पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/300

हे पान प्रमाणित केलेले आहे.

केली आणि ते विस्थापितांच्या वगैरे लढ्याचे नेतृत्व करू लागले.

 मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करण्याचा निर्णय झाल्यावर दिल्लीत विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचे आंदोलन सुरू केले. भारतीय जनता पक्षाने सरकारचा पाठिंबा काढून घेतला. विश्वनाथ प्रताप सिंहांचे सरकार कोसळले. त्यानंतर तीन चार वर्षे, दिल्लीच्या बादशाहीच्या अखेरच्या काळात जशी तख्तासीनांची रांग लागली त्याचीच पुनरावृत्ती दिल्लीत झाली.

 चंद्रशेखर जुने समाजवादी, निष्कलंक चारित्र्याचे म्हणून गाजलेले. जनतादलाचे पंतप्रधान होण्याची त्यांची इच्छा होती; पण, चौधरी देवीलालांच्या चलाखीमुळे ती फसली होती. आता ती संधी पुन्हा चालून आली, गावगन्ना समाजवाद्यांना कधी स्वप्नात वाटले नव्हते अशी संधी आली. जिल्ह्याचे पुढारीसुद्धा दिल्लीत मंत्री आणि राज्यमंत्री बनले. जणू काही नवा इतिहास घडतो आहे हे दाखवण्याकरिता आणि आपला जनाधार सिद्ध करण्याकरिता आपला शपथविधी लोकसभेच्या केन्द्रीय सदनात न घेता खुल्या पटांगणात विजय चौकात घेतला. काँग्रेसच्या आधारावर चालणारे हे राज्य सोनिया गांधीच्या एका क्रोधकटाक्षाने कोसळले; पण, जे काही दिवस मिळाले तेवढ्यात चन्द्रशेखर यांच्या सरकारने राष्ट्रीय कृषिनिती तयार करण्याकरिता पूर्वीच्या सरकारने नेमलेली स्थायी समिती बरखास्त करून टाकली आणि गव्हाची प्रचंड प्रमाणावर आयात करण्याची तयारी सुरू केली. प्रत्यक्ष आयात पंतप्रधान गुजराल यांच्या काळात कॉम्रेड चतुरानन मिश्रा यांनी राबवली. याविरूद्ध शेतकऱ्यांचे प्रचंड आंदोलन उभे राहिले. वाघा सरहद्दीपर्यंत शेतकरी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढून गेले. शेवटी, आयात केलेल्या गव्हात अत्यंत घातक तणांची बियाणी होती हे सिद्ध झाले, एवढेच नव्हे तर पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या सुपुत्रांचा दलालीचा हिस्सा होता हे स्पष्ट झाले.

 गुजराल पडले आणि त्यांच्या जागी देवेगौडा आले. स्वतःला किसानपुत्र म्हणवन घेणाऱ्या देवेगौडांनी त्यांच्या अल्पावधीच्या राजवटीत भर सभेत लोकांदेखत पेंगण्याकरिता प्रसिद्धी मिळवली. शेतकऱ्यांकरिता काहीही आशादायक घडले नाही.

 पाच वर्षांत चार पंतप्रधान बदलले. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशी परिस्थिती तयार झालेली. आंतरराष्ट्रीय व्यापारातील घट वाढत राहिली आणि दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी रिझर्व बँकेकडील सोने गहाण ठेवण्याची वेळ आली. कामगारांचा, शेतकऱ्यांचा असंतोष भडकतच होता. हेही सरकार काँग्रेसच्या क्रोधकटाक्षानेच पडले आणि नव्या निवडणुका जाहिर झाल्या. देशाच्या

भारतासाठी । ३००