पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/103

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७९

आहेत. तथापि त्यांच्या तेजस्वितेविषयीं व राज्यकर्तृत्वाविषयी त्यांचा मतभेद नाहीं. स्वकीयांविषयीं पक्षपातबुद्धि किंवा द्रव्यसंग्रहाची इच्छा ह्या दोन गोष्टी बायजाबाईंसारख्या स्त्रीच्या ठिकाणी असल्यास नवल नाहीं; परंतु राज्यकारभार चालविण्याचें ज्ञान असणे हीच विशेष महत्त्वाची गोष्ट होय. "मुंबई ग्याझेट" पत्रकारांनी इ.स. १८३३ सालीं ग्वाल्हेर येथील राज्यक्रांतीबद्दल लिहितांना असें म्हटलें आहे कीं, "महाराज शिंदे ह्यांनी आपल्या पश्चात् आपल्या बायकोनें आमरण राज्यकारभार चालवावा अशी इच्छा आपल्या मृत्युसमयीं प्रदर्शित केली होती, व ती सिद्धीस नेणें ब्रिटिश सरकारास एकप्रकारें अगत्याचें होतें. त्याप्रमाणें बायजाबाईंनी आजपर्यंत राज्यकारभार उत्तम रीतीने चालवून, आपल्या यजमानांचा भरंवसा किती यथायोग्य होता हें सिद्ध करून दाखविलें. त्यांनी आपल्या शांत व सुखकर कारकीर्दीमध्यें देशाची अंतर्सुधारणा करण्यांत व प्रजेच्या सुखाची अभिवृद्धि करण्यांत अतिशय परिश्रम घेतले..........ह्या महाराणी आपल्या प्रजेला सौम्य व सद्यवृत्ति वाटत. त्यांचा कल, वयाच्या मानानें व जात्या, शांतता राखण्याकडे असे, आणि कृतज्ञता व स्वहित ह्या दोन्ही दृष्टीनीं त्या इंग्रजसरकाराशीं सलोखा राखीत. ह्याप्रमाणें बायजाबाईसाहेबांच्या राज्यकारभाराविषयीं त्या


 १. “It was the dying wish of the Scindiah, to the fulfilment of which the British Government was in a manner pledged, that his widow should continue regent till her death; and the manner in which she has hitherto performed the duties of that office is such as must justify the confidence reposed in her by that prince. During a long and peaceful reign, she has directed her energies to the internal improvement of her country and the happiness of her subjects. ......In the Ranee Regent they had a mild and friendly princess, attached to peace alike from inclination and age, and bound to the British from gratitude and interest..."