पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/314

हे पान प्रमाणित केलेले आहे.


मुर्दाडांचा देश, कचखाऊ शासन, बुळी प्रजा


 बिजिंगच्या ऑलिंपिक खेळांत अखेर भारताचे घोडे गंगेत न्हाले. एका बिंद्राला एका विशिष्ट प्रकारच्या नेमबाजीच्या स्पर्धेत अखेर सुवर्णपदक मिळाले. हा खेळ काही जलतरणासारखा लक्ष वेधून घेणारा नाही. नेमबाजी अचूक लागण्यात काही नशिबाचा आणि योगायोगाचाही भाग असू शकतो; पण, आधुनिक ऑलिंपिकच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय खेळाडू सुवर्णपदक विजेता झाला. साहजिकच, आनंदीआनंद जाहला. वेगवेगळ्या राज्यांनी बिंद्रावर पैशाचा आणि देणग्यांचा वर्षाव केला. दोन दिवस भारतातील सगळ्या वर्तमानपत्रांत पहिल्या पानावर हे कौतुक झळकले.

 योगायोगाची गोष्ट अशी की, या स्पर्धेत १९७२ च्या म्युनिच येथील स्पर्धेतील अमेरिकन तरुणपटु मार्क स्पिट्झचा सात सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम तोडण्याकरिता अहमहमिका चालू होती. अमेरिकच्याच २३ वर्षीय मायकेल फेल्प्सने ७ नवीन उच्चांक प्रस्थापित करीत या स्पर्धेत ८ सुवर्णपदके जिंकून हा विक्रम मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याने गेल्या अथेन्सच्या स्पर्धेत ६ सुवर्णपदके व २ कांस्यपदकांची कमाई केली होती. त्यामुळे त्याची सुवर्णपदकांची एकूण संख्या १४ झाली आहे.

 अगदी किरकोळ छोट्याशा देशातही सुवर्णपदक विजेते अनेक आहे. एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या भारत देशात एक सुवर्णपदक मिळवण्याचे एवढे अप्रूप का असावे?

 बिंद्रावरील पारितोषकांच्या वर्षावामुळे कदाचित, यापुढील खेळात आणखी एखादे सुवर्णपदक जिंकणाराही भारतीय निघण्याची शक्यता आहे. क्रिकेट खेळामध्ये पैसा खेळू लागला तशी काही खेळाडूंच्या कामगिरीत चांगल्यापैकी सुधारणा दिसून आली त्याचप्रमाणे.

भारतासाठी । ३१४