पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/44

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संधी घेतली पाहिजे असे त्यांचे म्हणणे असायचे.

खट्याळ मूल

 शशीताईंच्यात एखादे खट्याळ मूल लपले आहे की काय असे वाटावे असा हा प्रसंग. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी आम्हा प्रशिक्षण सहाय्यकापैकी कुणाचा तरी वाढदिवस होता. आम्ही सर्वांनी मिळून तो साजरा केला. केक कापला आणि 'हैप्पी बर्थडे टू यू' हे गाणं आमच्याकडून संपलं आणि मग शशीताईंनी गाणं गायला सुरुवात केली 'हैप्पी बर्थडे टू यू, यू कमिंग फ्रॉम झू' मग विविध प्राण्यांची नावं घेऊन शशीताई गाणं म्हणत राहिल्या. गाणं सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आम्ही फक्त खळखळून हसतच होतो.

 अत्यंत कडक, काटेकोर शिक्षिकेतले हे खट्याळ मूल फारच लोभसवाणं होतं एवढं मात्र खरं.

महिला परिषदांमधील शशीताईंचा सहभाग

 चैतन्य संस्थेने एनेबल नेटवर्क सोबत स्वयंसहाय्यता गट सदस्यांच्या दोन महिला परिषदांचे आयोजन केले होते. ४ मार्च २०१० रोजी "नॅशनल कॉन्फरन्स ऑन एस.एच.जी. (सेल्फ हेल्प ग्रुप्स) फेडरेशन्स चॅलेन्जेस अँड वे अहेड" आणि २३-२४ फेब्रुवारी २०११ रोजी राज्यस्तरीय स्वयंसहाय्य गट महिला जागर संमेलन संपन्न झाले. शशीताई या दोन्ही परिषदांमध्ये सक्रिय होत्या. (फक्त जागर संमेलनात प्रकृती अस्वाथ्यमुळे प्रत्यक्षात सहभागी होता आले नाही, पण नियोजनात होत्या.)

 शाश्वतता, आत्मनिर्भरता, स्वावलंबन, पारदर्शकता ही कोणत्याही संस्थेसाठी आवश्यक मूल्ये आहेत. शशीताई या मूल्यांसाठी आयुष्यभर आग्रही राहिल्या. ही मूल्ये संस्थेसाठीच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही पायाभूत होती. म्हणूनच वयाच्या सोळाव्या वर्षीपासून त्या स्वतंत्र, आत्मनिर्भर आयुष्य जगल्या. शशीताई दरवर्षी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा लेखाजोखा आपल्या निवडक लोकांसोबत वैयक्तिक अहवालाच्या स्वरूपात मांडत असत. एवढी पारदर्शकता पाळणारे अपवादात्मकच असतात.

४४
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन