पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/18

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६. शशीताईंची गुणवैशिष्ट्ये

 शशीताईंना भेटलेल्या विविध व्यक्तींना त्यांच्यात जाणवलेले गुण, आपल्याला समजून घेणे प्रेरणादायी ठरेल. ह्यात त्यांना जवळून ओळखणाऱ्या जयाप्रदाताई, बाळकृष्ण, श्यामला आणि नंदिताताईंची मनोगते एकत्रित केली आहेत.

 सहविकासाच्या (CDF) अध्यक्षा, जयाप्रदाजी शशीताईंबद्दल लिहितात, “शशीताईंची आणि माझी पहिली भेट २२ फेब्रुवारी १९९३ रोजी मकदुम पूरम, ध्यानसंगममध्ये झाली. शशीताई खूपच वक्तशीर होत्या. वक्तशीर राहून व्यक्ती आणि संस्था कार्यक्षम होतात, हा त्यांचा दृढ विश्वास होता. वेळेवर येणाऱ्याचा त्या आदर करत.

 एकदा नकलागट येथे सकाळी १०.०० वा. मिटिंग होती. मी तेथे १० मिनिटे उशिरा पोहोचले. शशीताईंनी मिटिंग थांबवली आणि हजर असलेल्या सर्व महिलांना अगदी विधवांसकट सगळ्यांना कुंकू लावायला मला सांगितले. त्यांनी सांगितले की प्रत्येकाने कोणत्याही कामासाठी ठरलेल्या वेळेच्या एक मिनिट अगोदर पोचले पाहिजे.

 शशीताई नेहमी म्हणत की, प्रशिक्षण कार्यक्रमामुळे व्यक्तीच्या विचार करण्याच्या क्षमता विस्तारतात आणि विविध संकल्पनांची जाणीव निर्माण होते.

 आमच्या संघाच्या नोंदणीच्या वेळी हैद्राबादला तीन दिवसांचे प्रशिक्षण झाले. शशीताईंनी आम्हाला १९९५ चा कायदा समजावून सांगितला. झालेल्या संपूर्ण चर्चेचे टिपण करायला सांगितले. सर्व संकल्पना समजतील अशा पद्धतीने ते करवून घेतले.

 १९९४ साली आम्ही ठरवलेल्या संमेलनाची तारीख कळवण्यासाठी आम्ही हैद्राबादला गेलो होतो. त्यांनी आम्हाला आमची आर्थिक स्थिती आणि हिशोबपालन यासंबंधी विचारले. हिशोब ठेवण्यामध्ये चुका आहेत. हे समजल्यावर त्यांना राग आला. तेव्हा मी त्यांना सांगितले, पहिले आम्हाला लेखा व्यवहाराचे प्रशिक्षण द्या. आणि दोन महिन्यांतच हे प्रशिक्षण आयोजित केले गेले. या प्रशिक्षणात एका गटाची अध्यक्षा निरक्षर असल्याचे त्यांना कळले, तेव्हा त्यांनी त्या बाईच्या पाया पडून, लिहायला वाचायला शिकण्याची विनंती केली. महिलांना प्रोत्साहन देण्यामध्ये त्यांचा

१८
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन