पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/321

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 हल्ला मुंबईवर झाला. सगळ्या देशावर भयानक घातक परिणाम घडवून आणण्याची आतंकवाद्यांची इच्छा असती तर त्यांनी समुद्रमार्गाने तुर्भे आणि तारापूर येथे हल्ला केला असता, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल टर्मिनस ताब्यात ठेवले असते. तुर्भे तारापूर उद्ध्वस्त करून आणि दोन रेल्वे स्थानकांचा ताबा मिळवून त्यांना देशाच्या आर्थिक आणि राजकीय ताकदीवर अधिक गंभीर परिणाम घडवून आणता आले असते. त्यांच्या हल्ल्यांचा मुख्य रोख दोन पंचतारांकित हॉटेलांवर होता. या हॉटेलात काही भारतीय अतिविशिष्ट व्यक्ती उतरतात; याही वेळी एनडीडीबीच्या अमृता पटेल आणि खासदार गायकवाड तेथे उतरलेले होते; पण नेहमीच्या तुलनेत परदेशी प्रवाशांचा हंगाम असूनही त्यांची संख्या त्या मानाने कमी होती. हल्लेखोरांना याचा अंदाज नव्हता असे कसे म्हणावे?

 उपलब्ध माहितीनुसार, हल्लेखोरांचे साथीदार बराच काळ आधी या हॉटेलात पाहुणे म्हणून उतरले होते, काहीनी तर हॉटेलांच्या नोकरवर्गात दाखल होऊन तेथील खडान् खडा माहिती हस्तगत केली होती.

 हल्लेखोर सर्व सामुग्री पाठीवरच्या आणि हातातल्या पिशव्यांत भरून घेऊन आले होते. तेवढ्या सामुग्रीवर त्यांना ६० तास झुंज देता आली नसती. त्या अर्थी २६ नोव्हेंबरच्या आधीपासूनच नरीमन हाऊस, ताज महाल आणि ओबेरॉय हॉटेल येथे त्यांनी दारूगोळ्याचा साठा जमा करून ठेवला असावा हे उघड आहे. कुलाब्यातील लिओपोल्ड हॉटेलमध्ये किंवा त्याच्या आसपास त्यांचे दारूगोळ्याचे भांडार असावे, अन्यथा सगळी ठिकाणे सोडून या हॉटेलवरच हल्ला करण्याचे आतंकवाद्यांना काही कारण होते असे दिसत नाही.

 आतंकवादी भारताविरुद्ध काही मोठे कारस्थान रचीत आहेत, त्यांचा रोख मुंबईवर दिसतो, एवढेच नव्हे तर हल्ला ताज महाल आणि ओबेरॉय या हॉटेलांवर होणार आहे अशी माहिती सर्व संबंधित अधिकारी आणि सुरक्षा दले यांना मिळाली होती हे आता उघड झाले आहे. ते समुद्रमार्गाने येणार आहेत याचीही खबर होती. समुद्रमार्गाच्या प्रवासात बांगलादेशी खलाश्यांची मोठी कामगिरी राहणार आहे. या समाजाची दाट वस्ती मुंबईच्या साऱ्या समुद्रकिनाऱ्याने झाली आहे, हे सगळे माहीत असताना मुंबई इतकी बेसावध कशी पकडली गेली? संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी औरंगजेबाच्या लष्करी तळावर हल्ला करून औरंगजेबाच्या तंबूचे सोनेरी कळस काढून आणले एवढा एकच समांतर प्रसंग इतिहासात दिसून येतो.

भारतासाठी । ३२१