पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१
शिकंदर
 

एकदां कोठेंसें सांपडलेलें सुंदर पाणी शिपायांनी डोकीच्या टोपांतून त्याच्यासाठी म्हणून आणले; पण माझ्या फौजेची तहान भागेपर्यंत मी हें पिणार नाहीं असें म्हणून या दिलदार सेनापतीनें तें पाण्याचे भांडें दूर केलें! याप्रमाणे रखडत रखडत ते कसेबसे या रेताडांतून बाहेर पडले. पण हा वेळपर्यंत अर्धी-निम्मी फौज केवळ वाटचालीतच मरून गेली. शेवटीं एकदांचे ते इराणांत पोंचले. दारियसचें जिंकलेलें साम्राज्य त्यानें टाकून दिले नव्हते; तें त्यानें आपल्या ताब्यांत ठेविलें होतें व हिंदुस्थानाकडे जातांना तेथील कारभाराची व्यवस्था करून तो पुढे गेला होता. शिकंदर परत येत आहेसें पाहून अधिकाऱ्यांनी त्याच्या स्वागताची तयारी करून ठेविली व त्यामुळे हायसे होऊन शिकंदर व त्याचे शिपाई विश्रांति घेऊ लागले. सर्व तऱ्हेच्या सुखसोईंची व्यवस्था झालेली होती. हे वाळून गेलेले आणि वखवखलेले लोक इतके सुखावले कीं, कित्येक महिनेपर्यंत त्यांना दुसऱ्या कशाची आठवणच झाली नाहीं. या सुखनिद्रेतून जागा होतांच शिकंदर कारभाराच्या सुधारणेस लागला. दारियसची राजधानी जी सुसा तेथेंच त्यानें आपलीही राजधानी केली. आधी नेमून ठेवलेल्या अंमलदारांना दुर्बुद्धि आठवून त्यांनी कारभारांत बजबज माजविली होती; त्यांस त्याने कामावरून दूर केलें व जरूर तर कडक शासनही केलें. त्याच्या मनांत इकडेच राहून हिंदुकुशापासून डॅन्यूबपर्यंत साम्राज्य चालवावें असें येऊं लागलें. लोकांना स्वतःसंबंधानें आपलेपणा वाटावा म्हणून त्यानें त्यांचा पूर्वकालीन थोर सम्राट् जो कुरु त्याच्या समाधीची डागडुजी करावयास आरंभ केला. याप्रमाणें आठदहा वर्षे मनस्वी श्रम करून प्राप्त करून घेतलेलें हें विशाल साम्राज्य सुस्थिर करण्याची त्यानें शिकस्त केली. सर्व स्थिरस्थावर होऊन राज्याचा गाडा सुयंत्र चालू होतांच झोपी गेलेली त्याची पृथ्वी जिंकण्याची वासना पुन्हा खडबडून उठली.