रुद्र हा समुद्र देखताक्षणीं उठावला ।
शिराणीचें किराण सज्ज त्रिकुटास पावला ।
वात जातसे तसाचि स्थूळ देह राहिला ।
वावरोनि विवरोनि तो त्रिकूट पाहिला ॥१॥

हीन देव दीनरूप देखतांचि पावला ।
गड्गडीत धड्धडीत कड्कडीत कोपला ।
लाटि कूटि पाडि फोटि झोडि झोडि झोडला ।
दैत्यलोक एक हाक सर्वगर्व मोडिला ॥२॥

सानरूप तें स्वरूप गुप्तरूप बैसला ।
पुच्छकेत शोध घेत त्रीकुटांत बैसला ।
गड्गडी दिसेचिना बुझेल कोण कैसला ।
वळवळी चळवळी विशाळ ज्वाळ जैसला ॥३॥

काळदंडसे प्रचंड ते वितंड जातसे ।
भारभार राजभार पुच्छमार होतसे ।
पाडिले पछाडिले रुधीरपूर व्हातसे ।
दैत्य बोलती बळें पळोन काय घ्यातसे ॥४॥

काळकूट तें त्रिकूट धूट धूट ऊठिलें ।
दाट थाट लाट लाट कूट कूट कूटिलें ।
घोर मार ते सुमार लूट लूट लूटिले ।
चिर्डिलेचि घर्डिलेचि फूट फूट फूटिले ॥५॥

दाट थाट आट घाट तें कपाट घातलें ।
सर्व रोध तो निरोध थोर दुःख पावले ।
सैन्य कट्ट त्यासी घट्ट कर्करून बांधिलें ।
थोर घात त्यास पात चर्फडीत चेंदलें ॥६॥

वज्र पुच्छ त्यासि तुच्छ मानिलें निशाचरीं ।
सर्वही खण्खणाट ऊठिले घरोघरीं ।
फुटेचिना तुटेचिना समस्त भागलें करीं ।
लट्लटीत कांपती बहुत धाक अंतरीं ॥७॥

थोर थोर दूर दूर दाट दाट दाटले ।
कोण मस्त तंग बस्त थाट थाट थाटले ।
मंदिरीं घरोघरीं अचाट पुच्छ वाढलें ।
दैत्यनास तो घसास काट काट काटले ॥८॥

हात पाय मान माज वोढितें पछाडितें ।
अडचणीत अड्कवूनि पीळ पेंच काढितें ।
लोहदंडसें अखंड राक्षसांसि ताडितें ।
मूळ जाळ व्याळ जाळ दैत्यकूळ नाडितें ॥९॥

थोर धाक एक हाक त्रीकुटासि पूरले ।
घरोघरींच चळवळी पुढें उदंड ऊरलें ।
बैसले उदंड दैत्य तैं सभेत घूसले ।
सभा विटंबिली बळेंचि कोणसें न सूचलें ॥१०॥

देह मात्र एक सूत्र थोर यंत्र हालिलें ।
पुरोनि ऊरलें बळें सभेमधेंचि चालिलें ।
रत्नदीप तेलदीप तेज सर्व काढिलें ।
लाटि कूटि धामधूम पाडिले पछाडिले ॥११॥

गुप्तरूप मारुती दशाननाकडे भरे ।
मुगुट पाडिला शिरीं कठोर वज्र ठोंसरे ।
सभा विटंबिली बळेंचि गर्गरीत वावरे ।
बलाढ्य दैत्य मारिले कठीण पुच्छ नावरे ॥१२॥

हस्तमार दैत्यमार दंडमार होतसे ।
लंडसे कलंडले उलंडलेचि मंडसे ।
येत येत पुच्छकेत दैत्य सर्व बोलती ।
गळीत बैसले भुमीं न बोलती न चालती ॥१३॥

स्वप्नहेत सौख्य देत दैत्यघात भावला ।
रुद्र हा उठावला कुढावयासि पावला ।
जाळिलें त्रिकूट नीट आपटून रावणी ।
राक्षसांसि थोर दुःख ऊसिणें ततक्षणीं ॥१४॥

दीनरूप देव सर्व हास्यरूप पाहिलें ।
कळ्वळून अंतरीं रघुत्तमासि वाहिलें ।
एक वीर तो सधीर थोर धीर ऊठला ।
तोष तोष तो विशेष अंतरींच दाटला ॥१५॥

