पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/288

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'स्वातंत्र्य का नासले?' या पुस्तिकेत मी 'स्वातंत्र्याचे दूध नासले याला जबाबदार केवळ स्वातंत्र्योत्तर नेते आणि नियोजन कार्यक्रम नाही; तर हा दोष मुळात स्वातंत्र्याच्या चळवळीतही कोठेतरी असला पाहिजे' अशी मांडणी केली आहे. आणि या ६०व्या स्वातंत्र्यदिनी हा सिद्धांत मला अधिकच योग्य वाटत आहे. स्वातंत्र्याच्या ५० वर्षांनंतर, चर्चिलने केलेले भाकित खरे ठरले आणि स्वतंत्र भारतात भावाभावांची भांडणे होऊन रक्ताचे लोट वाहिले असे मी म्हटले होते. ६०व्या स्वातंत्र्यदिनीतर, चर्चिललासुद्धा आपण स्वतंत्र केलेल्या देशामध्ये इतकी भयानक परिस्थिती ओढवू शकेल याची कल्पना करता आली नसती इतकी भयानक परिस्थिती झाली आहे.

 १९४७ साली देशाची फाळणी झाली आणि त्या फाळणीनंतर आता पुन्हा कधी देशाची धर्माच्या आधाराने फाळणी करण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते. त्या काळी मुसलमान समाजही काहीश्या भीतीने, काहीशा समजुतदारपणे, नव्या स्वतंत्र भारतात आपले स्थान काय राहील या विवंचनेत असल्यामुळे पुन्हा पाकिस्तानसारखा स्वतंत्र देश विभाजन करून मिळावा अशी मांडणी त्यांच्यापैकी कोणाच्या मनातही आली नाही. आज परिस्थितीमात्र अगदी वेगळी आहे. आज देशामध्ये खरे राज्य इस्लामचे नाव घेणाऱ्या आतंकवाद्यांचे चालू आहे. मुंबई असो, दिल्ली असो, आयोध्या असो - आतंकवाद्यांना पाहिजे तेथे, पाहिजे त्या प्रकारे ते घातपात घडवून आणू शकतात आणि शासन असे प्रकार घडल्यानंतर गुन्हेगारांना पकडण्यासाठी काही करण्यास समर्थ आहे असे दिसत नाही.

 गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी, जिनांचासुद्धा जितका अनुनय झाला नसेल तितका अनुनय मुसलमानांतील फडतूस नेत्यांचा आजकाल होत आहे.

 १५ ऑगस्ट २००६च्या लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधानांनी शिक्षणाचा प्रसार कोणकोणत्या समाजात व्हायला पाहिजे याचा उल्लेख करताना अनुसूचित जाती आणि जमातींबरोबर अल्पसंख्याक जमातींचाही उल्लेख केला. शिक्षणाचा प्रसार अल्पसंख्याक जमातीत करायचा आहे म्हणजे कोणत्या जमातीत करायचा आहे? पारशी समाजात शिक्षणाची काही वेगळी व्यवस्था करण्याची गरज नाही. शीख समाजही शिक्षणात हिंदू समाजापेक्षाही प्रगत आहे. हीच परिस्थिती जैनांची. अल्पसंख्याकांतील उरता उरले ते फक्त मुसलमान; पण, मुसलमानांमध्ये शिक्षणाचा प्रसार करायला पाहिजे एवढेसुद्धा वाक्य उच्चारणे पंतप्रधानांना धोक्याचे वाटले आणि त्यांनी फक्त त्यांचा उल्लेख अल्पसंख्याक असा केला.

 पूर्वीच्या काळी जुन्या वळणाच्या बायका नवऱ्याचे नाव घेण्याचे टाळण्यासाठी,

भारतासाठी । २८८