पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/328

हे पान प्रमाणित केलेले आहे.





स्वतंत्रते भगवती


 इंग्लंडमधून भारतातील शेतकरी आंदोलनाच्या आणि, विशेषतः शेतकरी संघटनेच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी रिचर्ड नावाचा एक विद्यार्थी हिंदुस्थानात आला आहे. गेला महिनाभर तो मला भेटायचा प्रयत्न करतो आहे आणि योगायोग असा की निवडणुकीतील प्रचाराच्या कामामुळे त्यांची माझी भेट प्रत्येक वेळी हुकत गेली. अखेरीस त्यांची इंग्लंडला परत जाण्याची वेळ आली आणि काल शेवटी टेलिफोनवरच काही प्रश्नोत्तरे करता आली. शेतकरी आंदोलनाच्या मागची प्रेरणा ही निर्बंधस्वातंत्र्याची आहे याचा सगळा इतिहास मी रिचर्ड यांच्यापुढे मांडला. शेवटी त्यांनी एक प्रश्न विचारला, "अमेरिकेतील स्वतंत्रावादी (यूँहे) आणि तुमच्या विचारात नेमका काय फरक आहे?"

 मी जे उत्तर दिले ते निवडणुकीचे पडघम वाजत असताना फार महत्त्वाचे आहे:

 "स्वातंत्र्य हे माझ्या दृष्टीने सर्वश्रेष्ठच नाही, एकमेव जीवनमूल्य आहे. सत्य, शिव, सुंदर किंवा समता, बंधुत्व ही सारी स्वातंत्र्याचीच रूपे आहेत. विचाराची शक्ती निसर्गाने फक्त 'व्यक्ती'ला दिली आहे. कोणत्याही 'समुदाया'ला नव्हे. त्यामुळे, प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या अभिव्यक्तीच्या आड येणाऱ्या सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्था या निसर्गक्रमाच्या विरुद्ध जाणाऱ्या आहेत. त्रिकालाबाधित आणि सम्यक सत्य अगदी परमेश्वराचा अवतारसुद्धा सांगू शकत नाही. अनंत सत्याचा आविष्कार व्यक्तीव्यक्तीतील परस्पर संपर्क, सहकार्य आणि स्पर्धा यांतूनच होऊ शकतो. स्पर्धा हा स्वातंत्र्याचा आत्मा आहे. कोणत्याही देशाच्या व्यवस्थेत व्यक्तिमत्वाच्या परिपोषास जास्तीत जास्त वाव असला पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही हे खरे आहे. कोणत्याही एका देशाची सर्वंकष अधिसत्ता ही सर्व जगाच्या आणि प्रत्येक देशाच्या विकासास मारक

भारतासाठी । ३२८