पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/330

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 योगायोगाची गोष्ट अशी की गेले काही आठवडे मी एका बाजूला निवडणुकांसंबंधी बातम्या ऐकतो आहे आणि बरोबरीने, दोन मोठी ऐतिहासिक महत्त्वाची पुस्तके वाचतो आहे. एक पुस्तक आहे सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र 'महानायक' आणि दूसरे शहिद भगतसिंग यांचे चरित्र 'इन्कलाब'. निवडणुकांच्या या मोसमात अनुभूती आणि विचार यांच्या समानतेवर आधारलेल्या 'पक्ष' या संकल्पनेचेच विसर्जन झाले आहे. निवडणुकीतील लाभाच्या आशेने आणि हिशेबाने वेगवेगळ्या आघाड्या आणि युत्या बांधल्या जात आहेत. अनेक वर्ग आणि जाती सत्तेच्या खिरापतीत आपलाही हात असावा म्हणून असंभाव्य अशा क्षुद्रवादी मंचांची मोर्चेबंदी करीत आहेत. सगळा हिशेब आहे तो सत्तेच्या हव्यासाचा आणि राष्ट्रीय संपत्तीवर जास्तीत जास्त डल्ला मारण्याचा.

 याच शतकात सुभाषचंद्र आणि भगतसिंग यांच्यासारखी लोकोत्तर माणसे होऊन गेली आणि त्यांनी राष्ट्रभक्तीच्या भावनेने लाखलाख लोकांना आपल्या प्राणांच्या आहुत्या देण्यास तयार केले. हे चित्र खरे की ते चित्र खरे असा मनात संभ्रम तयार होतो.

 हा एवढा अधःपात झाला कसा?

 हुतात्मा भगतसिंग यांनी फाशीच्या कोठीकडे जाता जाता आपले एक स्वप्न मांडले ते इतके विद्रूप कसे झाले?

 महात्मा जोतिबा फुले यांनी देशाचे स्वातंत्र्य मिळवण्याची घाई करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला होता. "समाजाची 'गतशतकांची पापे घोरे' यांचे प्रक्षालन केल्याखेरीज इंग्रजांना हाकून लावण्याचाच धोशा लावला तर देशात पुन्हा एकदा 'पेशवाई' अवतरेल." जोतिबांना पडलेले हे दुःस्वप्न इतक्या भयानक पद्धतीने समोर येऊन कसे ठाकले?

 हरियाणाचे शेतकरी नेते सर छोटूराम यांनी गांधीजींना असाच इशारा दिला होता. "इंग्रजांनी देशात कायदा आणि सुव्यवस्था स्थापन केली आहे. विरोध करायचाच असेल तर ब्रिटिशांविरुद्ध दंड थोपटून पुढे व्हा. त्यांनी केलेल्या कायद्यांचा भंग सत्याग्रहाच्या नावाने करायची शिकवण लोकांना देऊ नका." सर छोटूराम यांचा दृष्टेपणा व्यर्थ का ठरला?

 सर विन्स्टन चर्चिल या एकाच माणसाने स्वातंत्र्योत्तर भारताचे अचूक भाकित सांगितले. "स्वातंत्र्याच्या आंदोलनातील गांधींचे सहकारी ही कचकड्याची बाहुली आहेत. यांच्यामागे काही आदर्शवाद नाही, प्रतिभा नाही, त्याग नाही. या असल्या नेत्यांच्या हाती देश गेला तर सर्वत्र बेबंदशाही माजेल, लोक एकमेकांच्या

भारतासाठी । ३३०