पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/111

हे पान प्रमाणित केलेले आहे.


महात्माजींचा पराभव


 माझं सुदैव म्हणा की दुर्दैव, आयुष्यात मला कोण्या महात्म्याचं दर्शन झालं नाही. गांधीजी गेले तेव्हा मी लहान होतो, विद्यार्थी होतो त्यामुळे त्यांच्या दर्शनाचा योग आला नाही. मोठा झाल्यानंतर मी माझ्या कामाला लागलो. दरम्यान, काही महात्मे समोर येऊन गेलेही असतील पण त्यांचं महात्म्य मला जाणवलं नसावं म्हणून मला दुर्दैवी म्हणा. नंतर कदाचित लक्षात येईल की, अमुक एक व्यक्ती भेटली होती आणि ती महात्मा होती; पण आजपर्यंत असं जाणवलं नाही.
 याला एक अपवाद आहे. त्यांची भेट झाली होती म्हणणं कठीण आहे; पण रविशंकर महाराजांचं जेव्हा दर्शन झालं तेव्हा ते त्यांच्या अखेरच्या आजारपणात होते. बिपीनभाई मला त्यांच्यासमोर घेऊन गेले. रविशंकर महाराजांना बोलताना कष्ट होत होते, ऐकू येण्यातही अडचण होती, पण त्यांची बुद्धी स्वच्छपणे काम करीत होती. बिपीनभाईंनी जेव्हा माझं नाव सांगितलं तेव्हा माझं नाव शेतकरी आंदोलनाशी जोडलेलं आहे याची त्यांना माहिती असल्याचे जाणवले. हे एक उदाहरण सोडलं तर महात्म्यांचं दर्शन होण्याचे भाग्य - सौभाग्य किंवा दुर्भाग्य मला लाभलेलं नाही.
 सौभाग्य शब्द मी यासाठी वापरतो की सर्वसाधारण माणसाच्या जीवनावर महात्म्यांच्या संपर्काचा परिणाम काय होत असावा हे सांगणं कठीण आहे; पण अनेक महात्म्यांच्या परिवारांची मती व गती कुंठित झालेलीच पाहायला मिळते.

 महाकवि कालिदासांनी रघुवंशाच्या 'इंदुमति स्वयंवर' या अध्यायात उपमालंकाराचा अत्यंत सुरेख आविष्कार दाखविला आहे. राजकन्या इंदुमतीच्या स्वयंवरासाठी बरेच राजपुत्र मंडपात बसले होते. इंदुमतीला घेऊन सुनंदा एका एका राजकुमाराचा परिचय करून देत पुढे पुढे जात होती. जसजशी इंदुमती

भारतासाठी । १११