पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/186

हे पान प्रमाणित केलेले आहे.

लातूर जिल्ह्यातली बरीच मुलं हल्ली परीक्षेत पहिली येतात, लातूर पॅटर्नमुळे. लातूरच्या मुख्याध्यापकांनी एकदा मेरीट लिस्टमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा माझ्या हस्ते सत्कार ठेवला. मी स्टेजवर उभा राहिलो. एकेका मुलाचं नाव घेतलं जाऊ लागलं. पहिली दुसरी आलेली मुलं. कुणी संस्कृतमध्ये पहिला आलेला, कुणी गणितात पहिला आलेला. अशी ती बिचारी मुलं येत होती आणि माझ्या पाया पडत होती. मला शरमल्यासारखं वाटलं. कारण, मी मोठा आहे म्हणजे काय, त्यांच्या दृष्टीनं त्याच्यापेक्षा फक्त वयानं मोठा आहे. ही मुलं इतकी बुद्धिमान, ही उद्या काय कर्तबगारी दाखवतील, काय विद्वत्तेची भरारी मारतील! अशा या उद्याच्या शिल्पकारांना मी त्यांच्यापेक्षा केवळ वयानं मोठा आहे म्हणून माझ्या पाया पडायला लावणं ही किती वाईट गोष्ट आहे? वडीलधाऱ्यांचा आदर राखावा हे घरामध्ये ठीक आहे; पण एकदा घराच्या बाहेर पडलं की लोक सांगतात, "गुरुचा आदर राखावा." काही मर्यादेपर्यंत राखवा हे ठीक आहे. पुढे म्हणतात, "मोठी माणसं असतात त्यांचं ऐकावं" मग ही मोठ्या माणसांची यादी दिवसेंदिवस वाढत जाते. कोणी म्हणतं, मार्क्सने असं म्हटलं, कोणी म्हणतं गांधींनी असं म्हटलं, कोणी म्हटलं शिवाजीनं असं केलं, कोणी म्हणतं विवेकानंदांनी असं केलं, कोणी म्हणतं महंमद पैगंबराने तसं केलं; कोणी म्हटलं भगवद्गीतेमध्ये कृष्णानं असं सांगितलं आणि कोणी म्हटलं येशू ख्रिस्तानं तसं सांगितलं की, आम्ही बिचारे घाबरून जातो आणि समजतो एवढी थोर माणसं आहेत ना त्यांचच आपण ऐकलं पाहिजे.

 तुम्हा विद्यार्थ्यांना, एक अत्यंत कठोर वाटणार, सत्य सांगतो. कोणत्याही एका पिढीतला माणूस, एका पिढीतला अडाणी हा याच्या मागच्या पिढीतल्या विद्वानापेक्षा विद्वान असतो. कारण प्रत्येक पिढी मागच्या पिढीच्या खांद्यावर उभी असते. तेव्हा कोणीही मनुष्य मोठा असेल तर आदर बाळगायला हरकत नाही; पण पूर्वी कोणीतरी काही मोठं तत्त्व सांगितलं आहे म्हणजे त्याच्यापढे आपण जायचंच नाही हा रामदासांचा धोपटमार्ग चोखाळलाच पाहिजे असं नाही. विद्यार्थी मित्रांनो, कृपा करून, यापुढे धोपटमार्गाने चालू नका. आम्ही तर कबूल करतो आहोत की, "मागच्या पिढीने चुका केल्या, तुम्ही मागच्या पिढीचा मार्ग धरला आणि त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून चाललात तर तुम्ही खड्यात पडणार हे निश्चित आहे." तर तो मार्ग धरू नका. कोणाही माणसाचं मोठपण गृहीत धरू नका. कोणाही माणसानं दुसऱ्या एखाद्या माणसाला सदाकाळचा पुरुषोत्तम मानावं हा विचारांचा अंत आहे, हा बुद्धीचा शेवट आहे. कोणाही

भारतासाठी । १८६