पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


या जगांत महान् विभूति जन्माला येतात, लोकोत्तर पुरुष जन्माला येतात. जगाच्या गाड्याला ते प्रचंड चालना देतात. एखादा बुद्ध, एखादा ख्रिस्त, एखादा मुहंमद येतो व कधींहि न संपणारी गति व प्रेरणा जगाला देतो. या ज्या महान् व्यक्ति असतात, त्यांनाहि सारेच स्वतःच्या इच्छेप्रमाणे करतां येतें असे नाहीं. तेहि कांहीं अंशीं परिस्थितिशरण असतात. स्वतःच्या इच्छांना त्यांनाहि मुरड घालावी लागते. त्यांच्या मूळच्या कल्पना समाजांत शिरतांना बदलत असतात. त्या जशाच्या तशा रहात नाहींत. बुद्ध धर्मातील, ख्रिस्ती धर्मातील किंवा इस्लामी धर्मातील कल्पना मूळ धर्मस्थापकांच्या मनांत जशा असतील तशाच राहिल्या असें नाहीं. त्या लोकोत्तर विभूतींचा प्रचंड परिणाम झाला यांत संशय नाही. परंतु समाजव्यापक असे जे इतर प्रवाह, त्यांच्याशी या लोकोत्तर विभूतींच्या विचारप्रवाहासहि समरस व्हावे लागलें. तेव्हांच त्यांचे विचार पुढे जाऊं शकले. एरव्ही ते पुढे सरकते ना. कधीं मूळच्या कल्पना अधिक विकसित व प्रगल्भ होत, कधीं त्या विकृतहि होत; परंतु असें होणे अपरिहार्यच असतें. संस्कृतीच्या विशिष्ट पायरीवर असणाऱ्या लोकांच्या सर्वसामान्य गरजांना अनुरूप असेंच स्वरूप या नव विचारांसहि घेणें प्राप्त होतं. म्हणून इतिहास हा नेहमीं बनत असतो, वाढत असतो. इतिहास म्हणजे एक अखंड गतीचा प्रवाह आहे. भौगोलिक व आर्थिक परिस्थितीमुळे नवनवीन

इस्लामी संस्कृति । १