या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

२२ । अभिवादन

क्लीवत्व देणे आणि क्लीवांना तात्पुरते पुरुषत्व देणे ही विद्या अप्सरांना ज्ञात असावी, असे मत दिले आहे व उर्वशीने ही विद्या अर्जुनाला दिली असावी असे सुचविले आहे. ऐतिहासिक दृष्टी न वापरता केलेल्या संकलनांतील एक धोका यामुळे दिसून येईल. माद्रीने कुंतीच्या नकळत अश्विनीकुमारांचे ध्यान करून जुळया सुतांची उत्पत्ती करून घेतली असा महाभारतात उल्लेख आहे. जरासंधाचा पिता बृहद्रथ याने चंडकौशिकाने दिलेले फळ निम्मे निम्मे वाटून दोन राण्यांना दिल्यामुळे त्यांना अर्धी अर्धी शकले एकाच देहाची झाली असाही उल्लेख आहे. या सर्व उल्लेखातून अति प्राचीन काळी आर्य संस्कृतीत असणाऱ्या एका समजुतीवर प्रकाश पडतो व ती समजूत म्हणजे दोघांशी संबंध आल्यावाचून युग्म संभवत नाही ही होय. पण ही त्या काळची समजूत अण्णांच्या संकलनात आलीच नाही. अशा संकलनांचा हा दुसरा धोका असतो. खुद्द अण्णांना या सर्व बाबींची जाणीव होती. त्यामुळे प्रस्तावनेत अति नम्रपणे त्यांनी या प्रकरणाविषयी असे म्हटले आहे, "...प्रकरणांत पुष्कळच नवीन गोष्टी आहेत. त्यात काही पूर्वी येऊन गेलेल्याही असतील. पण मी त्या भारताधारे मांडल्या आहेत. या योगाने...विद्वानांच्या मतास पुष्टी येईल." पुढे एके ठिकाणी त्यांनी असेही म्हटले आहे की, आपण माहितीचे संकलन करीत आहो त्या आधारे कोणतेही निष्कर्ष काढण्याचे धाडस करीत नाही. अण्णांचा हा विनय मला नेहमीच आवडला आहे.
 अनेक इतिहासकारांच्या मताप्रमाणे अण्णांनी प्राचीन भारतीय समाज कोणे एके काळी वर्णाश्रमावर आधारित होता असे गृहीत धरले आहे. पण यजुर्वेदातच अनेक जातीउपजातींची विस्तृत यादी आढळत असल्यामुळे आणि ऋग्वेदातच 'इंद्रउपालासंवादांत ' उपालेच्या ब्राह्मणपित्याच्या उदरनिर्वाहाचे साधन कृषी असल्याचे दिसत असल्यामुळे चातुर्वर्ण्यावर भारतीय समाजाची धारणा कधीतरी होती काय हाच मोठा वादग्रस्त प्रश्न आहे. ऋग्वेदाच्या काळी वर्णव्यवस्था अजून परिपूर्णावस्थेला गेली नव्हती असे म्हणावयाचे आणि यजुर्वेदाच्या काळी वर्णव्यवस्था पूर्णावस्थेच्या पलीकडे जाऊन जातिव्यवस्थेत परिणत होत होती असे सांगून सारवासारव करावयाची, हा आमच्या संशोधकांचा नित्याचा खेळ आहे. ऋग्वेदातच अश्वविद्येचा आणि वेश्याव्यवसायाचा जो उल्लेख आला आहे त्यावरून त्या काळी जातिव्यवस्था होतीच असे म्हणावे लागते व आर्थिक तत्त्वविचारात चातुर्वर्ण्य असले तरी व्यवहारात ते कधीच नव्हते या निर्णयावर यावे लागते. अण्णांनी त्रैवर्णिकांत परस्परव्यवहाराची फार मोठी समानता होती असेही म्हटले आहे. पण अथर्वणवेदातच त्रैवर्णिकांची परस्परव्यवहारात असमान वागणूक होती याचे विपुल पुरावे येऊन गेले आहेत. अतिशय जागरूकपणे अण्णांनी भारतकालातील ब्राह्मणसमाज, गृहस्थ, भिक्षुक, लढवय्या, हत्यारे विकण्याचा धंदा करणारा, पुरोहित, निरोप्या,