पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/215

हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक नवीन इतिहास बनवून शिकवू पाहतात. हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे मुसलमान विरुद्ध हिंदु अशा लढायांचा इतिहास आहे. अशी जी ते मांडणी करतात ती तद्दन खोटी आहे.
 जोतिबा फुले म्हणत की, "इंग्रज असला तरी तो या देशामध्ये काही कायमचा रहाणार नाही, एक दिवस त्याला जायचंच आहे; पण जोपर्यंत तो इथं आहे तोपर्यंत हिंदुस्थानातील मंडळींनी जातिव्यवस्था संपवावी; कोणला शूद्र मानू नये, अस्पृश्य मानू नये. सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा; इंग्रजांनी तंत्रज्ञानामध्ये खूप मोठी प्रगती केली आहे ती आपण शिकून घ्यावी. अशा तऱ्हेने त्यांचे सगळे न्याय, हुन्नर, विद्या शिकून घेतले की आपण 'एकसंघ राष्ट्र' म्हणून स्वातंत्र्य मिळविण्यास पात्र होऊ. त्यानंतर आपण इंग्रजांना 'इथून जा' म्हटलं तरी चालेल. त्याहीपुढे जाऊन जोतिबा फुले म्हणतात की, आज जर का आपण हिंदुस्थानातील सामाजिक तेढी संपवल्या नाहीत आणि स्वातंत्र्य आलं तर पुन्हा एकदा गुलटेकडीवर शूद्रांची मुंडकी आभाळात उडवली जातील. पुन्हा एकदा इथं नवी पेशवाई तयार होईल."
 पण, इंग्रज आल्यानंतर एक 'राष्ट्रवादी' गट 'परदेशातलं आम्हाला काही नको, आम्हाला शिकण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही' असं म्हणत होता. चिपळूणकरांचं म्हणणं प्रसिद्ध आहे – 'इंग्रजांनी आमचा पराभव केला, म्हणजे आम्ही काही हीन सस्कृतीचे ठरलो असे नाही. इतिहासामध्ये, रहाटगाडगं जसं 'चक्रनेमिक्रमाने'वर जातं, खाली जातं तसं आमचं गाडगं सध्या खाली गेलं आहे, एवढंच. आमची वेळ आली की, ते पुन्हा वर जाणार आहे, आम्हाला काहीही सुधारणा करायची गरज नाही. आमचा वर्णाश्रम धर्म, आमचं चातुर्वर्ण्य, आमची जातिव्यवस्था, आमचे वेद, आमची उपनिषदे यांच्या पलीकडे काहीही श्रेष्ठ नाही असं म्हणणाऱ्यांचा हा 'राष्ट्रीय' गट त्या काळात उभा राहिला. जोतिबा फुल्यांचा गट संख्येनं लहान होता; पण तो स्पष्टपणे म्हणत होता की, "स्वातंत्र्य मिळवायचं आहे, स्वराज्य मिळवायचे आहे, इंग्रजांना घालवायचं आहे; पण जर का 'एकमय लोक' म्हणून राष्ट्र तयार झालं नाही, जातिव्यवस्था संपली नाही, ब्राह्मणांनी केलेला जुलूम संपला नाही, शूद्रातिशूद्र जर का अज्ञानातच खितपत राहिले तर स्वातंत्र्य मिळूनसुद्धा त्याचा काही उपयोग नाही."

 असा, तथाकथित 'जहाल' विरुद्ध 'मवाळ', 'राजकीय' विरुद्ध 'सामाजिक' वादविवाद झाला त्याला मी 'स्वदेशीची पहिली लढाई' म्हणतो. स्वदेशीची मागणी करणारे 'राष्ट्रवादी' राजकीय स्वातंत्र्य ताबडतोब हवे म्हणणारे, आम्हाला

भारतासाठी । २१५