पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/287

हे पान प्रमाणित केलेले आहे.

कट आणि खुद्द अमेरिकन सरकारने १५ ऑगस्टच्या आसपास दिल्ली आणि मुंबई येथे घातपात होण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवल्यामुळे देशाच्या या ६०व्या स्वातंत्र्यदिनी सगळीकडे कडेकोट बंदोबस्त होता. 'आम लोकां'पैकी फारच थोडे दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला गेले. शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणे, तेथे गाणी म्हणणे असा हा मोठा नवनवलोत्सवाचा कार्यक्रम; या कार्यक्रमात जाण्याचा त्यांना उत्साहही होता आणि त्यांना तेथवर आणण्यासाठी खास बंदोबस्तही ठेवण्यात आला होता; पण दिल्ली म्हणजे, त्या दिवशी, लष्करी छावणी बनली होती. दिल्लीतील जवळजवळ सगळे महत्त्वाचे रस्ते बंद केले होते. सुदैवाने, लाल किल्ल्याचा पंतप्रधानांच्या भाषणाचा कार्यक्रम सुरळीतपणे, कोणतेही व्यवधान न येता पार पडला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात विदर्भाच्या शेतकऱ्यांचा उल्लेख केला आणि शेतकऱ्यांसाठी डोळ्यांतून काही टिपेही गाळली. मुंबईच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे शासनापुढे मोठे आव्हान असल्याचे सांगितले. या भाषणांत काय सांगितले आणि त्यात तथ्य किती हा मुद्दा वेगळा, त्यासाठी एक वेगळा लेख लिहावा लागेल.

 स्वातंत्र्याला ६० वर्षे झाल्यानंतर स्वातंत्र्यदिनाचा झेंडावंदनाचा कार्यक्रम हा पोलिसांच्या आणि लष्कराच्या कडेकोट पहाऱ्यात करावा लागतो हीच गोष्ट मोठी दुर्भाग्याची आहे.

 १९४७ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकावला त्यावेळी जनतेच्या उत्साहाला अपार उधाण आले होते. ज्याला ज्याला शक्य होते तो तो पहाटे उठून लाल किल्ल्याच्या प्रांगणात जमा झाला होता. त्याही वेळी निर्वासितांचे लोंढे दिल्लीमध्ये येत होते. वातावरण मोठे तापलेले होते; पण, आतंकवाद्यांचा विशेषतः स्फोटके बाळगणाऱ्या आत्मघाती आतंकवाद्यांचा प्रकार त्यावेळी माहीत नव्हता. त्यामुळे, असे काही घडेल अशी भीती त्यावेळी कोणाला वाटली नव्हती. खरे म्हटले तरी त्याही काळात शेजारच्या ब्रह्मदेशात पार्लमेंटमध्ये आतंकवाद्यांनी घुसून सर्व मंत्रिमंडळाला गोळ्या घालून खलास केले होते; पण, १५ ऑगस्ट १९४७ रोजी दिल्लीला लाल किल्ल्यासमोरील प्रांगणात जमलेल्यांपैकी कोणा एकाच्याही मनात शंकेची पालही चुकचुकली नाही की या ठिकाणी कोणी नतद्रष्ट येईल आणि या साऱ्या मंगल सोहळ्याला गालबोट लावणारा प्रकार करेल. आज ६० वर्षांनी असा काही अमंगल प्रकार घडला नाही म्हणजे नशीब असे म्हणण्याचे वेळ आली आहे.

भारतासाठी । २८७