पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/76

हे पान प्रमाणित केलेले आहे.

इत्यादींच्या डोक्यावर पडतो आणि त्यामुळे भारतीय उद्योजकांना बाजारपेठेतील स्पर्धेत टिकणे अशक्य होते.

 एवढा खर्च करून नोकरदारांमुळे आणि नोकरशाहीमुळे देशाचा काही फायदा होत असता, उत्पादनात काही वाढ होत असती तरी समजण्यासारखे आहे. राष्ट्रीय उत्पन्नातील नोकरदारांचा हातभार नगण्यच नव्हे तर ऋणात्मक आहे. उत्पादनाला हातभार लावण्याऐवजी नोकरदार मंडळी उत्पादकांच्या वाटेत अनंत अडचणी निर्माण करतात. आर्थिक अरिष्टात सापडलेल्या देशातील उत्पादनाला अडचणी निर्माण करण्याचे देशद्रोही कृत्य करणाऱ्यांवर सरकार आनंदाने अंदाजपत्रकाच्या रकमेपैकी ६५ ते ८० टक्के रक्कम खर्च करते ही परिस्थितीच महाभयानक आहे.

 शेतकरी संघटनेने नोकरदारांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला, आंदोलन चालवले. ३० जानेवारी १९९३ च्या सेवाग्रमच्या मेळाव्यात नोकरदारांवरील खर्च कमी करण्यासाठी एक कार्यक्रम सुचविला. हा कार्यक्रम ३१ मार्च १९९३ च्या दिल्ली येथील महामेळाव्यात पुन्हा एकदा देशातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मान्य करण्यात आला. दिल्लीच्या मेळाव्यात आर्थिक मुक्तीसंबंधी एक व्यापक ठराव संमत करण्यात आला. त्यात व्यापार, निर्यात आणि उत्पादन यांवरील सर्व सरकारी निर्बंध हटवावे आणि नोकरशाहीवरील खर्चाची छाटणी करावी असे मत आग्रहाने मांडले.

 महामेळाव्यानंतर पाचच दिवसांत खुद्द पंतप्रधानांच्या तोंडूनच नोकरदारांच्या प्रश्नाचे विक्राळ स्वरूप स्पष्ट झाले. पंतप्रधानांनी हा प्रश्न जितक्या परखडपणाने मांडला त्यापेक्षा अधिक कोणी मांडू शकेल असे वाटत नाही. नेहरूव्यवस्थेत नोकरदारांचे प्रस्थ वाढणे अपरिहार्यच होते. नेहरू काळात अधिकाऱ्यांच्या हाती सत्ता आली. इंदिरा गांधींच्या काळापासून नोकरदारांचे पगार, भत्ते, सवलती, डामडौल यांच्यावरील खर्च वाढत गेला आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सरकारी नोकरदारांची यंत्रणा काहीही काम न करता फक्त एकमेकांचे पगार-भत्ते काढण्याचेच काम सर्वकाळ करते.

 परिस्थिती इतकी पराकोटीची गंभीर झाली तरीही नोकरदारांच्या विरुद्ध जाऊन बोलण्याचे धाडस फारसे कोणी करणार नाही. महागाई भत्ता थांबविण्याच्या प्रस्तावास कम्युनिस्टांनी विरोध करावा हे समजण्यासारखे आहे. येत्या निवडणुकीत जिंकण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीने प्रस्तावास विरोध करावा हेही समजण्यासारखे आहे. काही काळापूर्वी नोकरदारांचा कल प्रामुख्याने काँग्रेस

भारतासाठी । ७६