पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/324

हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुरवस्था माजली आहे.

 'दर डोई एकमत' या पद्धतीच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी निम्म्या मतदारांचाही पाठिंबा असण्याची आवश्यकता नाही. दोनचार अल्पसंख्याक जमातींची एकगठ्ठा मते मिळविण्याची व्यवस्था करता आली. त्या जमातींच्या वस्तीतील दादांना विकत घेण्याइतका पैसा भ्रष्टाचार, काळाबाजार, अगदी खूनदरोडेसुद्धा अशा मार्गाने मिळवला की वर्षानुवर्षे पुढारी निवडून येतात आणि सरकारचे मूळ काम सोडून बाकी सगळ्या कामात लुडबुड करतात. अलीकडे कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणाही भक्कम भ्रष्टाचारी बनली आहे. खात्यांतील नेमणुकांपासून ते गुन्हेगारांच्या सोडवणुकीपर्यंत काळा पैसा कमावता येतो; पण, बांधकामाची कंत्राटे, कारखानदारीचे व आयात-निर्यातीचे परवाने इत्यादींत होणाऱ्या मिळकतीच्या तुलनेने हे उत्पन्न किरकोळ असते.

 इंग्रजांनी आपले राज्य स्थापन केल्याबरोबर पहिले काम केले ते ठग आणि पेंढारी यांच्या बंदोबस्ताचे. काठीच्या टोकाला सोने बांधून बिनधास्त काशीयात्रेला जावे अशी सुव्यवस्था झाल्यानंतर इंग्रजांनी हळूहळू शाळा. इस्पितळे, रस्ते. टपाल, रेल्वे इत्यादी व्यवस्था आणावयास सुरुवात केली.

 याउलट, स्वातंत्र्यानंतर समाजवादाच्या झेंड्याखाली शासनाला घाई झाली ती उद्योगधंदे वाढवण्याची. उद्योगधंदे, व्यापार यांची लायसन्स-परमिट व्यवस्था पुढाऱ्यांना खूपच सोयीस्कर झाली. त्यातून काळाबाजारवाले, तस्कर, घरे-जमिनी खाली करून देणारे गुंडभाई यांची सर्वदूर उपज झाली आणि सर्व सुव्यवस्था ढासळली. स्वतंत्र भारताच्या शासनाने असा उलटा कार्यक्रम आखल्यामुळे आर्थिक प्रगतीही झाली नाही आणि सगळीकडे अंदाधुंदी मात्र माजली.

 अशा उलट्या सरकारी व्यवस्थेचा सैद्धांतिक शेवट १९९१ साली सध्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पुढाकारानेच झाला. अकार्यक्षम आणि तोट्यात चालणाऱ्या सरकारी संस्था आणि उपक्रम यांचे खासगीकरण किंवा निर्गुंतवणूक होऊ लागली; पण, १९९१ सालापासून आतापर्यंत अगदी आत्यंतिक उदारमतवादीसुद्धा 'शासन कायदा आणि सुव्यवस्थेच्या क्षेत्रातही अपयशी आणि अकार्यक्षम ठरले आहे, या क्षेत्रातही सर्वंकष खासगीकरण आणावे' असे मत मांडीत नाही.

 मुंबईत ५९ तास धुमाकूळ घालणाऱ्या आतंकवाद्यांनी सरकारी सुरक्षा व्यवस्थेबद्दलच एक मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मुंबईतील ५९ तासांचा इतिहास हा केवळ सरकारी व्यवस्थेच्या अजागळपणामुळे होऊ शकला हे

भारतासाठी । ३२४