पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/280

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लंडनवर हिटलरच्या विमानांनी प्रचंड विध्वंसक बाँबहल्ले एकामागोमाग एक केले. प्रतिदिनी. एवढेच नव्हे तर, प्रत्येक तासादोनतासांनी विमानांचे थवेच्या थवे लंडनवर येत आणि मोठ्या प्रमाणावर बाँबचा वर्षाव करून निघून जात. लंडनवासियांनाही सवय झाली आणि त्यांनी ज्या शिस्तीने बाँबहल्ल्यांना तोंड दिले, एवढेच नव्हे तर आपले नेहमीचे दिनक्रम चालू ठेवले आणि, त्याहीपलीकडे जाऊन, युद्धासाठी लागणाऱ्या शस्त्रांच्या, दारुगोळ्यांच्या, रणगाड्यांच्या कारखान्यांची चाके फिरत ठेवली त्याचे जगभर कौतुक झाले.

 मुंबईकरांनीही लंडनवासियांना शोभेल अशाच तऱ्हेची वर्तणूक दाखवली. बाँबस्फोट झाल्यानंतर २४ तासांच्या आत मुंबईच्या उपनगरी लोकल गाड्यांची वाहतूक सुरू झाली आणि बहुतांश मुंबईकर हा आपापल्या कामाला तत्परतेने लागला.

 हिंदुस्थानभर, मुंबईवासीयांच्या या शिस्तबद्धतेची मोठी वाहवा झाली.

 प्रत्यक्ष बाँबस्फोटांच्या वेळी प्रचंड धैर्य दाखवणारा मुंबईकर नंतरच्या काळात मात्र पुष्कळ बावरलेला दिसला. जागोजागी बाँबस्फोटाच्या अफवा उडाल्या आणि त्या अफवांनी मुंबईकरांची त्रेधा उडून गेली.

 मुंबईकरांनी बाँबस्फोटांनंतर लगेच काम चालू ठेवण्यात जी शिस्त आणि धैर्य दाखवले ती शिस्त धैर्य हा पौरुषाचा प्रकार आहे का अगतिकतेचा परिणाम आहे?

 लहानपणापासून आम्हाला मुलांना सारी तरुण मंडळी, शिक्षक, आईबापे नेहमी मुंग्या आणि मधमाश्यांच्या उद्योगीपणाचे कौतुक सांगत असत. त्याच्या कितीतरी कथा पंचतंत्रापासून इसापनीतीपर्यंत विखुरलेल्या आहेत. हे छोटे प्राणी उद्योग करतात, श्रमाने पावसाळ्यासाठी बेगमी करतात म्हणून ते जगू शकतात आणि उनाड टोळ कष्ट न करता बागडल्यामुळे त्याला पावसाळ्याच्या दिवसात उपाशीतापाशी मरावे लागते.

 अन्नधान्याचे कण गोळा करण्याकरिता रांगेने धावणाऱ्या मुंग्या आणि फुलाफुलांमध्ये जाऊन मधाचे आणि परागांचे कणकण गोळा करून मधाचे पोळे तयार करणाऱ्या मधमाशा या सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय राहिल्या आहेत.

 लहानपणी खोडसाळपणे आम्ही या मुंग्यांच्या रांगांशी खेळत असू. रांगेने चालणाऱ्या मुंग्यांच्या त्या रांगेत एखादा पाण्याचा थेंब किंवा एखादा लहानसा खडा टाकला तर क्षणभरच, ज्यांच्याजवळ खडा पडला असेल किंवा पाण्याचा

भारतासाठी । २८०