पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/32

हे पान प्रमाणित केलेले आहे.

परंपरा पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे.

 सर्व विनम्रता बाळगून असे आग्रहाने म्हटले पाहिजे की भारतीय इतिहासाचा हा ब्राह्मणी किंवा सवर्ण अर्थ आहे. मुसलमानी आक्रमणाच्या आधीही अनेक आक्रमणांच्या लाटा वेगवेगळ्या दिशांनी आल्या आहेत. अगदी रामायणकाळापासूनसुद्धा वेगवेगळे राजे परस्परांत सतत लढाया करीत असत, लूट करीत असत. एवढेच नव्हे तर बलात्कारही करीत असत. बौद्ध-ब्राह्मण संघर्षात व हिंदू राजा-राजांतील लढायांतही हे सर्व प्रकार घडले. अगदी मंदिरांचासुद्धा विद्ध्वंस झाला; पण या लढाया म्हणजे काही खराखुरा इतिहास नव्हे. खरा इतिहास या कागदोपत्री नोंदल्या गेलेल्या सनावळींच्या पलीकडे आहे. समाजातील सर्व उत्पादनाचे काम जातिव्यवस्थेच्या आधाराने बहुसंख्य समाजावर लादले गेले. राज्यव्यवस्था आणि राजा-राजांतील लढाया या कष्टकरी शेतकरी, बलुतेदार, व्यापारउदीम करणारे यांच्या श्रमाचे फळ हिरावून नेण्याच्या दृष्टीनेच होत असत. बहुसंख्य समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, मंदिरात जाण्यास बंदी होती, धर्मग्रंथ पाहण्याचीही मनाई होती; इतर समाजाशी रोटीचाही संबंध नाही मग बेटीचा दूरच. आयुष्यभर गुलामासारखे राबणे एवढेच त्यांचे भविष्य आणि ही फलनिष्पत्ती त्यांच्या पूर्वजन्मी केलेल्या पापांमुळे ही धर्माची शिकवण!

 ज्याला आज हिंदू धर्म म्हटले जाते त्याला दक्षिणपूर्वेतील कंबोडिया, थायलंड यांसारख्या देशांत सरळसरळ ब्राह्मणधर्मच म्हटले जाते. तेथील इतिहासात वर्णने आहेत ती बौद्ध विरुद्ध ब्राह्मण लढायांची. तेथील देवळांमध्ये शंकराच्या मूर्तिऐवजी बुद्धाच्या मूर्ती आणि बुद्धाच्या मूर्तीऐवजी शंकराच्या मूर्ती असे आळीपाळीने कित्येकवेळा घडले आहे. आपल्याकडेही त्याचे नावच वर्णाश्रमधर्म असे आहे. पुनर्जन्म आणि कर्मसिद्धान्त यांच्या आधाराने तयार करण्यात आलेली ही समाजव्यवस्था होती.

 मुसलमान येण्यापूर्वी सर्वजण गुण्यागोविंदाने, सुखासमाधानाने नांदत होते असे नाही. बहुजन समाज अन्याय आणि शोषणाखाली भरडून निघत होता. परिस्थिती इतकी दुःसह होती की, मुसलमान आक्रमकांनी येऊन स्थानिक राजांचा उच्छेद केला तरीही, बहुजन एतद्देशीय आणि तथाकथित स्वधर्मी राजांच्या मदतीस धावून गेले नाहीत. किंबहुना, त्यांनी, ज्योतिबा फुल्यांच्या शब्दांत, 'महंमदाच्या जवांमर्द शिष्यांचे विमोचक म्हणून स्वागत केले. हे असे नसते तर अल्पसंख्य मुसलमान आक्रमकाना इतक्या सहजपणे आसेतुहिमाचल देश पादाक्रांत करताही आला नसता व त्यावरील सत्ता इतक्या दीर्घकाळ टिकवून

भारतासाठी । ३२