पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/264

हे पान प्रमाणित केलेले आहे.

एरव्हीही खून, मारामाऱ्या, दगडफेकी, लुटालुटी असे प्रसंग हरहमेश नाही, तरी वारंवार येतात ती माणसे आंदोलनाच्या किंवा क्रांतीच्या काळात त्यांच्या स्वधर्माप्रमाणे वागतात आणि उद्रेकाच्या त्या काळात त्याला क्रांतीकारी बेशिस्त म्हणतात.

 धोपटमार्गी नेतृत्वगुणात काही ईश्वरी अंश असल्याची जाणीव झाली तर व्यवहारी माणसे प्रापंचिक चिंता दूर टाकून मरायला तयार होतात. अभिमानस्थळांसाठी धोपटमार्गीही मरायला तयार होतात, मारायलाही तयार होतात; पण, प्रचंड सामर्थ्याच्या विरोधकांशी पराक्रम न दाखवता चुटपूट कमजोरांना दादागिरी दाखवण्यापर्यंतच त्यांची वीरश्री टिकते.

  'टोळी' वृत्ती

 नेहरूवादी समाजवादाचा पाडाव झाला, आर्थिक पुरुषार्थाने सन्मान व स्वाभिमान मिळण्याची आशा दुरावली. कोणी एक नेता किंवा पक्ष साऱ्या देशाला मोठे करील ही आशा संपली. सारे लोक सैरावैरा जीवाच्या धास्तीने धावू लागले. जो कोणी पोटाला लावील त्यालाच नेता म्हणू लागले. अशा परिस्थितीत इतिहासकालातील अभिमानस्थळे उकरून काढून रामाच्या वा शिवाजीच्या नावाने पक्ष आणि सेना उभ्या राहू लागल्या. गतेतिहासात आमच्यावर अन्याय झाला त्याची भरपाई म्हणून मंडलवादही पुढे आला. समाजवाद हरला आणि पुरुषार्थी उद्योजकतावाद पुढे येण्याऐवजी इतिहासातील भुते नाचवणारे मंदीवादी, मंडलवादी सारा देश ताब्यात घेत आहेत.

 हिंदुत्ववाद्यांचे चढउतार

 'हिंदू हा सर्वसाधारण प्रकृतीने मवाळ असतो, त्याची स्वभावधारणा अतिरेकी जहाल क्रूरतेची नाही. मुसलमानांशी सामना करायचा असेल तर हिंदुंनी संघटित बनले पाहिजे, हिंदुत्वाचा गर्व बाळगला पाहिजे; भल्याबुऱ्या सर्व मार्गाने, हा आमचा देश आहे.येथे आमच्या मर्जीप्रमाणेच चालले पाहिजे. असे हिंदवेतरांना जाणवत ठेवले पाहिजे', ही महत्त्वाकांक्षा महात्मा गांधींनी खिलाफत चळवळ सुरू केल्यानंतर सर्व देशात हळूहळू मूळ धरू लागली. इंग्रज असेपर्यंत हिंदुत्ववाद्यांनी काही पराक्रम गाजवल्याचे दिसत नाही. उलट, राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ व समाजसुधारक चळवळ या दोघांनाही विरोध करत ही विषवल्ली ब्रिटीश सरकारच्या आश्रयाने फोफावली. महात्मा गांधींच्या हत्येनंतर यांचा जवळजवळ सफायाच झाला; पण, समाजवादाचा जसजसा पाडाव झाला तसतसे हिंदुत्व भावना चेतवण्यात मंदिरवादी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना

भारतासाठी । २६४