पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८३
जॉन सोबेस्की
 

वरची विद्या तर तो जाणतोच जाणतो; परंतु फ्रेंच भाषेचा अभ्यास करून त्याच्या द्वारा त्यानें फार मोठें ज्ञानार्जन केलें आहे. लॅटिन, फ्रेंच, इटालियन, जर्मन या परकी भाषासुद्धां तो स्वतःच्या पोलिश भाषेसारख्याच बोलतो. पदार्थविज्ञान इत्यादि शास्त्रांचाही त्याला मोठा शोक आहे. राजा खूप उंच असून त्याचें पोट बरेंच सुटलें आहे; तोंड बरेंच जाड असून डोळे मोठे आहेत. गांवचे लोक जसा पोशाख करतात तसाच राजासुद्धां करतो. तो कोठेही जावो, एक भली मोठी समशेर त्याच्या कमरपट्याला लोंबत असावयाची' असो. सोबेस्की विद्येचा मोठा अभिलाषी, कुशल सेनापति व शूर शिपाईगडी होता. तो आपले शेवटचे दिवस या ठिकाणीं घालवीत असतां काळज्यांनीं वगैरे तो अगदीं खंगून गेला आणि शेवटीं मुसलमान आणि ख्रिस्ती हे शब्द युरोपांत जोपर्यंत चालू राहतील तोंपर्यंत ज्याच्या नांवाला मरणाचें भयच नाहीं तो हा नवीन काळाचा उत्पादक पराक्रमी जॉन सोबेस्की १६९६ सालीं आपल्या वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी स्वर्गवासी झाला.

 पु. श्रे....१४