पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/190

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अन्नधान्याच्या बाबतीतही तसेच दिसते. भूकबळींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. अन्नधान्याचा दरडोई उपभोग गेल्या ३० वर्षात झपाट्याने वाढत आहे. 'जमीन मर्यादित आहे, लोकसंख्या वाढत आहे, तेव्हा रोगराई आणि भूकबळी अपरिहार्य आहेत' हा सिद्धांत मांडला गेला होता. लोकसंख्यावाढीमुळे जीवनमान खाली तर येत नाही, उलट, लोकसंख्येबरोबरच आर्थिक प्रगतीचाही वेग वाढतो आहे.
 १७५० सालापर्यंत मनुष्यप्राण्याने जेवढी प्रगती केली तेवढी प्रगती त्याने त्यानंतरच्या शंभर वर्षांतच केली. तितकीच प्रगती करयला त्यानंतर त्याला पन्नास वर्ष पुरली. त्यानंतर, तेवढीच प्रगती करण्यास वीस वर्षे, दहा वर्षे, पाच वर्षे असा कमी कमी कालावधी लागतो आहे. आजकाल तर तेवढी प्रगती मनुष्यप्राणी वर्षाभरातच करतो आहे.
 हाँगकाँग आणि हिंदुस्थान हे डॉ. सायमन यांच्या विशेष कौतुकाचे विषय होते. १९५५ साली सायमन हाँगकाँगला गेले तेव्हा ते एक पसरलेले खेडे होते; हजारो लोक फूटपाथवर व छोट्या बोटींत रात्र काढीत. ही परिस्थिती पाहून सायमनना मोठे वाईट वाटले होते. लोकसंख्या कमी झाल्याखेरीज या लोकांना सुखाने जगता येणार नाही अशी त्यांची खात्री पटली होती. १९८३ साली ते हाँगकाँगला परत गेले त्यावेळी एक चमत्तारच घडलेला होता. लोकसंख्या कमी झालेली नव्हतीच, कित्येक पटींनी वाढली होती; आणि तरीही, व्यापार, उद्योगधंदे यांच्या वैभवाने हाँगकाँगची वसाहत दिमाखात उभी होती.
 हिंदुस्थानबद्दलही डॉ. सायमन कौतुकाने बोलतात. १९५४-५५ साली आंतरराष्ट्रीय संस्थांनी निष्कर्ष काढला. 'हिंदुस्थानातील धान्याचा तुटवडा आणि तेथील प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता तेथील भूकबळी थांबविणे अशक्य आहे. हिंदुस्थनवर वृथाश्रम आणि साधने घालविण्यापेक्षा त्याचा नादच सोडून द्यावा व तेवढ्याच प्रयासांनी बाकीचे सारे देश व्यवस्थित खाऊपिऊ शकतील त्या कामाकडे वळावे.' एका काळी हाताबाहेर गेलेली हिंदुस्थानची ही 'केस' आता अगदीच वेगळी दिसते. हिंदुस्थान अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे.

 १९८१ साली डॉ. सायमन यांनी 'निर्णायक साधनसंपत्ती (The Ultimate Resources) हे पुस्तक प्रसिद्ध केले आणि १९८६ साली मानवजातीची सद्य:स्थिती (The state of Humanity) हा अहवाल प्रसिद्ध केला. मोठे वादळ उठले.
 'लोकसंख्या गुणाकाराने वाढते, अन्नधान्याचा पुरवठा पावलापावलाने वाढतो,

भारतासाठी । १९०