पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/70

हे पान प्रमाणित केलेले आहे.

लायसेन्स, परमिट खेरीज कुणाचे पान हलेनासे झाले; त्यामुळे तर नोकरशाही म्हणजे भ्रष्टाचार असे समीकरण बनून गेले.

 ताठ मानेने, अभिमानाने, आपापले काम चोख करणाऱ्या संस्था नेहरू जमान्यात सगळ्या संपन गेल्या. राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना कर्निसाताचा रतीब घाल लागले. विश्वविद्यालयातील विद्वान, प्रयोगशाळेतील संशोधक, कलावंत, साहित्यिक सगळ्यांच्या तोंडात सरकारी लगाम बसले. या सगळ्या संस्थांचा नादानपणा अयोध्येत स्पष्ट झाला आणि त्याच दिवशी भारताचे पहिले गणराज्य संपले.

 आता कितीही प्रयत्न केले तरी हे गणराज्य सावरणे शक्य नाही.

 नरसिंहराव सरकार अजूनही अयोध्या म्हणजे न्यायालयाने सोडवायचा प्रश्न आहे अशाच समजुतीत वागत आहे. सगळ्या प्रश्नावर त्यांनी काय तोडगा काढला ते पाहिले म्हणजे हसावे की रडावे समजत नाही. त्यांचा तोडगा काय, तर सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीदीच्या जागी पूर्वी एक देवालय होते की नाही या प्रश्नाचा निर्णय द्यावा; देवालय होते असे ठरले तर त्याजागी राममंदिर बांधले जाईल आणि मशीद दूर थोड्या अंतरावर पुन्हा बांधली जाईल. बाबरी मशीद मुळात देवालय नष्ट करून बांधलेली नाही असे सिद्ध झाले तर मशीद तिच्या मूळ जागीच पुन्हा बांधली जाईल आणि राममंदिर शेजारीच म्हणजे शीलान्यासाच्या जागी बांधले जाईल.

 हा तोडगा शोधून काढणाऱ्या यंदाचे विदूषक पारितोषिक द्यायला हवे! मशीदीच्या जागी देऊळ होते किंवा नाही हे ठरवणे काय कोर्टाचा विषय आहे? हा विषय आहे इतिहासकारांचा, पुराणशास्त्रविद्येचा, शिल्पविद्येचा. हा सगळ्या क्षेत्रांतील विद्वानांना गेल्या ४० वर्षांत काहीही निष्कर्ष काढता आला नाही, तर सर्वोच्च न्यायालय आता न्यायदान जमेना तेव्हा या क्षेत्रात घुसून काही पराक्रम गाजवणार आहे का काय?

 समजा, सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी स्वीकारलीच आणि निर्णय दिला, तर त्यातून निष्पन्न काय होणार? मूळ जागी देवालय होते असे ठरले तरी कठमुल्ला मुसलमान निमूटपणे बाजूला होतील हे काही फारसे शक्य नाही. ते निवाड्याविरुद्ध आरडाओडा करतील आणि निदान राजकीय पातळीवर फेरविचार व्हावा म्हणून आग्रह धरतीलच धरतील. मशीदीच्या जागी राममंदिर होते असे ठरले आणि मशीदीच्या जागी नव्याने देऊळ बांधले म्हणजे महंतांचे आखाडे संतोष पावणार आहेत असेही नाही. अयोध्येनंतर मथुरा, काशी, द्वारका इतकेच काय दिल्लीच्या जामा मशीदीचा प्रश्न लढवण्यासाठी अनेक भगवे महंत

भारतासाठी । ७०