पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/306

हे पान प्रमाणित केलेले आहे.

रस्ते नाहीत, रेल्वेला ना नियमितपणा ना सुरक्षा, समुद्रावरील बंदरांची स्थिती निर्यातीला नाउमेद करणारी; दूरभाष व्यवस्था सरकारी नियंत्रणाखाली आणि त्यामुळे निकामी. फोन मिळणे अवघड, मिळाले तर चालू असणे कठीण, चालू असले तर योग्य नंबर मिळणे अशक्य, मिळाल्यास त्यासाठी तास न तास प्रतीक्षा करावी लागे अशी स्थिती. संरचना क्षेत्राकरिता आग्रहाने तरफदारी करणारे कारखानदार, निर्यातदार प्रभावहीन असल्यामुळे अशी परिस्थिती तयार झाली. समाजवादी व्यवस्थेत हे अपरिहार्य असते. समाजवादी सोव्हिएत रशियाचा पाडाव झाल्यानंतर रशिया आर्थिक महासत्ता असल्याचा बुडबुडा फुटला. तेथील तेलवाहतुकीसाठी बांधलेले नळ रशियातील थंडीत आता टिकू शकत नाहीत असे दिसून आले. रशियाच्या विलयानंतर तेथील मोठे मोठे निवृत्त सेनापतीदेखील पावाच्या रांगेत उभे राहू लागले किंवा भीक मागू लागले. आणि इकडे, रशियाचा आदर्श पाळणारा सारा हिंदुस्थान देशच दिवाळखोर बनून खानदानी सोने गहाण टाकण्याच्या कडेवर येऊन पोहोचला.

 इतक्या गंभीर परिस्थितीत पंजाबची आघाडी एका हाताने सांभाळत नरसिंह राव यांचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारांचे रणशिंग पहिल्याच अंदाजपत्रकात फुंकले. नवी कारखानदारी उभी करण्यासाठी किंवा कारखान्यांची क्षमता वाढविण्यासाठी कारखानदारांना लाल फितीच्या ज्या चक्रव्यूहातून जावे लागे त्याच्या काटछाटीने आर्थिक सुधारांना सुरुवात झाली. देशी कारखानदारीतील परकीय भांडवलाच्या हिश्शासंबंधीची बंधने ढिली करण्यात आली. एवढेच नव्हे तर, समाजवादाच्या काळात सुरू झालेले सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, कार्यक्षमता वाढविण्यासाठी, खासगी क्षेत्राकडे सुपुर्द करण्याचीही सुरुवात झाली.

 परिणाम तातडीने दिसून आले. आर्थिक सुधारांना सुरुवात झाल्यानंतर, तीनच महिन्यांच्या आत, देशाबाहेर गेलेले सोने परत आले आणि भांडवलाचा व परकीय चलनाचा प्रवाह देशात येऊ लागला. हे सर्वच अर्थकारण, समाजवादात पिंड पोसल्या गेलेल्या जनतेला समजण्यासारखे नव्हते; पण, उद्योजकांनामात्र अधिक विस्तृत आर्थिक सुधारांची चाहूल लागली आणि त्यांच्यात उत्साह संचारला. भारताची बुद्धिमत्ता समाजवादाच्या काळात कुजत होती, तिचे श्वास मोकळे होऊ लागले. जुन्या काळात साडेतीन टक्क्यांच्या वर राष्ट्रीय उत्पन्नाची वाढ कधी झाली नव्हती; पण १९९१ नंतर वाढीचा दर हळूहळू ४,५,६ करीत आता ८ टक्क्यांच्या पुढे जाऊन स्थिर झाला आहे याचे श्रेय नरसिंह राव यांनी उद्योजकांच्या पाठीवर जी थाप मारली तिला आहे.

भारतासाठी । ३०६