पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/304

हे पान प्रमाणित केलेले आहे.

फेब्रुवारी महिन्यात सेवाग्राम येथे गांधीपरंपरेतील प्रमुख विचारवंतांची बैठक होणार होती आणि त्या बैठकीत नेहरू सरकारच्या धोरणाविषयी सखोल अवलोकन करायचे ठरले होते; पण, तसे घडायचे नव्हते. जानेवारीच्या शेवटासच गांधीजींची हत्या झाली.

 महात्मा गांधी कुशल सेनापती होते तसेच मोठे भाग्यवानही होते. १९३० सालचे आंदोलन फसले, यापुढे सत्याग्रहाचे आंदोलन प्रभावी ठरण्याची शक्यता नाही या जाणिवेने महात्मा गांधी आणि त्यांचे अनुयायी विधायक कार्यक्रमांकडे वळले होते. १९३५ साली इंग्रज शासनाने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट प्रसृत केला आणि त्यानंतर चारच वर्षांनी दुसऱ्या महायुद्धाच्या ज्वाला भडकल्या आणि महायुद्ध संपल्यानंतर स्वातंत्र्याचे ताट समोर वाढून आले; एवढेच नव्हे तर त्याचे सारे श्रेय 'राष्ट्रपिता' अश्या बिरुदावलीने महात्मा गांधींच्या पदरात पडले. स्वातंत्र्य आले त्याबरोबर फाळणीही आली; त्याबरोबर प्रचंड कत्तली, बलात्कार, जाळपोळ, निर्वासितांचे लोटही आले. हिंदुमुसलमानांच्या ऐक्याची ध्वजा फडकावणाऱ्या गांधीजींच्या नशिबी त्यांच्या विचाराचा दारूण पराभव आला. हिंदू समाजातील अन्यायकारक जातिव्यवस्था संपविण्याकरिता त्यांनी दहा वर्षांत अस्पृश्यता संपविण्याची घोषणा केली होती; पण, त्यांच्या विषयी हरिजनांच्या मनात कधीही आपुलकीची भावना उपजली नाही. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' अशी घोषणा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरच हरिजनांचे तारणहार दैवत म्हणून मान्यता पावले. आज तर, दलितांना 'हरिजन' या शब्दाचीही शिसारी आहे.

 गांधीजींच्या अर्थकारणात गाव, शेती, ग्रामोद्योग यांना सर्वांत महत्त्वाचे स्थान होते. आर्थिक विकास घडवता घडवता अंत्योदयही साधण्याची त्यांची रणनीती होती. नेहरूंच्या इंग्रजाळलेल्या बुद्धीस हे पटणारे नव्हते. मग, गांधी गेले आणि नेहरूंना रान मोकळे झाले. गांधीजींचा शेती, गाव आणि ग्रामोद्योग यांच्यावर आधारलेला अर्थविचार त्यांनी दूर केला. आचार्य नरेंद्र देव, लोहिया इत्यादी भारतीय समाजवाद्यांचा 'कसेल त्याची जमीन आणि श्रमेल त्याची गिरणी' हा विचारही त्यांनी अव्हेरला आणि, दुसऱ्या महायुद्धानंतर महासत्ता म्हणून उजेडात आलेल्या आणि हिटलरच्या पराभवात सर्वांत मोठी कामगिरी बजावणाऱ्या समाजवादी रशियाचा अर्थविचार त्यांना भावला. पाकिस्तान वेगळे झाल्यामुळे आता त्यांना लियाकत अली किंवा जिना यांना बरोबर घेऊन चालण्याची आवश्यकता राहिली नव्हती. आपला हेतू कधीही स्पष्ट न करता, या विषयावर व्यापक चर्चा

भारतासाठी । ३०४