पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/13

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

 कृष्णगोपाल यांनी एका मुलाखतीदरम्यान शशीताईंना विचारले, “या तीस वर्षात तुम्ही स्वयंसेवक ते विकासतज्ञ असा प्रवास केला. तुमच्या मते अजूनही विकास क्षेत्रात स्वयंसेवी कामासाठी जागा आहे का?" त्यावर शशीताईंनी उत्तर दिले, “नक्कीच. मी तर असं म्हणेन आज तुम्ही मला विकासतज्ञ म्हणून पाहता, त्याची मुळे त्या काळी केलेल्या स्वयंसेविकेमध्ये आहेत. मला असं वाटतं की महाविद्यालयीन युवकांना वंचित समाजात काम करायला आणि प्रत्यक्षात त्यांच्यासोबत राहून त्यांना आपले शेजार स्वीकारण्याची संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही फक्त लाभार्थी असता. तुम्ही दाता किंवा कर्तासुद्धा नसता. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाकडून काहीना काही घेत असता. या दिवसांमध्ये जर तुम्ही गरिबांकडून मदत घ्यायला शिकलात, तर तुम्ही त्यांना समानतेच्या भूमिकेतून स्वीकारू शकता कारण तुम्ही परस्परावलंबी असता. समाजाच्या दोन्ही घटकांमध्ये देवाणघेवाण होणं, हे फार महत्वाचं असतं.

 आपण ज्या समाजासाठी काम करतोय, त्यांच्या सोबत जगणं, शिकायला हवं. समान आर्थिक परिस्थितीमध्ये राहण्याचा अनुभव, परस्परावलंबनासंबंधी तुमचा दृष्टिकोन बदलण्यासाठी उपयोगी ठरतो.

 तुम्ही जेव्हा स्वयंसेवक म्हणून या क्षेत्रात प्रवेश करता तेव्हा तुमच्यामध्ये एक खुमखुमी असते, की आम्ही एका रात्रीत हे जग बदलू शकतो. तशी ती विकासतज्ञांमध्येही असते. एकूणच या क्षेत्रात बघितलं तर अहंकार असतोच.

 विकासतज्ञांच्या बाबतीत म्हणाल, तर तिथे माणुसकीला वाव कमी असतो आणि त्यातही तुम्ही जर या कामासाठी मानधन घेत असाल तर अगदीच कमी. स्वयंसेवकाच्या बाबतीत तसं होत नाही. तिथे तुम्हाला मानधन मिळत नसल्यानं तुमचं साधं राहणीमान तुम्हाला नम्र ठेवायला मदत करतं. मला असं अजिबात म्हणायचं नाही की या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मानधन मिळायला नको. पण माणुसकी जपणं महत्त्वाचं आहे आणि ही माणुसकी जपायला किंवा आपल्यातला अहंभाव कमी करायला स्वयंसेवकांना ही संधी नक्कीच जास्त प्रमाणावर असते."

❖❖❖
१३
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन