पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/60

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मधूनमधून कोणत्यातरी राष्ट्रीय दिनानिमित्त हरताळ पडायचा आणि शाळा बंद व्हायची हे सोडल्यास वरवर तरी स्वातंत्र्य आंदोलन शमल्यासारखेच दिसत होते. उघडपणे काही करून तुरुंगात जाण्याची किंवा 'शिरीशकुमार' होण्याची कुणाची इच्छाही नव्हती आणि छातीही नव्हती.उघडउघडपणे खादी वापरणे म्हणजेसुद्धा गांधींचा माणूस असल्याचा संशय ओढवून घ्यायला पुरेसे होते.आम्ही शाळकरी विद्यार्थी.खादी वापरणारा बहुधा आमच्यात कोणी नव्हताच; पण निदान खादी वापरण्याची बहादुरी तरी आपल्या हातून व्हावी अशी मोठी ऊर्मी वाटत असे. याला अपवाद म्हणजे संघ आणि हिंदू महासभा अशा हिंदुत्वनिष्ठ घरच्यांचे विद्यार्थी. त्यांची गांधींबद्दलची विरोधभक्ती मोठी जाज्ज्वल्य होती. गांधींनी अहिंसा मांडली म्हणजे डॉ. मुंज्यांची मांसाशनातून स्वातंत्र्य अशी प्रतिक्रिया येई.तसे पाहिले तर त्या काळात हिंदुत्वनिष्ठा आणि स्वदेशी यांच्यात वितुष्ट येण्याचे काही कारण नव्हते.स्वदेशीची चळवळ तशी काही गांधीजींनी सुरू केली नाही. विलायती कापडाच्या पहिल्या होळ्या सावरकर, लोकमान्य टिळक यांनी पेटविलेल्याः पण, आता हा गांधी स्वदेशी म्हणतो काय? मग.आम्ही आग्रहाने, विलायतेतून आलेल्या कापडाची टोपी आणि जमल्यास एखादा दुसरा कपडा वापरणार अशी भूमिका हिंदुत्वनिष्ठ घ्यायचे. खादी पेहरली म्हणजे सनातन वर्णाश्रम धर्माला डाग लागतो असे नव्हते किंवा विलायती मलमलीने धर्मनिष्ठेला काही झळाळी चढत होती असे नव्हते;पण, इंग्रजांच्या आमदनीच्या घटिका भरत आलेल्या असतानासुद्धा स्वदेशीला अपशकून करण्याचा कार्यक्रम या अहंमन्यांनी हाती घेतला आणि हसे करून घेतले.

 'स्वदेशी' राजीवस्त्रांचे पुरस्कर्ते

 दुसरी एक आठवण झाली. १९८६ साली राजीव गांधींचे नवे वस्त्रधोरण जाहीर झाले. अंबानी आणि इतर तत्सम कारखानदारांच्या राजीवस्त्र-उद्योगांना खलेआम प्रोत्साहन देणारे ते धोरण. कापस शेतकऱ्यांची मोठी दैना झाली. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी साहेबराव करपे पाटील याने निराशेपोटी आपल्या बायकोपोरांसह विष पिऊन जीव दिला. आंध्र प्रदेशात तर डझनावारी शेतकरी स्त्री-पुरुषांना जीव देण्यावाचून गत्यंतर उरले नाही. महाराष्ट्रात शेतकरी संघटनेने राजीवस्त्रविरोधी आंदोलन चालू केले. आंदोलनाचा विरोध कृत्रिम धाग्याला नव्हता. शहरातील मृदुकंचनकायिकांना राजीवस्त्रच आवडत असेल तर त्यांना हे सौख्य नाकारायचा शेतकऱ्यांना काय अधिकार? पण ही राजीवस्त्रे तयार करण्याकरिता, यंत्रसामुग्रीपासून कच्च्या मालापर्यंत सगळ्याची आयात होणार

भारतासाठी । ६०