पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/109

हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्याची दिल्लीच्या सरकारी सदनात मोठी घाई उडाली. या विषयाचा अभ्यास करण्याकरिता एक समिती तातडीने नेमण्याचे ठरले. दिल्लीच्या सचिवालयात काही व्यावसायिक तज्ज्ञ मंडळी ठिय्या मारून बसलेलीच असतात. विषय कोणताही असो, तज्ज्ञांची समिती नेमायची आहे काय? आम्ही तयार बसलो आहोत असे म्हणणारी व्यावसायिक तज्ज्ञ मंडळी टपून बसलेलीच असतात. हनुमंतराव, स्वामीनाथन अशी मंडळी कोणत्याही एका वेळी दोनतीन समित्यांवर नेमली गेलेली असतातच. लोकसंख्याविषयक समिती नेमायचे ठरले आणि त्याचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली एम्. एस्. स्वामीनाथन यांची. भाताच्या नवीन जाती शोधण्याच्या क्षेत्रात काही संशोधन केलेले डॉक्टर स्वामीनाथन लोकसंख्या समितीचे अध्यक्ष बनले.
 समितीने एक अहवालही देऊन टाकला. एका हातात गाजर, दुसऱ्या हातात छडी, एका हातात मर्फी रेडिओ, दुसऱ्या हातात नसबंदीची सुरी असल्या संजय गांधी तोंडवळ्याच्या धोरणाचा नवा अवतार स्वामीनाथन समितीने सुचवला आहे. कुटुंबकल्याणाचा कार्यक्रम निवृत्त लष्करी जवानांकडे असावा. दोनपेक्षा जास्त मुले असलेल्यांना सरकारी नोकरीत प्रवेश नसावा, निवडणुका लढविण्याचा अधिकार नसावा. दिल्ली येथे लोकसंख्या प्रश्न हाताळण्यासाठी एक स्वायत्त महाआयोग असावा, अशा येनकेन प्रकारेण सरकार या संस्थेची बांडगुळे मजबूत करणाऱ्या शिफारशी स्वामीनाथन समितीने दिल्या आहेत.
 नोकरशहांखेरीज दुसरा एक गटही बुखारेस्ट परिषदेवर नाराज होता, नियोजनाची साधने तयार करणाऱ्या कारखानदारांचा. कुटुंबनियोजनाचे सर्वात प्रभावी साधन सुबत्ता आहे असे म्हटले की या कारखानदाऱ्यांच्या खजिन्यालाच हात घातल्यासारखे होईल. नोकरशहा आणि कारखानदारांचा एक गट कैरो येथील परिषदेत लोकसंख्येचे नियोजन सुबत्तासिद्ध नाही, त्यासाठी मोठी यंत्रणा उभारली पाहिजे असे दाखवण्याचा मोठा आटोकाट प्रयत्न करणार आहे.
 बादरायणी संबंध

 संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुख सचिवालयातील लोकसंख्येच्या प्रश्नावरील विभागाच्या प्रमुख श्रीमतीजींनी स्वतःच याबाबतीत पुढाकार घेतला आहे. सचिवालयातर्फे कैरो परिषदेस सादर होणाऱ्या अहवालात सुबत्ता हेच सर्वात प्रभावी नियोजन या कल्पनेवर हल्ला करण्यात आला आहे असे कळते. त्यासाठी एक संख्याशास्त्रीय अभ्यासाचा आधार घेतला असल्याचेही समजते. मेक्सिकोतून अमेरिकेत येऊन लॉस एंजलिस येथे स्थायिक झालेल्या कुटुंबाच्या पाहणीत

भारतासाठी । १०९