पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/258

हे पान प्रमाणित केलेले आहे.

भाकरीची चिंता, बायकापोरांचे आजारपाणी, डॉक्टर-वाण्यांची थकलेली बिले अशा, एरव्ही जखडून टाकणाऱ्या साऱ्या चिंता, क्षणार्धात निष्प्रभ होऊन जातात. उंच डोंगर चढून गेल्यावर पायथ्याशी असलेली घरे, जनावरे निरर्थक वाटू लागावी तसे काहीसे मनुष्यदेहात प्रकट झालेल्या विश्वतेजाच्या कणाच्या आसमंतात होऊन जाते.

 साधीसुधी माणसे सारा प्रपंच निरर्थक मानून सोडायला तयार होतात, तुरुंगात जायला तयार होतात, लाठ्यांसमोरही अगदीच भागूबाई बनत नाहीत. आसपास प्रत्यक्ष मृत्यु दिसला तरी त्यामुळे घाबरून जात नाहीत; उलट, अधिक निश्चयाने वाटचाल करत राहण्याच्या गोष्टी बोलतात. हा एक चमत्कार! आपल्या जीवाची पर्वा न करता सेनापती, घोड्याला टाच मारून, पुढे झाला की काही काळापुरतेतरी सेनापतीचे रक्तामांसाचे शरीरच आंदोलक जनसमुदायाच्या विकीर्ण शरीराचा आत्मा बनतो आणि काय वाटेल तो त्याग, सहन करायला आंदोलक तयार होऊन जातात.

 ध्येयासाठी हौतात्म्याचे मरण पत्करणे हे सोपे असते; पण, मनामध्ये जे दिव्य भव्य, जे उन्नत आणि उदात्त मानले त्यासाठी दुसऱ्याला इजा करण्याची वा प्रसंगी त्याचा जीव घेण्याची तयारी सर्वसामान्य धोपटमार्गी माणसाच्या मनाची होत नाही.

 सशस्त्र आणि निःशस्त्रांतील लढाई

 आंदोलनाच्या रसायनातील हा एक नवा गूढ प्रश्न उद्भवला. नाशिकच्या १९८० सालच्या ऊस कांदा आंदोलनात मंगरूळपीर फाट्यावर एसआरपी च्या जवानांनी शेतकऱ्यांना लाठीने बडवबडव बडवले. चांदवडच्या टेकड्यांच्या चढामुळे चढता येत नाही, अशा परिस्थितीतील शेतकऱ्यांना, चारपाच लांडग्यांनी मिळून एखाद्या शेळीला गाठावे तसे चारचार पाचपाच जवानांनी एका एका शेतकऱ्याला घेरले, गाठले, पाडले. प्रशिक्षणाच्या काळात शिपायांना निर्जीव चामडी पोत्यांना बडवण्याचा सराव देतात. ज्याला मारतो आहोत त्याला काही संवेदना आहेत, वेदना आहेत याची आठवणसुद्धा होऊ नये याचे शिक्षण स्वतंत्र भारताच्या शिपायांना स्वतंत्र भारताच्या नागरिकांना तुडवण्यासाठी दिले जाते. नाशिकच्या आंदोलनात आदलेच दिवशी खेरवाडी रेल्वे स्टेशनजवळ आंदोलनाच्या दंगलीत एका एसआरपी जवानाचा मृत्यु झाला होता. त्यामुळे, जवानांच्या लाठ्यांना काही असुरी जोर चढला होता. शेतकऱ्यांनी बेदम मार खाल्ला.

 मी तेथे जाऊन पोचलो तेव्हा मार खाल्लेल्या शेतकरी तरुणांची श्वासांची

भारतासाठी । २५८