पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/275

हे पान प्रमाणित केलेले आहे.





बळिराज्य – विदर्भ


 विदर्भाचा कोंडमारा फार जुना आहे. छत्तीस वर्षांपूर्वी मुक्तीच्या आशेने विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला. मोठी भूल झाली. विदर्भाच्या आजच्या स्थितीने जीव गुदमरतो म्हणून विदर्भजनांपुढे आमचे हे निवेदन आणि आवाहन.

 आमच्यात कोणी पुढारी नाही. विविध क्षेत्रात सचोटीने कष्टाने काही करून दाखवलेली आम्ही सामान्य माणसे आहोत. आम्हाला कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. पदांची अभिलाषा नाही.

 छत्तीस वर्षांपूर्वी राज्य पुनर्रचनेच्यावेळी अनेकांच्या राजकीय सोयीसाठी विदर्भाला महाराष्ट्रात ढकलण्यात आले. यात सोय होती, मनोमीलन नव्हते. कागदोपत्री अटीतटी घालाव्या लागल्या यावरूनच हे स्पष्ट आहे. या अटी कागदावरच राहिल्या हे खरे, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट ही की, नागपूर करारातील सर्व अटी कसोशीने अंमलात आल्या असत्या तरी विदर्भाची दैना कमी झाली नसती. कदाचित काहींना नोकऱ्या मिळाल्या असत्या, काहींना अधिकार. साखर सम्राटाच्या तोलामोलाचे सूतसम्राटही तयार झाले असते कदाचित, पण विदर्भाचे दुःख काही कमी झाले नसते.

 राज्य पुनर्रचनेच्या वेळी सर्व वातावरण समाजवादाच्या स्वागताचे होते. समाजवादाने देशाच्या विकासाचे, वैभवाचे स्वप्न पुरे होणार आहे अशी दिशाभूल सोविएत युनियनच्या हवाल्याने विविध नेते करीत होते. सरकारी नियोजन आणि अंदाजपत्रकी तरतुदी यातून विकास साधण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना नागपूर कराराच्या कागदाच्या कपाट्यात विदर्भाचा उद्धार दिसला. असले ढिसाळ नेतृत्व सामान्य विदर्भवासीयांचे दुर्दैव ठरले.

 आता समाजवादी स्वप्नविलास कोसळला आहे. नियोजन-अर्थव्यवस्थेच्या

भारतासाठी । २७५