पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९३
येशू ख्रिस्त
 

हे त्याचे शब्द ऐकून त्याच्या मुसक्या बांधाव्या म्हणून पुष्कळांच्या मनांत आले; पण कोणाच्यानेही त्याजवर हात टाकवेना.
 अशा प्रकारें त्याचा अंमल वाढत चालला. त्याचा उपदेश सर्व लोक मानूं लागले. एकानें त्याला विचारलें, 'मला अनंतकाल टिकावयाचें आहे, मी काय करावें?' येशू उपदेश करूं लागला: 'व्यभिचार करूं नको; हत्या करूं नको; चोरी करूं नको; खोटी साक्ष देऊं नको; कोणाला ठकवूं नको; आईबापांचा मान ठेव' मुमुक्षु म्हणाला, 'हें सर्व मी तर करीतच आलों आहें'. येशूनें उत्तर केलें, 'अजून एका गोष्टीची उणीव आहे. तुझ्यापाशीं तुझें म्हणून जें जें कांहीं आहे तें सर्व विकून टाक, तो पैका गरिबांला देऊन टाक, वधस्तंभावर येण्याचा निश्चय करून मग माझी पाठ धर. असे केलेंस म्हणजे तूं चिरंजीव होशील'. यरुशलेम येथे पुन्हा जाण्याचा त्याचा निश्चय कायम झाला. त्याने एक गाढव पैदा केलें आणि त्याच्यावर अंगावरील पंचा टाकून शिष्यांसह तो नगरांत शिरला. हा वेळपर्यंत त्याचें नांव सर्वत्र पसरलें होतें. बडे लोक काय वाटेल तें म्हणोत आपणांस तारावयासाठीं हा उत्पन्न झाला आहे अशी सामान्य जनसमूहाची बालंबाल खात्री झाली होती. त्याचे चमत्कार, त्याची शालीनता, पातक्यांवर कृपादृष्टि, उपदेशाचा सोपेपणा इत्यादींचा विलक्षण परिणाम लोकांच्या मनावर झाला होता. तो अशा गरीबीनेंसुद्धां शहरांत शिरतांच लोकांच्या झुंडीच्या झुंडी जमा झाल्या. त्यांनी आपल्या अंगावरील वस्त्रे काढून तीं त्याच्या मार्गावर अंथरिली. कित्येकांनी हिरवीगार पालवी पसरून त्याचा मार्ग सुशोभित केला. आणि त्याच्या नांवाचा जयजयकार करीत, टाळ्या पिटीत त्यांनी त्याची मिरवणूक काढिली. येशू सरळ देवळांत गेला आणि तेथील दुकानदार, गिऱ्हाईक, सावकार आणि कुळें, कोंबडेवाले इत्यादिकांस त्यानें हांकून दिले व तो म्हणाला, 'हें स्थळ प्रार्थनेसाठीं