पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/244

हे पान प्रमाणित केलेले आहे.

तीनही चेंडू जादूगाराच्या कसबाने फिरत ठेवण्याची परंपरा आहे. बौद्ध परंपरेत या वैचारिक ठिसूळपणाला आणखी वाव मिळाला. 'ब्रह्म सत्यम्, जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा' असे गर्जून सांगणाऱ्या आद्य शंकराचार्यांचे बौद्धिक कडवेपण लोपून गेले.


 नबळता लपविण्याचा डाव  समन्वय आणि संतुलन साधायचे म्हणजे नेमके काय करायचे? आधुनिक तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधायचा म्हणजे काय करायचे? सकाळी घरातून निघण्यापूर्वी यथासांग पूजाअभिषेक आटोपून, जपजाप्य करून मग राष्ट्रीय प्रयोगशाळेतील आपल्या संशोधनाच्या कामात 'सांजी' होईपर्यंत लक्ष घालावे आणि संध्याकाळी पुन्हा कोण्या महाराजांच्या प्रवचनाला आग्रहाने उपस्थिती लावावी या दिनक्रमाला अध्यात्म व विज्ञान यांचा संगम म्हणता येईल काय? या वागण्यात दुहेरीपणा आहे, एवढेच नव्हे तर दुटप्पीपणाही आहे. दोन वेगळ्या वेगळ्या प्रवृत्ती अनुभवीत असताना त्या दोघांचा एकमेकांशी संबंध काय हा प्रश्न प्रत्येक बुद्धिमान प्राण्याला पडला पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर मन आणि बुद्धी यांचे समाधान होईपर्यंत त्याने शोधत राहिले पाहिजे; बुद्धी कौल देईल त्याप्रमाणे वागणूक बदलण्याचे धैर्यही दाखवायला पाहिजे. अन्यथा, या दुहेरीपणात कोणतीही उदात्तता, गुणवत्ता नाही; आपली नबळता लपविण्याकरिता घातलेला हा दुटप्पीपणाचा डाव आहे असे म्हणावे लागेल.


 स्वतंत्रतेच होतो तोच न्याय
 के. आर. नारायणन् यांनी स्वातंत्र्य आणि न्याय यांच्या समन्वयाची भाषा वापरली. स्वातंत्र्य आणि न्याय यांचा समन्वय कसा काय होणार? 'स्वातंत्र्य' ही मात्रावाचक कल्पना आहे, न्याय ही गुणवाचक. त्यांची बेरीज संभव नाही, त्यांची सरासरी काढणे शक्य नाही. 'स्वातंत्र्य आणि नियोजन यांचा सुवर्णमध्य साधायचा आहे' या वाक्यात तथ्य नसले तरी त्याचा अर्थ स्पष्ट आहे; पण, स्वातंत्र्य आणि न्याय या, एका आलेखात बसणाऱ्या गोष्टीच नव्हेत. मग, नवीन गणिताप्रमाणे संचपद्धती वापरावी लागेल आणि 'अन्यायी स्वातंत्र्य' व 'गुलामीतील न्याय' अशा फूटपट्टीवर सारे मोजमाप करावे लागेल.

 समन्वय आणि संतुलन यांची भाषा वापरताना ज्यांचा समन्वय करायचा ते गुणविशेष दोन परस्परविरोधी टोकाचे आहेत असे गृहीत धरून बोलले जाते.

भारतासाठी । २४४