पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/139

हे पान प्रमाणित केलेले आहे.

तो सगळा भाषावर प्रांत रचना झाल्यामुळे झाला. यामुळे देशात वेगवेगळ्या भाषा बोलण्यायचं भांडण सुरू झालं." असं लिहिणारे काही अपवादात्मक लेखक सोडले तर विषय जवळजवळ संपला आहे असं आपण गृहीत धरून चाललो होतो. बेळगाववाल्यांची मध्येच काहीतरी तक्रार चालू व्हायची किंवा झारखंडवाले आपल्याला वेगळं राज्य पाहिजे असं मागत होते. झारखंडवाल्यानी त्यांची किमत काय हे रुपये आणि पैशात मांडल्यानंतर त्याचं महत्त्व आपोआप कमी झालं होतं आणि एकदम पंतप्रधांनानी लालकिल्ल्यावरून बोलताना उत्तराखंडाचं राज्य आम्ही द्यायचं ठरवलं आहे असं जाहीर होईल असंही सांगितलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या सरहद्दी कोणत्या व त्या कशा असाव्यात यासंबंधी सगळीकडे चर्चा सुरू झाली. महाराष्ट्राविषयी बोलायचं झालं तर विदर्भामध्येही चर्चा अधिक प्रकर्षाने सुरू झाली आणि राजकीय पक्षाच्या हद्दी ओलांडून लोक विदर्भाच्या बाजूने बोलू लागले. अर्थात, राज्यकर्त्या पक्षांनी म्हणजे शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांनी आपला विरोध आहे असं जाहीर केलं. तसं त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी दमदाटी केली असं काही नाही. ते दमदाटीची भाषा इतरत्र बोलतात; पण तरीसुद्धा बाळासाहेब जे बोलले त्यांच्या विरुद्ध कोणी बोलायचं अशी शंका लोकांच्या मनात येऊन जाते अन् त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बोलावे की नाही अशी मनात थोडी धाकधूक राहते. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी स्वतंत्र विदर्भ राज्यास विरोध केला तेव्हा लोक त्यांना भेटायला गेले तेव्हा ते म्हणाले, "थांबा! १९९८ सालापर्यंत मी विदर्भाची काय भरभराट करून टाकतो ते बघा व मग तुमची मागणी मांडा." विदर्भामध्ये काँग्रेसचे नेते परिषदा भरवून चुकले, आंदोलनाला सुरुवात झाली. शरद पवारांचे अत्यंत जवळचे व विरुद्ध असलेले असे दोन्ही नेते त्यांच्यात सामील झाले आणि शरद पवार आणि शंकरराव चव्हाण असे दोन्ही नेते कधी नव्हे ते एकत्र येऊन ते विदर्भाला विरोध करण्यासाठी उभे आहेत. याचा अर्थ काय की, स्वतंत्र विदर्भाला त्यांचा विरोध म्हणजे स्वतंत्र मराठवाड्याला त्यांचा विरोध असणारच आहे.

 आजपर्यंत कोकणच्या लोकांनी स्वतंत्र राज्य हवे, अशी मागणी केलेली नाही. कारण कोकणला मुंबईच्या जवळ राहणं आवश्यकच आहे; पण उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांना मुंबईपासून वेगळं करता आलं तर वेगळं करावं असे वाअणारा एक गट आहे; पण अजून तो काही बोलत नाही. या परिस्थितीमध्ये ही चर्चा इथे सुरू होते आहे.

भारतासाठी । १३९