पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/219

हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुरुवात केली. ही 'स्वदेशीची दुसरी लढाई' आणि या दुसऱ्या लढाईतही 'स्वदेशी'वाले, राष्ट्रवादी संकुचित वृत्तीचे लोक जिंकले. 'स्वतंत्रतावादी' हरले.
 परिणाम असा झाला की, विज्ञान, तंत्रज्ञानच नव्हे तर सगळ्याच बाबतीमध्ये - स्वातंत्र्याचया काळामध्ये प्रगती होण्याऐवजी देशाची अधोगती होत गेली. भिंती बांधल्या, जगाशी संपर्क तोडला म्हणजे प्रगती होते हे 'ब्राह्मणी' तत्त्वज्ञान आहे. 'परदेशगमनाला बंदी आहे तेवढंच काय ते सत्य आहे.' हा संकुचित 'ब्राह्मणीपणा' समाजवादाच्या नावाखाली पुन्हा एकदा देशामध्ये प्रभावी झाला. समाजवाद आणि ब्राह्मणीपणा यात काही फरक नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही आपले वर्चस्व टिकवण्यासाठी सवर्णांनी समाजवादाचा मुखवटा वापरला. कर्नाटकातल्या एका दलित नेत्यानं त्याचं सुंदर वर्णन केलं आहे. त्याने एक 'देवरस ब्राह्मण' आणि एक 'नेहरू ब्राह्मण' अशा दोघांचा संवाद उभा केला आहे. देवरस ब्राह्मण दुसऱ्याला म्हणतो, "अरे, तू ब्राह्मण ना? देवरस पहा, आपणा ब्राह्मणाचं, सवर्णांचं भलं करायला पाहताहेत आणि त्यांना सोडून तू नेहरूंच्या मागे कुठे लागला?" त्यावर 'नेहरू ब्राह्मण' त्याला उत्तर देतो, "तुझ्या देवरसांनी काय केलं ब्राह्मणांकरिता? आमचे नेहरू पहा; त्यांनी ब्राह्मणाचं नाव घेततलं नाही, संध्या केली नाही; वेगळीच आचमने केली; पण समाजवादाचं नाव घेतलं आणि राष्ट्रीयीकरण केलं आणि कारखाने आपल्याच लोकांच्या हातात दिले की नाही? तुझ्या देवरसांना हे कुठं समजत आहे?"
 समाजवादाचं आणि राष्ट्रीयकरणाचं नाव घेऊन पुन्हा, वेगळ्या तऱ्हेने, सवर्णांचं राज्य चालू ठेवण्याची त्यांची कुशलता वाखाणण्यासारखीच आहे. स्वदेशीच्या दुसऱ्या लढाईतही संकुचित वृत्तीचे, खुलेपणाला विरोध करणारे जिंकले आणि पुन्हा एकदा, 'स्वतंत्रतावादी' बहुजनसमाजाचा पराभव झाला.

 समाजवादाच्या बंदिस्त पद्धतीची चाळीस वर्षे गेली. बंदिस्त पद्धत जगात कधी टिकूच शकत नाही. जुलियन सायमन नावाच्या एका मोठ्या अर्थशास्त्रज्ञाने एक अभ्यासपूर्ण प्रबंध लिहिला आहे, त्यात त्याने दोन निष्कर्ष काढले आहेत. मनुष्याजातीची ख्रिस्तानंतर १८०० वर्षेपर्यंत जवळजवळ काहीच प्रगती झाली नाही. किरकोळ झाली. राहणीमान पहा, खाणंपिणं पहा, आयुष्यमान पहा - १८०० सालापर्यंत त्यांत काही प्रगती झाली नाही. त्यानंतर जी काही प्रगती झालेली दिसते आहे ती अगदी 'प्रचंड झेपेची' झालेली आहे. आयुष्यमान, राहणीमान - सगळ्या दृष्टीने. आज आपण एक बटण दाबून इंग्लंडमध्ये चाललेली मॅच पाहू शकतो. हे असं काही घडेल असं १८०० सालच्या मानवाला

भारतासाठी । २१९