पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/212

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि कच्चा मालाची निर्यात करणारे करीत, "रुपयाचे मूल्य योग्य ठेवा, अवास्तव वाढवू नका, कारण, ते कमी असलं तर निर्यात करणाराला फायदा होईल. देशाचाही लाभ होईल." रुपयाच्या विनिमयादराच्या चर्चेत असे दोन पक्ष होते - एक आयात करणारांचा आणि दुसरा निर्यात करणारांचा. या दोघांमध्ये त्याही वेळी वाद होता. सारांश, सगळ्या देशाला बंदिस्त व्यवस्था किंवा स्वदेशी लागू करायची म्हटली तर त्यामुळे फायदा होणारा एक गट आहे आणि खुली व्यवस्था चालू करायची म्हटली तर त्यामुळे फायदा होणारा एक गट आहे आणि खुली व्यवस्था चालू करायची म्हटली तर त्यातून फायदा होणारे लोक वेगळे आहेत.
 म्हणजे, जोतिबा फुल्यांच्या शब्दांमध्ये, येथे 'एकमय लोक' नाही; येथे देशच विभागलेला आहे; गेली वीस वर्षे मी सांगतो आहे त्याप्रमाणे येथे 'इंडिया' आणि 'भारत' अशी फाळणी झालेली आहे. खुली व्यवस्था ही 'भारता'ला फायद्याची आहे आणि बंदिस्त व्यवस्था, नव्या स्वदेशीची व्यवस्था ही 'इंडिया'च्या सोयीची आहे. 'इंडिया'ला एक धोरण सोयीचं आणि 'भारता'ला दुसरं एक धोरण सोयीचं आहे असं असलं तर काय निर्णय करायचा असा प्रश्न उभा राहतो आणि मग संघर्षाला सुरुवात होते.
 हिंदुस्थानात या विषयावर तीन वेळा संघर्ष झाले. डंकेल प्रस्ताव आला, जागतिक व्यापार संघटना तयार झाली म्हणूनच केवळ हा स्वदेशीचा वाद निघाला असं कोणी समजू नये म्हणून मी या तीन संघर्षांची मांडणी करतो आहे.

 हिंदुस्थानच्या अर्थकारणातच नव्हे तर सगळ्या राजकारणामध्ये खुलेपणा हवा असणारे आणि बंदिस्तपणा हवा असणारे यांचा संघर्ष सतत होत राहिला आहे. इंग्रज येण्याआधीचा काळ आपण सोडून देऊ. त्यावेळीही जो काही संघर्ष होता त्या संघर्षाची साधने, हत्यारे ही केवळ आर्थिक नव्हती अधिक व्यापक होती. बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य नाही; शेतकऱ्याला आपल्या घरात पैसासुद्धा ठेवायचा अधिकार नाही, त्याच्या घरात पैसा सापडला तर त्याचे हात कलम करावे अशी व्यवस्था! विद्या करणारे वेगळे, शस्त्रधारी वेगळे, व्यापार करणारे वेगळे, इतरांना या क्षेत्रात उतरायलाही मनाई. थोडक्यात, इंग्रज येण्याआधीच्या काळातही एक बंदिस्त व्यवस्था सवर्णांनी चालविली होती. सध्या मी त्या लढाईविषयी बोलत नाही; इंग्रज आले त्या काळापासून सुरुवात करणार आहे.

भारतासाठी । २१२