पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/252

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोठी तगमग होऊ लागली.

 माझ्या मनाची तगमग मी माझ्या पत्नीला समजावून सांगण्याचा अडखळता प्रयत्न केला. माझ्या त्या अडखळत्या अभिव्यक्तीनेही प्रभावित होऊन तिने मोठ्या अपूर्वाईने आणि अधीरतेने, सामाजिक कार्यकर्ती म्हणून नावाजलेल्या आपल्या बहिणीला ही गोष्ट सांगितली. तिच्या बहिणीचा प्रतिसाद सुन्न करणारा होता. ती माझ्या पत्नीला म्हणाली, "तुला कल्पना नाही ताई, शेतकऱ्यांना अशा अवस्थेत रहाण्याचे काही वाईट नाही वाटत. तुला ठाऊक आहे? अगं, त्यांना असं जगण्याची सवय झाली आहे." तिच्या या प्रतिक्रियेने मला धक्काच बसला आणि मग मला साक्षात्कार झाला की 'इंडिया' आणि 'भारत' यांच्यामध्ये भयानक आर्थिक दरी आहे एवढेच नव्हे तर त्यांच्यामध्ये भावशून्यता, उदासीनता आणि संवेदनहीनता यांची भिंतही उभी आहे. भक्षक आपल्या भक्ष्याच्या दुर्दशेबाबत पाषाणहृदयी बनले आहेत! संवेदनशीलतेच्या या अभावामुळे मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो की दोघांचा ध्वज एकच असला तरी आणि राष्ट्रगीतही एकच असले तरी 'इंडिया' आणि 'भारत' दोन वेगळे देश आहेत.

 'इंडिया-भारत' संकल्पनेच्या उत्पत्तीचे विवेचन इतक्या विस्ताराने यासाठी केले की त्यांच्यातील दरीच्या सर्व मिती स्पष्ट व्हाव्या. १९७८ पेक्षा ही दरी आता, आणखी किमान दोन मितींमध्ये रुंदावली आहे. पहिली आहे 'डिजिटल' मिती. संचारच्या क्षेत्रात घडत असलेली माहिती-तंत्रज्ञानाची क्रांती ग्रमीण क्षेत्राच्या शिवेबाहेरच ठेवली गेली आहे. आणि दुसरी मिती आहे तंत्रज्ञानाची. तंत्रज्ञान, विशेषतः जैविक तंत्रज्ञान कृषिक्षेत्रापर्यंत पोहोचू नये यासाठी सरकार जाणूनबुजून प्रयत्न करीत आहे; शहरी क्षेत्राला मात्र तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी पूर्ण मुभा आहे.

 'इंडिया' आणि 'भारत' यांमधील दरी कमी करण्यासाठी नेमके काय करण्याचा इरादा आहे हे पंतप्रधानांनी स्पष्ट केलेले नाही. अंदाजपत्रकाचा दिवस वेगाने जवळ येत आहे आणि केळकर समितीच्या करविषयक सुधारणांच्या प्रस्तावांवरील चर्चेत, शेतीक्षेत्रावर आयकर बसविण्याची सूचना गंभीरपणे करण्यात येत आहे. शेतीक्षेत्राला आयकर लागू करून 'भारता'ला 'इंडिया'च्या बरोबरीला आणण्याचा विचार पंतप्रधान करीत असावेत असे सुचविण्याचा प्रयत्नसुद्धा मूर्खपणाचा आणि अनुचित ठरेल. तो हास्यास्पदही ठरेल. कारण, आयकर भरण्याची प्रतिष्ठा आणि संधी मिळण्याची आणि तो ज्यावर भरायचा अशा करपात्र उत्पन्नाची हिंदुस्थानचे स्वाभिमानी शेतकरी कित्येक वर्षे वाट पाहात आहेत.

भारतासाठी । २५२