पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/242

हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरकारी यंत्रणेच्या रामरगाड्यात तीही फिकी पडली; तेव्हा आता 'रॅपिड ॲक्शन फोर्स' म्हणजे 'त्वरित कार्यान्वय दलां'चा उल्लेख झाला; पण त्या घोषणेनेही कोण्या श्रोत्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले नाहीत किंवा आता खरेच काही घडेल अशी अपेक्षाही तयार झाली नाही.


 रामाय स्वस्ति, रावणाय स्वस्ति

 १४ ऑगस्टच्या रात्री राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी जागतिकीकरणाचा उल्लेख 'भरतीची लाट' म्हणून केला होता आणि 'स्वातंत्र्य आणि न्याय यांचे संतुलन' साधण्याची आवश्यकता आग्रहाने प्रतिपादन केली होती. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच्या सकाळच्या वर्तमानपत्रांत आणि टेलिव्हिजनरेडिओवरील बातम्यांत ठळक मथळे होते ते राष्ट्रपतींच्या 'स्वातंत्र्य आणि न्याय यांच्या संतुलनासंबंधीच्या उद्गारांचे.

 पंतप्रधानांच्या भाषणात आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या खुलेपणाचे आव्हान भारतीय उद्योजक सहज पेलत आहेत, संभाव्य दुष्परिणामांवर सरकार निगराणी ठेवून आहे, आवश्यकता भासेल तेथे संरक्षण दिले जाईल असे सांगून त्यांनी जागतिकीकरणाच्या महालाटेबद्दल राष्ट्रपतींनी जो बागुलबुवा आदल्या दिवशी उभा केला होता त्याला मोठ्या कुशलतेने बगल दिली.  भारतातील राष्ट्रपतींची परंपरा अभ्यास, चिंतन आणि तत्त्वज्ञान यांकरिता मोठी उज्ज्वल आहे. एवढे प्रकांडपंडित आणि दार्शनिक सहसा सरळ स्पष्ट एक बाजू घेऊन बोलत नाहीत, 'जरतारी' भाषेत बोलतात हे समजण्यासारखे आहे. भारतीय घटनेत राष्ट्रपतींना अगदी जेरबंद करून ठेवलेले असल्यामुळे कोणत्याही विषयावर स्पष्टपणे बोलण्यात राष्ट्रपतींना मोठा संकोच वाटत असतो.

 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जमान्यापासून ही प्रथा चालू आहे. डॉ. राधाकृष्णन यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतातील आध्यात्मिक परंपरा यांची सांगड घालण्याची आवश्यकता मांडली होती. आता अगदी जिल्ह्यातालुक्याच्या पातळीवरील कोणीही 'खादी'धारी अशा समन्वयाची भाषा वापरतात.

 समन्वयाची भाषा पौर्वात्य संस्कृतीस शोभून दिसणारी आहे. आमच्या परंपरेत वादंगातील कोणत्याही एका पक्षाची बाजू घेणे हे अपरिपक्वतेचे किंवा पोरकटपणाचे लक्षण समजले जाते. दोनही बाजूत काही खरे आहे, चांगले आहे; दोनही बाजूतील चांगले तेवढे 'नीरक्षीरविवेका'ने बाजूस करणे हे महानतेचे लक्षण आहे असे सामान्यजनांतच नव्हे तर व्युत्पन्न लोकांतही समजले जाते.

भारतासाठी । २४२