पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/33

हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठेवताही आली नसती.

 अडवाणी आणि इतर हिंदुत्वनिष्ठांना मुस्लिम आक्रमणाचा प्रतिशोध घ्यायचा आहे. त्यासाठी ते आज सर्व जातीजमातीच्या हिंदूना भगव्या झेंड्याखाली आणू पाहत आहेत. अडचण ही आहे की, बहजन कष्टकऱ्यांच्या मनात इतिहासाचा आणखी एक प्रतिशोध घेण्याची एक सुप्त पण समर्थ इच्छा आहे. हिंदू हे राष्ट्र बनायचे असेल तर हिंदू व्यवस्थेतील शोषणाचे संबंध नष्ट करणे हे काम हिंदुत्ववाद्यांनी उत्साहाने हाती घेतले पाहिजे.

 भारताच्या इतिहासाला, संस्कृतीला, परंपरेला खरा धोका आहे तो इतिहासात पाडल्या गेलेल्या मंदिरांमुळे नाही. पाश्चिमात्य विचारांचे, शिक्षणाचे शहरांतील भद्र लोक आज भारताची संस्कृती उद्ध्वस्त करून इंडियाची संस्कृती लादू पाहाताहेत. हा लढा मोठा कठीण आहे, प्रतिकात्मक नाही. कोण्या एका जागी मंदिर उभारण्याने हा प्रश्न सुटणार नाही.

 अयोध्येचे राममंदिर हे एक प्रतिकात्मक आंदोलन आहे असे अडवाणी म्हणाले. हिंदुराष्ट्र एकसंध लोक म्हणून तयार करण्याच्या दृष्टीने राम हे चुकीचे प्रतीक आहे. शूद्र असूनही तपस्या करणाऱ्या शंबुकाचे शीर उडविणारा राम नव्या एकात्म राष्ट्राचे प्रतीक कसा काय होईल? अग्निदिव्यानंतरही गर्भारशी सीतेला वनवासात जावे लागले आणि बाळंतपणानंतर मूठभर गव्हासाठी अयोध्येच्या एकेकाळच्या महाराणीस भीक मागावी लागली. रामकथा ही जानकीची जीवनव्यथा आहे. त्या सीतेच्या मानसकन्यांच्या दृष्टीने राम हा एकात्म राष्ट्रांचे प्रतीक कसा काय होऊ शकेल? नवे एकात्मक राष्ट्र उभारण्याची ज्यांना खरोखर कळकळ असेल त्यांनी राममंदिराच्याही आधी शंबुकाचे मंदिर आणि सीतेचे मंदिर बांधायचा संकल्प सोडायला हवा होता.

 सर्व इतिहासात आणि अगदी प्राचीन काळीही हा देश कधी एकछत्री, एकमय लोकांचे राष्ट होते असे दिसत नाही. आजपर्यंतचा सर्व इतिहास लढायांचा. रक्तपातांचा, लुटालुटींचा, बलात्कारांचा, दुष्काळांचा, उपासमारीचा, रोगराईचा, निरक्षरतेचा राहिला आहे. राष्ट्र बनवायचे असेल तर त्याकरिता भविष्याकडे पाहावे लागेल, भूतकाळाकडे पाहून काय उपयोग? भविष्यकाळाकडे वाटचाल करण्याचा घटनेतील निधर्मवाद हा पुष्कळ त्रुटी असलेला पण सर्वांत श्रेयस्कर मार्ग आहे. तो निधर्मवाद खोटा असेल पण त्याला पर्याय दुष्ट हिंदुराष्ट्रवाद खचित होऊ शकत नाही.

(६ जुलै १९९१)

♦♦

भारतासाठी । ३३