पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९७
येशू ख्रिस्त
 

नीं त्याला फसविलें व ते सारे पळून गेले. शिपायांनीं येशूस पकडून सुभेदारापुढे उभे केलें. तोही बुचकळ्यांत पडला. तो दिवस सणाचा होता आणि म्हणून एका कैद्याला मुक्त करण्याचा अधिकार या दिवशीं त्याला होता. येशूबरोबरच बॅरॅबस नांवाचा एक बिलंदर डाकू कैद झाला होता. सुभेदारानें लोकांस विचारलें, 'या दोघांपैकी कोणास सोडूं?' ते अज्ञ लोक गर्जून म्हणाले, 'बॅरबस या सोडा'. संसारी लोकांनीं दरवडेखोर स्वतःसाठीं मागून घेतला आणि शांतिक्षमेचा पुतळा फांसावर चढविण्यासाठी सुभेदाराच्या हवाली केला! मग शिपायांनी कांटेरी मुकुट करून त्याच्या डोक्यावर घातला आणि 'अहो यहुद्यांचे राजे' असें म्हणून त्याची टवाळी केली, त्यास द्रोणभर आंब प्यावयास दिली, व शेवटीं त्यांनीं स्याच्या हातापायांवर खिळे ठोकून त्यास वधस्तंभाशीं कायम केलें. येशूची मान लटकी पडली. तो म्हणाला, 'परमेश्वरा! मला विसरलास काय?' तो असें म्हणाला काय, याविषयीं फार वाद आहे. असो. कांहीं वेळानें त्याचें प्रेत गुहेत ठेवण्यांत आलें व त्याच्या आड एक दगड उभा करण्यांत आला. तो पुन्हा जिवंत होणार आहे हें भाकित खोटें ठरविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सक्त पहारा ठेविला होता. तिसरे दिवशीं दगड काढून पहातात तो येशू आंत नाहीं! एकदम जिकडे तिकडे आरोळी उठली कीं, येशू ख्रिस्त जिवंत झाला. श्रद्धाळू ख्रिस्त्यांचा या कथेवर पूर्ण विश्वास आहे. येशू ख्रिस्ताचें हें पुनरुत्थान म्हणून समजलें जातें. असो. अशा प्रकारें या नवीन धर्मसंस्थापकाचा अंत झाला.

 पु. श्रे. ७