पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/332

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि देशाच्या फाळणीची किंमत देऊन नादानांनी सत्ता आपल्या पदरी पाडून घेतली.

 गांधीजींनी शूराची अहिंसा सांगितली त्याबरोबर, दंगलग्रस्त भागात फक्त जागतिक प्रसार माध्यमांचे संरक्षण घेऊन जाण्याचेही त्यांच्यात नैतिक धैर्य होते. त्यांची नैतिक भाषा आता आपल्या प्रासादाच्या कुंपणाच्या बाहेर झेड-सिक्युरिटी घेतल्या खेरीज पाऊल न टाकणारे उघडपणे वापरू लागले आहेत. सगळा देश पुरुषार्थहीन झाला; इतका की अलीकडे रॅण्ड कॉपोरेशनने भारतातील आतंकवादाचे विश्लेषण करताना "भारत हा अल कायदाचा 'सॉफ्ट टार्गेट' झाला आहे" असे स्पष्ट मांडले.

 गांधीजींचे कचकडी मानसपुत्र यांनी प्रतिअशोक बनण्याची स्वप्ने रंगवीत लायसन्स-परमिट-कोटा राज्य स्थापण्याचा उपद्व्याप केला आणि त्यातून नेता, तस्कर, गुंडा, अफसर आणि काळा बाजारवाले यांच्या हाती सत्ता सोडून दिली. शेती कनिष्ठ आणि नोकरी वरिष्ठ करून दलित, आदिवासी, मुसलमान या समाजांच्या आरक्षणवादी राजकारणाला खतपाणी घातले.

 या अशा अवस्थेत महिन्याभरात मतदार निवडणुकीच्या मतदानयंत्रासमोर जाणार आहे.

 समाजवादाचा झटका खाल्ल्यानंतर खुल्या व्यवस्थेवर निष्ठा नसणाऱ्या पुढाऱ्यांनी खुली व्यवस्था आणण्याची नौटंकी केली. जागतिक मंदीच्या पहिल्या वादळातच नेत्यांची आणि नागरिकांचीही हिंमत खचली आहे. हवामानातील बदल आणि ऊर्जेचा तुटवडा यांनी आर्थिक संकट अधिकच गडद केले आहे. समाजवादी रशियाचे पतन झाल्यानंतर अमेरिका आता एकमेव महासत्ता राहिली अशा हिशेबाने रशियन दोस्तीचा कालखंड झाकून ठेवून अमेरिकेशी दोस्ती करणाऱ्यांना एका नव्याच वादळाला तोंड द्यावे लागत आहे.

 जगातील सर्व लोकशाहीविरोधी, ग्रंथप्रामाण्यवादी, विभूतिपूजावादी आणि जगभर आपली अनिर्बंध सत्ता स्थापण्याची लालसा बाळगणारे सर्व डावे आणि इस्लामचा दुरुपयोग करणारे आणि आतंकवादाच्या छत्राखाली मादक द्रव्यांची वाहतूक करणारे यांनी क्रेमलिन नसेल तर काबूलमध्ये एक महासत्ता तयार केली आहे.

 तालिबानच्या पहिल्याच झटक्याने पाकिस्तान गुढग्यावर आला आहे. नजिकच्या भविष्यकाळात सिंध, बलुचिस्तान आदी राज्यांत पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी उठाव होणार आहेत. पाकिस्तानची शकले उडणार आहेत.

भारतासाठी । ३३२