उदंड देव आटिले तयांसि भीम आटितो ।
रामदूत वातसूत लाटि लाटि लाटितो ।
ऊठ आमुचे समस्त कूट कूट कूटितो ।
धूट धूट दैत्य त्यास लूट लूट लूटितो ॥१६॥

समस्त दैत्य आळितो बळें त्रिकूट जाळितो ।
पुरांत गोपुरें बरीं निशाचरांसि वाळितो ।
उदंड अग्नि लाविला बहू बळें उठावला ।
कडाडिला तडाडिला भडाडिला धडाडिला ॥१७॥

उदंड जाळिलीं घरें कितेक भार खेंचरें ।
किलाण धांवती भरें सुरांसि वाटलें बरें ।
वितंड दैत्य धांवडी तयांत पुच्छ भोंवडी ।
कडाकडी खडाखडी गडागडी घडाघडी ॥१८॥

बळें चपेट मारिला उदंड दैत्य हारिला ।
तरारिला थरारिला भयंकरू भरारिला ।
गद्गदी तनू वितंड सागरीं सरारिला ।
जानकीस भेटला प्रभूकडे झरारिला ॥१९॥

काळसे विशाळ दैत्य त्यांत एकला भरे ।
थोर धाक एक हाक काळचक्र वावरे ।
शक्ति शोधिली बळेंचि भव्य देखिले धुरे ।
वानरांसहीत रामदास भेटले त्वरें ॥२०॥


(वृत्त )

कपिवर उठविला वेग अद्भुत केला
त्रिभुवनजनलोकी कीर्तीचा घोष केला
रघुपति उपकारें दाटले थोर भारें
परम धिर उदारें रक्षिले सौख्यकारें ॥१॥

सबळ दळ मिळालें युध्य ऊदंड जालें
कपिकटक निमालें पाहतां यश गेलें
परदळशरघातें कोटिच्या कोटी प्रेतें
अभिनव रणपातें दुःख बीभीषणातें ॥२॥

कपिरिसघनदाटी जाहली थोर आटी
म्हणउनि जगजेठी धांवणी च्यारि कोटी
मृत्यविर उठविले मोकळे सीध जाले
सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ॥३॥

बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणनाथा
उठवि मज आता अनाथा दूरी सारूनि वेथा
झडकरी भिमराया तूं करी दृढ काया
रघुविभजना या लागवेगें चि जाया ॥४॥

तुजविण मज पाहे पाहतां कोण आहे
म्हणउनि मन माझें रे तुझी वास पाहे
मज तुज निरावीलें पाहिजे आठविलें
सकळिक निजदासांलागि सांभाळविलें ॥५॥

उचित हित करावें उधरावें धरावें
अनुचित न करावें तां जनीं येश घ्यावें
अघटित घडवावें सेवकां सोडवावें
हरिभजन घडावें दुःख तें वीघडावें ॥६॥

प्रभुवर विरराया जाहली वज्रकाया
परदळ निवटाया दैत्यकूळें कुटाया
गिरिवर उतटाया रम्य वेशें नटाया
तुज चि अलगटाया ठेविलें मुख्य ठाया ॥७॥

बहुत सबळ साठा मागतो अल्प वांटा
न करित हितकांटा थोर होईल तांठा
कृपणपण नसावे भव्य लोकीं दिसावें
अनुदिन करुणेचें चिह्न पोटी वसावें ॥८॥

जळधर करूणेचा अंतरामाजि राहे
तरि तुज करूणा हे कां न ये सांग पाहे
कठिण हृदय जालें काय कारुण्य गेलें
न पवसि मज कां रे म्यां तुझे काय केले ॥९॥

वडिलपण करावें सेवकां सांवरावे
अनहित न करावें तुर्त हाती धरावें
निपट चि हटवादें प्रार्थिला शब्दभेदें
कपि घन करूणेचा वोळला रामवेधें ॥१०॥

बहुत चि करूणा या लोटली देवराया
सहज चि कफकेतें जाहली वज्रकाया
परम सुख विळासे सर्व दासानुदासें
पवनमुज तोषें वंदिलो सावकाशें ॥११॥

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.