पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/112

हे पान प्रमाणित केलेले आहे.

एखाद्या राजकुमारासमीप येऊ लागे तसतशी त्या राजकुमाराच्या मनात आशा जागी होत असे की ही मलाच माळ घालील आणि त्याचा चेहरा उजळून जात असे; पण त्याला वगळून ती पुढे जाऊ लागताच त्याचा चेहरा काळवंडून जात असे.
 आपल्याही समोर आपल्या आयुष्यभरात काही 'महात्मे' येऊन जात असतील, आपण त्यांचे महात्म्य ओळखू म्हणून त्यांचे चेहरे उजळत असतील आणि आपल्याला त्यांच्यात महात्म्य जाणवले नाही म्हणून ते चेहरा पाडून जात असतील. आपली निराशा होते, त्यांचीही निराशा होत असेल!
 महात्मा म्हणजे अंधारामध्ये प्रकाश देणारा दिवा किंवा उन्हामध्ये छाया देणारा वृक्ष होय असे धरले तरी तो जो काही प्रकाश किंवा ती जी काही छाया असेल त्याचा फायदा घेणे, न घेणे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असते.
 सूर्य आपला प्रकाश सर्व ठिकाणी सारखाच देतो. सूर्याचे प्रकाशकिरण मातीवर पडले तर ते परावर्तित होत नाहीत; पण तेच किरण जर एखाद्या रत्नावर किंवा हिऱ्यावर पडले तर त्यावरून त्यांचे परावर्तन होते आणि रत्न किंवा हिरा मोठा विलोभनीय दिसतो.
 घनदाट सावलीचा वृक्ष रणरणत्या उन्हात चालणाऱ्या वाटसरूसाठी काही काळासाठी विश्रांतिस्थान होऊ शकतो. विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने आपली वाटचाल तो वाटसरू पुढे चालू करणार असेल तर विश्रांतीचा काही उपयोग झाला असे म्हणता येईल; पण जर का वाटसरू त्या सावलीच्या मोहात पडून तिथेच थांबून राहिला तर तो वृक्ष त्या वाटसरूच्या उपयोगी पडला असं म्हणणं कठीण आहे.
 अंधारात एक प्रकाशकिरण चमकला, पुढे पाऊल कसे टाकायचे याचे दर्शन झाले की, त्या प्रकाशकिरणाच्या टप्प्याबाहेरील अंधारातही एखादं पाऊल टाकण्याची हिम्मत आली तर त्या प्रकाशकिरणाच्या जनक दीपाने काही काम केले असे म्हणता येईल; पण त्या दिव्यावरच जीव जडून तेथेच बसून राहिले तर दिव्याचा आपल्याला काही उपयोग झाला असं म्हणणं कठीण आहे.

 मला असं वाटतं की, बऱ्याच महात्म्यांच्या बाबतीत दुर्दैवाची गोष्ट ही घडली आहे की, त्यांच्या सावलीमध्ये ज्यांचं लालनपालन व्हायला हवं होतं, त्यामध्ये जे मोठे व्हायला हवे होते आणि मोठे होऊन त्या सावलीतून बाहेर पडून पुढच्या पिढीसाठी ज्यांनी सावल्यांच्या जागा तयार करण्याची हिम्मत करायला हवी होती ते बहुतांशी त्या महात्म्यांच्याच सावलीत विश्रांती घेत बसले. सावलीतून

भारतासाठी । ११२